गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

प्रेमसंन्यास अंक चवथा (प्रवेश पहिला)

अंक चवथा

प्रवेश पहिला


(स्थळ - भूतमहाल)

विद्याधर
: कमलाकराने जागा पाहून दिली, पण ती गावापासून इतकी दूर, की एखाद्या निकडीच्या कामासाठी लौकर गावात जाऊन येईन म्हटले तर सोय नाही! आणि या जयंताच्या खटल्यामुळे सारखे गावात जावे यावे लागते! बाकी आजपर्यंत झालेल्या जबन्यांवरून आणि साक्षीवरून खटल्याचा निकाल काय होणार हे उघड दिसून येतच आहे! कोणी कपटाने पसरून ठेविलेल्या जाळ्यात बिचारा जयंत अचूक सापडला आहे! अशा जिवलग आणि उदार मित्रासाठी काय वाटेल ते करण्याची माझी तयारी आहे! पण उपयोग काय? फिर्यादी पक्षाचा पुरावा इतका भरपूर आहे की, जयंताने मनोरमेचा खून केला असा निकाल पंचांना एकमताने द्यावाच लागेल! मनोरमेच्या प्रेताचे तुकडे पेटीत भरून ती विहीरीत टाकण्यासाठी रात्री जयंत आला कसा हे मोठे नवल आहे! नाही म्हणावे तर तिचे डोके त्याच्या हातात! प्रेत मनोरमेचे नाही म्हणावे तर पेटीत तिचे दागिने, पत्रे वगैरे पुराव्याला हजर! आता खटला बहुतेक संपल्यासारखाच झाला आहे! येऊन जाऊन त्या पत्राबद्दल आमच्या बाजूने गोकुळची तेवढी साक्ष व्हावयाची राहिली आहे! पण तिचा काय उपयोग? ती होऊन न होऊन सारखीच! अरेरे! गरीब बिचारा जयंत फुकट प्राणाला मुकणार! पण या उलाढाली कोणी केल्या? परमेश्र्वरा, मानवी मतीला कुंठित करणारे हे कोडे सोडवायला तूच अकल्पित दैवी साहाय्य पाठवशील तरच बिच्चारा निरपराधी जयंत सुटणार आहे!
(दरोडेखोर येतात.)

पुढे वाचा: प्रेमसंन्यास अंक चवथा (प्रवेश पहिला)