गुरुवार, जानेवारी 18, 2018
   
Text Size

एकच प्याला अंक पाचवा ( प्रवेश तिसरा )

प्रवेश तिसरा

(स्थळ- रामलालचा आश्रम. रामलाल प्रवेश करतो.)

रामलाल : (स्वगत) माझ्या मनाचं घाणेरडं चित्र आता मला स्वच्छपणानं दिसायला लागलं! माझ्या अध:पाताला काही तरी सीमा आहे का? पित्याच्या दृष्टीनं शरद्कडे पाहताना मानीव नात्याच्या मोठेपणानं रक्तामांसाचं अंगभूत तारुण्य डोळयांतून मुळीच नाहीसं झालं नाही. शरदबद्दल मला जी सहानुभूती, भूतदया म्हणून वाटत होती, ती दुबळया मनाच्या हिंदू पुरुषाची पारावतवृत्ती कामुकता होती! गरीब गीतेला विद्यादान करताना, अनाथाला कल्याणाचा मार्ग दाखविल्यामुळंच आपल्याला हे समाधान होत आहे अशी माझ्या मनाची मी फसवणूक करीत आलो; पण ते तशा उदारपणाचं नव्हतं! गीतेला शिकताना पाहून, शरद्ला समाधान वाटत होतं, म्हणून मला त्या वेळी उत्साह वाटे! तोसुध्दा प्रियाराधनाचाच एक मार्ग होता!

(राग- भैरव; ताल- त्रिवट. चाल- प्रभू दाता रे.)
मन पापी हे। करिते निजवंचन अनुघटिदिन॥ ध्रु.॥
उपशमपर मतिमेषज सेवुनि सुप्तियत्न करि, परि ते।
विफल अंति सुविवेकभिन्न॥ 1॥

उपकारांच्या कृतज्ञतेमुळे बिचारा भगीरथ थोडयाच काळात माझ्याशी खुल्या दिलानं बोलूचालू लागला. तेव्हा त्याचा मला कंटाळा वाटू लागला. अधिक प्रसंगी मनुष्याची ती फाजील सलगी वाटून आपल्याला भगीरथाचा तिटकारा येत असावा अशी मी स्वत:ची समजूत करीत होतो; पण ते कंटाळण्याचं खरं कारण नव्हतं! भगीरथ आपल्याशी मनमोकळेपणानं वागल्याचं शरदनं वेळोवेळी सांगितल्यामुळेच, न कळत माझ्या मनात जागृत झालेला गूढ मत्सर हेच त्या कंटाळयाचं कारण होतं! त्या तरुण जिवांचा परस्परांकडे ओढा दिसू लागताच माझ्या प्रौढ मनात मत्सराची आग भडकली! तेव्हा- धिक्कार, शतश: धिक्कार असो मला! यात्किंचित् सुखाच्या क्षुद्र लोभानं पुत्राप्रमाणं मानलेल्या भगीरथाला दुखवून, कन्येप्रमाणं मानलेल्या शरद्च्या कोवळया हृदयावर रसरशीत निखारे टाकून माझ्या वयाच्या वडीलपणावर, नात्याच्या जबाबदारीवर आणि विचाराच्या विवेकवृत्तीवरही पाणी सोडायला मी तयार झालो, हा आमच्या आजच्या दुर्दैवी परिस्थितीचा परिपाक आहे. पराक्रमी पुरुषार्थानं मिळवलेली सत्ता मोकळेपणाच्या उदारपणानं मर्यादित करण्याचा आम्हाला सराव नसल्यामुळं दैवयोगानं प्राप्त झालेली अल्प सत्ता दुबळया जिवांवर आम्ही सुलतानी अरेरावीनं गाजवत असतो. आज हजारो वर्षे मेलेल्या रूढींच्या ठराविक ओझ्याखाली सापडून आमची मनंही मुर्दाड झाल्यामुळं आज आमच्यात वस्तुमात्रांतील ईश्वरनिर्मित सौंदर्य शोधून काढण्याची रसिकता नाही. असं सौंदर्य मिळविण्याची पवित्र अभिलाषबुध्दी नाही. त्या अभिलाषाची पूर्णता करणारी पुरुषार्थाची पराक्रमशक्ती नाही. आणि खरं कारण मिळताच जिवलग सुखाचाही त्याग करणारी उदार कर्तव्यनिष्ठा नाही! पूर्वजांनी तोंडावर टाकलेल्या अर्थशून्य शब्दांची विचारी वेदांताची वटवट क्षुद्र सुखाच्या आशेनंही ताबडतोब बंद पडते. विद्येनं मनाला उंच वातावरणात नेऊन ठेवलं तरी आमची मनं आकाशात फिरणार्‍या घारी गिधाडांप्रमाणं अगदी क्षुद्र अमिषानंसुध्दा ताबडतोब मातीला मिळतात. पाच हजार वर्षाचं दीर्घायुष्य मोजणार्‍या भारतवर्षरूप पुराणपुरुषा! तुझ्या विराट् देहासाठी हिमाचलासारखं भव्य मस्तक निर्माण केल्यावर गंगासिंधूसारख्या पवित्र ललाटरेखांनीही विधात्याला तुझ्या सुखाचा चिरकालीन लेख लिहिता येऊ नये का? सांग, हतभाग्या भारतवर्षा! भावी काळी या रामलालासारखी कंगाल पैदास आपल्या पोटी निपजणार, या कडू भीतीमुळं दक्षिण महासागरात जीव देण्यासाठी कमरेइतका उतरल्यावर कोणत्या पापांची प्रायश्चित्तं देण्यासाठी परमेश्वरानं तुला उचलून धरला? परमेश्वरा, माझ्या अपराधाची मला कधी तरी क्षमा होईल का? भगीरथ आणि शरद् यांच्याजवळ कोणत्या तोंडानं मी क्षमा मागू? नाही, मनाचा तीव्र आवेग आता मरणाखेरीज दुसर्‍या कशानेही थांबणार नाही. (भगीरथ व शरद् येतात.) हतभागी रामलाल, कृतकर्माची फळं भोगण्यासाठी दगडाचं मन करून तयार हो, आणि या दुखावलेल्या जिवांची क्षमा माग.

भगीरथ : भाईसाहेब, लहान तोंडी मोठा घास घेतला तर तुमच्या लाडक्या भगीरथाला तुम्ही क्षमा कराल का? आपल्या पायांजवळ एक विनंती करण्यासाठी मी आलो आहे.

पुढे वाचा: एकच प्याला अंक पाचवा ( प्रवेश तिसरा)