गुरुवार, जानेवारी 18, 2018
   
Text Size

एकच प्याला अंक चवथा ( प्रवेश पाचवा )

प्रवेश पाचवा

(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सिंधू दीन वेशाने दळीत आहे. पाळण्यात मूल.)

सिंधू : चंद्र चवथिचा। रामच्या गं बागेमधे चाफा नवतिचा॥

(दोन चार वेळ म्हणते) (पाळण्यात मूल रडू लागते.) अगं बाई, बाळ उठला वाटतं! (उठून त्याला पाळण्यातून बाहेर घेते.) आज चवथीची ही चिमुकली चंद्रकोर लवकर का बरं उगवली? चतुर्थीचा उपास लागला वाटतं चिमण्या चंद्राला? भूक लागली का बाळाला? बाळ, थांब हं जरा. आता गीताबाई येतील, त्यांना दूध आणायला सांगू माझ्या बाळासाठी बरं! आता का बरं काजळकाठ भिजवतोस असा? मघाशी थोडं दूध पाजलं होतं तेवढयावरच थोडा वेळ काढायला नको का? असा हट्ट करू नये? मागितल्या वेळी दूध मिळायचे दिवस, राजसा, आता आपले नाहीत रे! आपल्या लेखी गोकुळीच्या गोठणी ओस पडल्या!

(राग- कालंगडा; ताल- दीपचंदी. चाल- छुपनापे रंग.)
बघू नको मजकडे केविलवाणा, राजस बाळा॥ ध्रु.॥
ये देवा। अपुली ना करुणा
तोवरी समजुनी। वर्ते अनुकाला॥ 1॥

गरिबीत लहान जिवालासुध्दा मोठया माणसाची समजूत यायला हवी बरं, बाळ! अस्सं, आता कसा बरा हसलास! असाच शहाणपणा शिकला पाहिजे आता! गुणाचं मोठं गोजिरवाणं आहे माझं! दृष्टसुध्दा लागेल एखाद्याची अशा गुणाच्या करणीनं! झालं, लागलीच दृष्ट! आली बाळगंगा डोळयांतून! माझ्या डोळयांतून पाणी आलं म्हणून का वाईट वाटलं तुला? बाळा, मी रडते म्हणून तू सुध्दा असा रडणारच का? मी रडू नको तर काय करू? आज वाटलं, देवाला दया आली म्हणून! चांगली शपथ घेऊन सोडणं झालं होतं; पण आपलं दैव आड आलं! आताच भाईनं सांगून पाठविलं, की क्लबात जाऊन पुन्हा घ्यायला सुरुवात झाली म्हणून! आता बाळा, संसाराला तुझाच काय तो आधार! बाळ, लौकर मोठे व्हा, आणि आपल्या गोजिर्‍या हातांनी माझी आसवं पुसून टाका! तोवर या आसवांच्या अखंड धारेनं तुझ्या आटलेल्या दुधाचा वाढावा करायला नको का? ऐकता ऐकता डोळे मिटून ध्यान मांडलं का इतक्यात? हसायला वेळ नाही, न रडायला वेळ नाही! नीज, मी गाणं म्हणते हं! (त्याला मांडीवर निजवून पुन्हा दळू लागते. इतक्यात गीता प्रवेश करते.) ''चंद्र चौथिचा। रामाच्या गं बागेमध्ये चाफा नवतिचा!'' (पुन्हा पुन्हा म्हणू लागते. गीतेला पाहून) अगं बाई! गीताबाई, अशा उभ्या का? बसा ना? आज तळीरामांची तब्येत कशी आहे? काही उतार वाटतो आहे का?

गीता : उतार नाही न् काही नाही! पण बाईसाहेब, काय तुमची दशा ही? जात्याची घरघरसुध्दा अशा गाण्यानं गोड करून घेता आहात, तेव्हा धन्य म्हणायची तुमची!

पुढे वाचा: एकच प्याला अंक चवथा ( प्रवेश पाचवा)