गुरुवार, जानेवारी 18, 2018
   
Text Size

एकच प्याला अंक चवथा ( प्रवेश चवथा )

प्रवेश चवथा

(स्थळ: तळीरामाचे घर. पात्रे: शास्त्रीबुवा, तळीराम आजारी, व त्याचे मित्र वगैरे)

खुदाबक्ष : काय शास्त्रीबुवा, मिळाला का एखादा डॉक्टर-वैद्य?

शास्त्री : मिळालाय म्हणायचा. पण फार श्रम पडले शोधायचे! आधी तळीराम डॉक्टरचं किंवा वैद्याचं नावच काढू देत नव्हता मुळी; शेवटी सर्वांनी आग्रह केला, तेव्हा दारू पिणारा डॉक्टर किंवा वैद्य मिळाला तर आणा, म्हणून कबूल झाला! पुढं दारू पिणारा डॉक्टर किंवा वैद्य हुडकण्यासाठी आम्ही निघालो. सारा गाव डॉक्टरांनी आणि वैद्यांनी भरलेला, पण असा एखादा डॉक्टर वैद्य औषधापुरतासुध्दा मिळायची पंचाईत!

खुदाबक्ष : मग झालं काय शेवटी?

शास्त्री : दारू पिणारा डॉक्टर शोधून काढण्यासाठी आपल्या सोन्याबापू अजून फिरतो आहे. गावात मला दारू पिणारा वैद्य काही आढळला नाही; शेवटी एक इसम मिळाला.

खुदाबक्ष : वैद्य आहे ना पण तो?

शास्त्री : वैद्य नाही! एका वैद्याच्या घरी औषध खलायला नोकर होता तो पहिल्यानं! पुढं त्यानंच स्वत:चा कारखाना काढला आहे आता! म्हटलं चला, अगदी नाही त्यापेक्षा ठीक आहे झालं! आता एव्हानाच त्यानं यायचं कबूल आहे- (सोन्याबापू व डॉक्टर येतात.) काय सोन्याबापू, दारू पिणारे डॉक्टर मिळाले वाटतं हे?

सोन्याबापू : नाही. डॉक्टर नाहीत हे, नुसते दारू पिणारेच आहेत. पण डॉक्टरची थोडी माहिती आहे यांना. मी आणलंच यांना आग्रहानं! तुमचे ते वैद्य काही आपल्याला पसंत नाहीत!

शास्त्री : काय असेल ते असो! आपला आयुर्वेदावर अंमळ विश्वास विशेष आहे. वैद्याला कळत नाही- अन् डॉक्टरला कळतं- डॉक्टरसाहेब, क्षमा करा. हे माझं आपलं सर्रास बोलणं आहे- असं का तुम्हाला वाटतं?

सोन्याबापू : तसं नाही केवळ; पण या वैद्यांच्या जाहिरातींवरून मोठा वीट आला आहे! जो भेटतो त्याचं एक बोलणं! शास्त्रोक्त चिकित्सा, शास्त्रोक्त औषधं, अचूक गुणकारी औषधं, रामबाण औषधं, हटकून गुण, तीन दिवसांत गुण, गुण न आल्यास दुप्पट पैसे परत; अनुपानखर्डा सोबत, टपालखर्च निराळा-

डॉक्टर : शिवाय, सरतेशेवटी आगगाडीच्या डब्यातल्यासारखी धोक्याची सूचना!

सोन्याबापू : त्यामुळं खरा वैद्य आणखी खोटा वैद्य ओळखणं एखाद्या रोगाची परीक्षा करण्याइतकंच अवघड होऊन बसलं आहे! वैद्याविषयी आमचा अनादर नाही; आम्हाला एखादा का होईना, पण खरा वैद्य पाहिजे-
(वैद्य प्रवेश करतो.)

पुढे वाचा: एकच प्याला अंक चवथा ( प्रवेश चवथा)