गुरुवार, जानेवारी 18, 2018
   
Text Size

एकच प्याला अंक चवथा ( प्रवेश तिसरा )

प्रवेश तिसरा

(स्थळ- बंडगार्डन. पात्रे- सुधाकर व इतर मंडळी.)

सुधाकर : काय चमत्कारिक माझी स्थिती झाली आहे! लहानपणापासून या बागेची शोभा माझ्या पुर्‍या ओळखीची; पण आज तिच्याकडे नव्यानं पाहिल्यासारखं वाटतं. सुंदर परंतु निर्दोष वस्तूकडे पतित मनाला ओशाळेपणामुळं उघडया डोळयांनी पाहण्याचा धीर होत नाही! अगदी लहानपणी एका इंग्रजी गोष्टीत वीस वर्षाच्या अखंड झोपेतून जागा झालेल्या एका मनुष्याची प्रथम जगाकडे पाहताना जी विचित्र मन:स्थिती वर्णिली आहे, तिचं आज मला अनुभवानं प्रत्यंतर पटत आहे. या बागेकडेच काय, पण एकंदर जगाकडेच पाहताना माझ्या दृष्टीतला हा भितरा ओशाळेपणा कमी होत नाही. दारूसारख्या हलक्या वस्तूच्या नादानं ज्या सोज्ज्वळ समाजातून, प्रतिष्ठित परिस्थितीतून, बरोबरीच्या माणसांतून- अगदी माणसांतूनच- मी उठलो, त्या जगात हे काळं तोंड पुन्हा घेऊन जाताना मला चोरटयासारखं होतं आहे. या सुंदर जगात माझी जागा मला पुन्हा मिळेल का? अजून तोंडाला दारूची दुर्गंधी कायम असताना माझ्या पूर्वाश्रमीच्या जिवलग बंधूंना माझी तोंडओळख तरी पटेल का? अजून दारूच्या धुंदीनं अंधुक असलेल्या माझ्या दृष्टीला माझी हरवलेली जागा हुडकून काढता येईल का? हजारो शंकांनी जीव कासावीस होऊन उदार सज्जनांच्या समोरसुध्दा आश्रयासाठी जाण्याची माझ्या चोरटया मनाला हिंमत होत नाही. फार दिवस परक्या ठिकाणी राहून परत आलेल्या प्रवाशाला आपल्या गावात हिंडताना किंवा बिछान्यात फार दिवस खितपत पडून आजारातून उठलेल्या रोग्याला आपल्या घरातच फिरताना असाच अपुरा नवेपणा वाटत असतो खरा; पण पहिल्याला प्रियजनांच्या दर्शनाची उत्कंठा आणि दुसर्‍याला पुनर्जन्माच्या लाभाचा निर्दोष आनंद, जो पवित्र धीर देतो, तो घाणेरडया व्यसनाने दुबळया झालेल्या पश्चात्तापाला कोठून मिळणार? आज अजून कोणीच कसं फिरकत नाही? (पाहून) अरेरे, हे लोक या वेळी कशाला इथं आले? दारूच्या खाणाखुणा अजून अंगावर आहेत. अशा स्थितीत निर्व्यसनी जगात जाववत नाही म्हणून मद्यपानाच्या स्नेहातल्याच ज्या वजनदार लोकांनी अडल्या वेळी मला साहाय्य देण्याची वारंवार वचने दिली, त्यांची भेट घेण्याच्या अपेक्षेनं मी इथं आलो तो माझ्या गतपातकांची ही मूर्तिमंत पिशाच्चं माझ्यापुढे दत्त म्हणून उभी राहिली!
(शास्त्री व खुदाबक्ष येतात.)

शास्त्री : शाबास, सुधाकर, चांगलाच गुंगारा दिलास! तुला हुडकून हुडकून थकलो! अखेर म्हटलं, मध्येच तंद्री लागून कुठं समाधिस्थ झालास की काय कोण जाणे!

खुदाबक्ष : सगळया बैठका, आखाडे पायाखाली घातले. चुकला फकीर मशिदीत सापडायचा म्हणून सारे गुत्तेदेखील पालथे घातले!

शास्त्री : गुत्तेच पालथे घातले; त्यातल्या बाटल्या नव्हेत!

खुदाबक्ष : अरे यार, सार्‍या गटारांचासुध्दा गाळ उपसला; पण तुझा कुठं पत्ता नाही!

शास्त्री : बरं खांसाहेब, आता उगीच वेळ घालवू नका. सुधाकर, तळीरामाचा आजार वाढत चालल्यामुळं त्याच्याभोवती आळीपाळीनं पहार्‍यासाठी जागता सप्ता बसवायचा आहे. तेव्हा त्याचा कार्यक्रम ठरविण्यासाठी आपल्या मंडळाची खास बैठक  बसायची आहे, म्हणून लवकर क्लबात चल.

पुढे वाचा: एकच प्याला अंक चवथा ( प्रवेश तिसरा)