गुरुवार, जानेवारी 18, 2018
   
Text Size

एकच प्याला अंक चवथा ( प्रवेश दुसरा )

प्रवेश दुसरा

(स्थळ: सुधाकरचे घर. पात्रे: सिंधू कागदाच्या घडया पाडीत आहे, मागे सुधाकर उभा आहे. इतक्यात गीता येते.)

सिंधू : या गीताबाई, बसा अंमळ, एवढे चार कागद मोडायचे राहिले आहेत. जरा वेळ झाला तर चालेल ना?

गीता : सावकाश होऊ द्या! मी लागू कागद मोडायला?

सिंधू : नको. गीताबाई, माझी शपथ आहे! अगदी नको!

गीता : बाईसाहेब, का बरं नको म्हणता? नेहमी तुमचं असंच! मी जरा हात लावू लागले म्हणजे मोडता घालता लागलीच!

सिंधू : गीताबाई, तिकडच्या पायांवर हात ठेवून मी शपथ घेतली आहे ना, की, दुसर्‍याची काडी म्हणून घरात येणार नाही अशी! दुसर्‍याचे कष्ट आम्हाला अगदी वर्ज्य आहेत!

गीता : बाईसाहेब, काय म्हणू मी तुम्हाला? तुम्ही असे कष्ट करायचे आणि आम्ही धोंडयासारखं जवळ बसून ही डोळेफोड करायची! माझ्या जिवाला काय वाटत असेल बरं?

सिंधू : गीताबाई, आमच्यासाठी तुम्ही थोडं का करता आहात?  उभा गाव पायाखाली घालून छापखान्यातून हे कागद मोडायचं काम घेऊन येता, हे तुमचे थोडे का उपकार आहेत? असं कोण कुणासाठी खपत असतं?

(राग- पहाडी- गज्जल; ताल- धुमाळी. चाल- दिलके तु हान.)
मज जन्म देइ माता। परि  पोशिले तुम्ही॥
निजकन्यका गणोनी। न काही केले कमी ॥ ध्रु.॥
उपकार जे जहाले। हिमाद्रितुंगसे।
शत जन्म घेउनी ते। फेडीन काय मी॥ 1॥
सदया मनासि ठेवा। अपुल्या असे सदा।
उपकारबध्द तनया। तुमची पदे नमी॥ 2॥

गीताबाई, असं काम रोज कुठून आणलंत म्हणजे किनई तुमचे डोंगराएवढे उपकार होतील आमच्यावर.

गीता : ते पण समाधान मेल्या देवानं ठेवलं नाही! आज काम आणण्यासाठी सारा गांव हिंडले; पण कुठल्याच कारखान्यात काम मिळालं नाही! कायसा म्हणजे लढाईमुळे कागदाचा तुटवडा पडला आहे, अन् म्हणून कामच निघत नाही मुळी!

सिंधू : आता कसं बरं करायचं पुढं?

गीता : त्याच विवंचनेत मी पडले आहे कालपासून! कुठ्ठं कुठ्ठं काम म्हणून कसं ते नाही! देव अगदी अंतच बघायला बसला आहे जसा!

सिंधू : गीताबाई, आपलं दैव खोटं; देवाला काय वाकडं लावायचं तिथं? बरं, छापखान्यातून नसू दे मेलं! दुसरं कसलं काम नाही का मिळण्यासारखं काही?

गीता : दुसरं कसलं बरं काम पाहावं?

सिंधू : कुठलं का असेना, आपलं घरातल्या घरात होण्याजोगं काही काढा म्हणजे झालं! काय बरं बघाल? हो गडे, दळण नाही का कुणाकडचं मिळायचं? ते आपलं बरं, घरच्या घरी करायला-

गीता : अगंबाई, दळण? बाईसाहेब, भलतंच काय सांगितलंत हे?

सिंधू : त्यात काय झालं एवढं चपापायला, अशा का बघता आहात?

सुधाकर : (स्वगत) सिंधू, सिंधू, कोणत्या देवानं तुला बोलायला शिकवलं हे?

गीता : मोलानं दळण्याचं काम का तुमच्यासारख्यांनी करायचं? नवकोटनारायण तुमचे वडील, लक्षुमीशी सारीपाट खेळण्यात तुमचा जन्म गेला; आणखी आता हे काम करायचं?

पुढे वाचा: एकच प्याला अंक चवथा ( प्रवेश दुसरा)