गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

एकच प्याला अंक चवथा ( प्रवेश पहिला)

अंक चवथा
प्रवेश पहिला


(स्थळ: रामलालचा आश्रम. पात्रे: शरद् व रामलाल.)

शरद् : इतका वेळ बसून भगीरथानी बहुतेक सर्वच सर्ग समजावून दिला; पण या श्लोकावर ते थांबले! मग खरंच काम होतं, का श्लोक अडला म्हणून ते चालते झाले, कुणास कळे!

रामलाल : कोणता श्लोक?

शरद्
: हा, 'मरणं प्रकृति: शरीरिणाम्...''

रामलाल : वा:, फारच रमणीय श्लोक! काव्याच्या ऐन उत्कर्षात भगवान् कालिदासांनी इथं तत्त्वज्ञानाचा परमावधि साधलेला आहे! दशावतारांतला श्रीकृष्णाचा आठवा अवतार आणि रघुवंशातला हा आठवा सर्ग, मला नेहमी समानस्वरूपाचे वाटतात. त्या अवताराचा पूर्वार्ध राधाकृष्णांच्या लीलाविलासांनी परिपूर्ण, तर उत्तरार्धात योगेश्वर कृष्ण गीतेसारखी उपनिषदं गात आहेत! इकडे या सर्गाच्या प्रारंभी भौतिकभाग्याची समृध्दी असून पुढं करुणरसात उतरून परमवैराग्यात शेवट झालेला आहे. भारतवर्षीय राजर्षीच्या सात्त्वि संसाराचं संपूर्ण चित्र या एकाच सर्गात कविकुलगुरूनं रेखाटलं आहे! ऐक, तुझ्या श्लोकाचा अर्थ- 'मरणं प्रकृति: शरीरिणाम्'- मरण हा सदेह प्राणिमात्राचा स्वभाव आहे; 'विकृतिर्जीविमुच्यते बुधै:'- जिवंत राहणं हे सुज्ञ लोकांना अपवादरूप वाटतं! 'क्षणमप्यवतिष्ठते श्वसन' आणि म्हणून क्षणभरच जरी जीवित लाभलं, तरी 'यदि जन्तुर्न तु लाभवानसौ'- तो प्राणी भाग्यशाली नाही काय? जीवमात्राचा जन्म केवळ एकरूप आहे; परंतु मरणाला हजार वाटा आहेत. एवढयासाठीच या संसाराला मृत्यूलोक म्हणतात! परिस्थितीकडे विचारपूर्वक पाहिलं तर मरणाच्या इतक्या हजारो कारणांतून आपण क्षणमात्र तरी कसे वाचतो, याचं प्रत्येकाला मोठं आश्चर्य वाटेल! आणि म्हणून इथं म्हटलं आहे की, पदरात पडलेल्या पळापळाबद्दल आनंद मानून भावी कलाकडे आपण उदासीन दृष्टीनंच पाहिलं पाहिजे!

शरद् : श्वासमात्रानं जगण्याचा जो क्षण लाभेल त्याबद्दल आनंद मानावा, हे कवीचं म्हणणं तुम्हाला खरं वाटत असेल कदाचित! पण भाईसाहेब, असे दु:खीकष्टी जीव या जगात किती तरी सापडतील, की ज्यांना शंभर वर्षांचं दीर्घायुष्यसुध्दा शापासारखं वाटेल!

रामलाल : (स्वगत) हिंदू समाजातल्या बालविधवेच्या या प्रश्नाला कालिदासाच्या बुध्दीमत्तेनंसुध्दा उत्तर देणं शक्य नाही! (उघड) शरद्, सुदृढ आणि उदार विचारशक्तीनं ज्या वेळी समाज सर्व कार्य करीत होता आणि धीरगंभीर नीतिमत्ता ज्या वेळी क्षुद्रवृत्ती झालेली नव्हती, त्या कालाला कालिदासाची ही उक्ती समर्पक होती! त्या वेळी जीविताचा प्रत्येक क्षण सुखमय होता! हाच सर्ग पाहा! किती रमणीय सुखाचं वर्णन आहे यात! यातलं इंदूमतीचं मरणसुध्दा मनोहर आहे! दिव्य सौंदर्यालाच मुक्ती देण्यासाठी या आर्य कवीनं स्वर्गातल्या पारिजात पुष्पासारख्या कोमल शस्त्राची योजना केली आहे आणि आज राक्षसी रूढीच्या आहारासाठी असली नाजूक फुलं तापल्या तव्यावर परतून घेण्याची नीतिमत्ता निर्माण झाली आहे! शरद्, तुझ्यासारखी सुंदर बालिका वैधव्याच्या यातना भोगताना पाहिली म्हणजे आर्यावर्ताच्या अवनत इतिहासाची दीन मूर्तीच आपल्यापुढं उभी आहे, असं वाटायला लागतं! सौंदर्य कोणत्याही स्थितीत आपली नाजूक शोभा सोडीत नाही! सौंदर्याला वैधव्याचा अलंकारसुध्दा करुण शोभाच देतो! शरद्, पुनर्विवाहाबद्दल आम्ही तुला सर्वजण आग्रह करीत असताही (तिच्या पाठीवरून हात फिरवीत) बेटा, अजून तुला- (स्वगत) हिच्या अंगाचा स्पर्श होताच माझ्या हातावर असा खरखरीत काटा का बरं उभा राहिला? हा अनुभव अगदी नवीन- पण नको हा अनुभव! माझा हात सारखा थरथर कापत आहे! (तिच्या पाठीवरून हात काढतो. शरद् रामलालकडे पाहते.) अशा चमत्कारिक दृष्टीनं का पाहतेस माझ्याकडे? बेटा, तुझ्या बापानं तुझ्या पाठीवर असा हात ठेवला नसता का?

पुढे वाचा: एकच प्याला अंक चवथा (प्रवेश पहिला)