गुरुवार, जानेवारी 18, 2018
   
Text Size

एकच प्याला अंक तिसरा ( प्रवेश चवथा )

प्रवेश चवथा

(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: तळीराम, सुधाकर, सिंधू, शरद्.)

तळीराम : असं आम्ही बोलू नये; पण दादासाहेब, आता बोलायची वेळ आली! अहो, या घरात तुमची काय किंमत आहे? तुम्ही कोण आहात? अहो दादासाहेब-

सुधाकर : तळीराम, तू मला अजून दादासाहेब म्हणतोस? दोस्त, मी तुझा साहेब का? अशा परकेपणानं मला का हाका मारतोस? मला सुधाकर म्हण- दादासाहेब म्हणू नकोस- सुधा म्हण-

तळीराम : दादासाहेब, तुम्हाला सुधा म्हणणारी माणसं निराळी आहेत. आम्ही काय दरिद्री माणसं! फार झालं तर तुमच्या जिवाला जीव देऊ एवढंच! आम्ही काय तुम्हाला सुधा म्हणावं? तुमची लायकी आम्हाला कळते. तुम्हाला सुधा म्हणणारे थोर लोक निराळे आहेत.

सुधाकर : कोण आहेत ते थोर लोक? मला सुधा म्हणणारा कोण आहे? माझ्या घरात मला अरेतुरे? प्रत्यक्ष माझ्या घरात?

तळीराम : तुमचं घर? दादासाहेब, हे घर तुमचं नाही. हे घर रामलालचं आहे!

सुधाकर : रामलालची काय किंमत आहे?

तळीराम : किंमत आहे, म्हणून तर त्यानं मला घरात यायची बंदी केली. आम्ही तुमचे जिवलग दोस्त- आम्हाला घरात यायची बंदी! रामलालनं बंदी केली मला!

सुधाकर : मी रामलालला बंदी करतो. घरात पाऊल टाकू नकोस म्हणून सांगतो. घर माझं आहे!

तळीराम : तुमचं ऐकतो कोण? बाईसाहेब त्यांना अनुकूल, शरदिनीबाई त्यांना अनुकूल! सगळयांनी संगनमत करून आज पद्माकराला तार केली आहे. तो येऊन तुमचा बंदोबस्त करणार! आता आम्हाला धक्का मारून घराबाहेर घालविणार!

सुधाकर : सगळे पाजी, चोर, हरामखोर लोक आहेत! येऊ दे, पद्माकर येऊ दे, नाही तर त्याचा बाप येऊ दे! पद्माकर, त्याचा बाप, रामलाल, शरद्, सिंधू- एकेकाला लाथ मारून हाकलून देतो घराबाहेर!

तळीराम : ते लोक बरे जातील बाहेर? पद्माकर तर आता खर्च चालवितो तुमचा! तो कसा जाईल? घर त्याचं आहे. पैसा त्याचा आणि घरही त्याचं!

सुधाकर : मला कुणाची कवडी नको आहे! मी लाथ मारीन तिथं पाणी काढीन! मला कुणाचा पैसा नको आहे! मला थोडीशी दारू पाहिजे! आण थोडीशी!

तळीराम : या घरात तुम्हाला घेताना पाहिलं तर बाईसाहेब काय म्हणतील मला?

सुधाकर
: काढ पेला! सिंधूच्या, शरद्च्या देखत भरून दे! कुणी एक अक्षर बोललं तर पाहतो! सिंधू, शरद्, सिंधू, चलाव! सगळे इकडे या- चलाव! सिंधू, शरद्! तळीराम, भर पेला!
(सिंधू व शरद् येतात; तळीराम पेला भरू लागतो.)

सिंधू
: तळीराम, तळीराम, काय करता हे?

सुधाकर : एक अक्षर बोलू नकोस! मुकाटयानं दोघी उभ्या राहा आणखी पाहा! तळीराम, आण इकडे तो पेला!

शरद् : तळीराम, तू अगदी नरपशू आहेस! दोन्ही डोळयांची भीडमुरवत, लाजलज्जा काहीतरी आहे का तुला?

(राग- सोहनी; ताल- त्रिवट. चाल- काहे अब तुम.)
दुष्टपति सर्पा सदर्पा, कालकूटा वमसि भुवनासि अखिलाही तये जाळितोसि॥ ध्रु.॥
पितृमातृरुधिरी तृषित गमसि अति। कृतान्तासि भय निकट बघुनि तुजसि॥ 1॥

तळीराम
: दादासाहेब, तुमच्या बायका आम्हाला शिव्या देतात; ऐका!    (पितो.)

सुधाकर : सिंधू, शरद्, लाथ मारीन एकेकीला!

पुढे वाचा: एकच प्याला अंक तिसरा (प्रवेश चवथा)