गुरुवार, जानेवारी 18, 2018
   
Text Size

एकच प्याला अंक तिसरा ( प्रवेश तिसरा )

प्रवेश तिसरा

(स्थळ: रामलालचे घर. पात्रे: भगीरथ व शरद्)

भगीरथ : अगदी बरोबर आहे. हा लोकभ्रम निबंध, निबंधमालेतील एक अत्युत्कृष्ट म्हणून मानलेला निबंध आहे. ऐक पुढं... (स्वगत) वाचण्याच्या भरात मी काय वाचतो आहे आणि कोणापुढं वाचतो आहे, याचं मला भानच नाही! शास्त्रीबुवांचे कळकळीचे आणि प्रामाणिक हृदयाचे विधवांच्या स्थितीबद्दलचे हे करुणोद्गार मी वेडयासारखा या बालविधवेपुढं वाचीत सुटलो आहे! (उघड) शरद्, भाईसाहेब परत येण्याची वेळ झाली. आज आपण फार वेळ वाचीत बसलो, नाही? पुरे करावं नाही, मला वाटतं आता?

शरद् : (किंचित हसून) बरं, राहू द्या आता इतकंच आज.

भगीरथ : (स्वगत) हिनं हसून आम्हा पुरुषवर्गाचा चांगलाच उपहास केला म्हणायचा! या चतुर आणखी प्रेमळ मुलीपुढं मनाचे डावपेच मुळी चालतच नाहीत. (उघड) शरद्, तुझ्या हसण्याचा अर्थ मी समजलो. माझ्या मनातले विचार तू बरोबर ओळखलेस. शरद्, धर्मामुळं म्हण, रूढीमुळं म्हण, पुरुषांच्या स्वार्थबुध्दीमुळं म्हण, पण तुम्हा विधवांची हिंदू समाजात मोठी विटंबना चालली आहे, असं कोणत्याही प्रामाणिक मनुष्याला कबूल करावं लागेल.

शरद् : भगीरथ, संसारहानीच्या दु:खाबरोबरच या अपशकुनासारख्या गोष्टीच्या अपमानाचंही तीव्र दु:ख आम्हाला भोगावं लागतं-

(राग- बागेसरी; ताल- त्रिवट. चाल- गोरा गोरा मुख.)
मानभंग दाही। मृतशा हृदया॥ ध्रु.॥
दग्ध वल्लरी जाळी चंचला अदया॥ 1॥
गतपतितांचे जीवन जगती वाया॥ 2॥

भगीरथ : अगदी खरं आहे हे. आम्ही पुरुष विधवांच्या बाबतीत अगदी विचारशून्य होऊन त्यांच्याबद्दलच्या वाटेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार होतो, आणि तू सांगितलेल्या दुहेरी दु:खात लोकनिंदेची आणखी भर घालतो. एखादी विधवा सदाचरणी आहे या अगदी सहज रीतीनं शक्य असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवताना आम्हाला आमच्यावर मोठं संकट पडल्यासारखं वाटतं. एखाद्या बालविधवेनं एखाद्याला नुसता रस्ता विचारला तर बघणार्‍याला असंच वाटतं की, ती पापाचाच मार्ग विचारीत आहे! फार काय सांगावं, पाण्यात बुडून असलेल्या बालविधवेला एखाद्यानं हात दिला तर तो तिला बाहेर काढण्याऐवजी नरकात ढकलीत आहे, इतकं मानण्याची आमच्या आर्य मनाची वृत्ती होऊन बसली आहे! आणि बालविधवांनी जितेपणी या नरकयातनांत तळमळत पडून आयुष्य कोणत्या सुखात कंठीत राहावं म्हणून विचारलं, तर पोक्तबुध्दीचे हे धर्मसिंधू लागलीच गंभीरपणानं म्हणतील, की आप्तइष्टांची मुलं खेळवीत बसल्यानं विधवांना जे सात्त्वि समाधान होतं, त्यापुढं वैधव्याच्या यातनांची काय प्रौढी आहे? असं जर असेल तर मी म्हणतो, या विवेकशाली महात्म्यांनी, आपली द्रव्योपार्जनाची लालसा शेजार्‍यांचे रुपये मोजून का भागवू नये? पोटाची खळी भागविण्यासाठी पंचपक्वान्नांकडे धाव घेण्याचं सोडून परक्याच्या पोटात चार घास कोंबून आपलं समाधान हे का करून घेत नाहीत?

(राग- काफी; ताल- त्रिवट; चाल- मोरे नाटके प्रिया.)
सद्गुणा वधोनि हा! दंभ विजय मिरवी महा॥ ध्रु.॥
मोहपाशमेदना। ज्यांसि अल्पही शक्ती ना।
विरतीसी भोगी स्तविती। तोचि; काय विस्मय न हा॥ 1॥

पुढे वाचा: एकच प्याला अंक तिसरा (प्रवेश तिसरा)