गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

एकच प्याला अंक दुसरा ( प्रवेश पहिला )

अंक दुसरा

प्रवेश पहिला


(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सिंधू व सुधाकर.)

सिंधू : वन्सं गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होतं; म्हणून म्हणते की, अगदी गेलंच पाहिजे का आता बाहेर?

सुधाकर : अगं, जरूरीचं काम असल्याखेरीज का मी असा तातडीनं जात असेन? मला गेलंच पाहिजे आता! आणखी संध्याकाळी माझी फराळासाठी वाट पाहू नका.

सिंधू
: मी आल्या दिवसापासून पाहते आहे, नेहमी रात्री फराळाला बाहेर असायचं; एक दोन का तीनच वेळा काय ते फराळाला घरी राहायचं झालं तेवढं! विचारू मी एक? फार दिवस  माहेरी राहिले म्हणून रागबीग तर नाहीना आला? तसं असेल तर पदर पसरून भीक मागते.

(राग- मांड-जिल्हा; ताल- दादरा. चाल- कहा मानले.)
स्थिरवा मना। दयाघना। विनतिसी या माना।
होई पात्र न रोषा दीना। हृदयी करुणा आणा॥ ध्रु.॥
जाहला दोष मम करी चुकूनि काही। प्रेमला, क्षमा

तरि त्या करा। विनतिसी या माना॥ 1॥

सुधाकर : अगं, या सनदेच्या कामासाठी खटपट करायची असते तर चारचौघांकडे जाऊन, तेव्हा हिंडावं लागतं असं सारखं! कुणाच्या तरी घरी फराळाचा होतोच आग्रह. काम सोडून फराळासाठी घरी तर उठून यायचं नाही! रात्री दोन दोन वाजेपर्यंत बसावं लागतं आताशा! तेवढयावरून तुझा रागच मला आला आहे हे कसं ठरविलंस?

सिंधू : (रडत) मग बोलणं जरा असं त्रासिकपणाचं होतं, बाळाचं सुध्दा कोडकौतुक पुरविणं होत नाही!

सुधाकर : तुझ्याशी बोलणं मोठं पंचायतीचं काम आहे बुवा! किती वेळा सांगू की, माझं तुझ्यावर अगदी पहिल्यासारखं प्रेम आहे म्हणून! बाळाचं कोडकौतुक मी मनापासून- पण हे सांगायला तरी कशाला हवं! तुझं तुला दिसून येत नाही? बरं, आता रडू नकोस! उद्या मुदत संपून सनद मिळायची आहे- म्हणजे काम संपलंच म्हणायचं. जातो मी आता. उगीच काहीतरी तर्कवितर्क चालवायचे- त्यात स्वत:लाही त्रास आणि दुसर्‍यालाही त्रास! (स्वगत) रामलालनं तार करून एकदम बोलावून आणल्यामुळं हिला नसती काळजी वाटायला लागली आहे! हा रामलाल चांगला इंग्लंडला गेलेला. पण ही लढाई मध्येच मुळावर आल्यामुळं तसाच परतून आला. त्यामुळं ही नसती विवंचना माझ्यामागं लागली आहे. हा असा लपंडावच किती दिवस चालू ठेवायचा? (जातो.)

सिंधू : देवा, आता माझी सारी काळजी तुलाच!

(राग- तिलककामोद, ताल- एकताल. चाल- अब तो लाज.)
प्रणतनाथ! रक्षि कान्त। करि तदीय असुख शांत॥ ध्रु.॥
अशुभा ज्या योजी दैव। पतिलागी, त्या सदैव।
परिणभवी मंगलात॥ 1॥
(रामलाल व शरद् येतात.)

पुढे वाचा: एकच प्याला अंक दुसरा (प्रवेश पहिला)