गुरुवार, जानेवारी 18, 2018
   
Text Size

एकच प्याला अंक पहिला ( प्रवेश चवथा)

प्रवेश चवथा

(स्थळ : आर्यमदिरामंडळ. पात्रे: शास्त्री, खुदाबक्ष, मन्याबापू मवाळ, जनुभाऊ  जहाल,सोन्याबापू सुधारक, यल्लप्पा, मगन, रावसाहेब, दादासाहेब, भाऊसाहेब वगैरे
मंडळी. तळीराम प्रवेश करतो.)

शास्त्री : शाबास तळीराम, किती उशीर केलास यायला? खरं म्हटलं म्हणजे, तू तर सर्वांच्या आधी यायला पाहिजे होतंस. आज आपलं मंडळ स्थापन करण्याचा दिवस. तुझ्या हातून असा विलंब झाला तरी कसा?

तळीराम
: शास्त्रीबुवा, आज विलंब व्हायला तसंच कारण झालं; आज एक इतकी वाईट गोष्ट झाली की विचारू नका!

खुदाबक्ष : मग विचारल्यावाचून सांग!

 

तळीराम : खुदाबक्ष, खरोखरीच ही थट्टेची गोष्ट नव्हे! आज आमच्या दादासाहेबांची सनद मुन्सफांनी सहा महिने रद्द केली.

शास्त्री : दादासाहेब म्हणजे आपले सुधाकरपंत?

तळीराम : हो!

मन्याबापू : सुधाकर इतका शहाणा, सालस, असे असून असं त्याच्याकडून कारण कसं मिळालं?

तळीराम : मन्याबापू, तसे दादासाहेब तुम्ही म्हणता त्यापेक्षाही चांगलेच आहेत. पण त्यांचा स्वभाव फारच तापट आहे.

शास्त्री : तरण्या रक्ताला इतकी उसळी असायचीच.

तळीराम : ते खंरच; पण अलीकडे दादासाहेबांना शत्रूच फार होत चालले आहेत.

जनूभाऊ : कारण?

तळीराम : अहो, एखाद्याचं नव्यानं नाव होऊ लागलं म्हणजे सारा गाव त्याच्या वाईटावर असतो. आमच्या दादासाहेबांचं  बरं इथं कोणालाही बघवत नाही. चारचौघांनी चहूकडून चाव चाव केल्यामुळं ते अगदी चिडल्यासारखे झालेले.

जनूभाऊ : मग मुन्सफांनी मुद्दाम असं केलं म्हणतोस?

तळीराम : छे: छे:, मुन्सफांची तर मुळीच चूक नाही! असं कोण कुणाचं बोलणं सहन करून घेणार? झालं काय- कुठल्याशा मुद्दयावर यांचं म्हणणं मुन्सफांना पटेना; दादासाहेबांनी नीट समजावून द्यायला पाहिजे होतं; पण नव्या दमात एवढा पोच कुठून राहणार? हे रागारागानं बोलू लागले. चारचौघांनी हसून हेटाळणी करायला सुरुवात केली. झालं, दादासाहेबांचा सुमार सुटला, अन् मुन्सफाला होय नव्हे वाटेल ते बोलू लागले. तेव्हा मुन्सफांना असं करणं भाग आलं. तरी बरं म्हातारा पुष्कळ पोक्त, म्हणून सहा महिन्यांच्या मुदतीपुरतीच त्यानं सनद रद्द केली; दुसरा कोणी- अहो, मी असतो तरीसुध्दा जन्माचं संसारातून उठविलं असतं! हा एवढा प्रकार झाल्यावर मग काय? ज्यानं त्यानं दादासाहेबांची तोंडावर हेटाळणी करायला सुरुवात केली. त्या बिचा-याला मरणापेक्षा अपेश खोटं असं होऊन गेलं! शेवटी कसं तरी घरी आणून पोचविलं त्यांना; आणखी तडक इकडे निघून आलो. म्हणून वेळ लागला.

शास्त्री : अरे अरे, फार वाईट गोष्ट झाली. बरं, आधीच उशीर झालेला आहे; आता आणखी वेळ नको. करा कामाला सुरुवात. नाव काय ठेवायचं?

खुदाबक्ष : हे बघा, कामाला आणखी बैठकीला एकदम सुरुवात होऊ द्या.

तळीराम : ही मी काही टाचणं करून आणली आहेत. ती वाचून दाखवितो म्हणजे झालं. या संस्थेचं नाव 'आर्यमदिरामंडळ' असं ठेवावं.

पुढे वाचा: एकच प्याला अंक पहिला (प्रवेश चवथा)