गुरुवार, जानेवारी 18, 2018
   
Text Size

एकच प्याला अंक पहिला ( प्रवेश तिसरा)

प्रवेश तिसरा

(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सुधाकर, पद्माकर, सिंधू आणि शरद्.)

सिंधू
: (राग- मांड-गर्भा; ताल- दादरा. चाल- गोकुलमा लई.)
मानस का बधिरावे हे?। बघतसे खिन्न जगता॥ ध्रु.॥
गृहशृंखला या। दृढ बध्द पाया। बल ना भेद तया होता॥ 1 ॥

पद्माकरदादा, अजून माझं मन निघायला घेत नाही.

पद्माकर : सिंधूताई, अगदी नाइलाज झाल्यावाचून मी तरी इतका आग्रह धरला असता का? बाबांनी- स्वत: श्रीमंतांनीसुध्दा, इंदिराबाईंना पुष्कळ सांगून पाहिलं; पण पोरीच्या जातीपुढं इलाज चालेना! दादासाहेब, तुमच्या लग्नात तुम्ही पाहिलंच असेल, श्रीमंतांच्या आणखी आमच्या घराचा ऋणानुबंध किती आहे तो! इंदिराबाई म्हणजे संस्थानिकांची मुलगी, त्यातून एकुलती एक, पोरवय आणि नव्यानं सासरी जायला निघालेली. आमची सिंधूताई म्हणजे तिची जिवाभावाची सोबतीण. तेव्हा घेतला हट्ट, की सिंधूताईच पाठराखणी पाहिजे म्हणून! दादासाहेब, एक म्हण आहे, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट, विधात्यालासुध्दा पुरवावे लागतात, मग यांचा तिहेरी जोर एकवटल्यावर आपल्यासारख्यांची त्रेधा उडाली तर नवल काय? हा, सिंधूताईला लवकर परत पाठवावयाचं मात्र माझ्याकडे लागलं; शिवाय तिच्या वाढत्या जिवाची दगदग सोसायला आमची श्रीमंती तरी कुठं वर आली आहे? शरदिनीबाई, तुमचा ठरलाना विचार यावयाचा?

शरद्
: दादा-वहिनी काय ठरवतील ते खरं! दादा, जाऊ ना मी वहिनीच्याबरोबर?

सिंधू : वन्संना एकटयांना इथं ठेवून कसं चालेल? घरात बायकोमाणूस कुणी नाही. बरं, दिवसभर कोर्टात असावं लागणार. शिवाय भाई म्हणावा तोही इथं नाही.

सुधाकर : शरद्ला न्यायलाच पाहिजे. पण भाऊसाहेब, अगदी आजच निघालं पाहिजे का?

पद्माकर
: तुम्ही राहा म्हणावं, आणि मी जातो म्हणावं, अशातलं आपलं काही नातं नाही. पण आम्ही गिरण्यांचे मालक  म्हणजे लोकांना बाहेरून दिसायला सुखी असतो; पण खरं म्हटलं तर गिरणीचा मालक म्हणजे हजार यंत्रांतलं एक यंत्र असतो. ठरलेली चक्रं घेणं त्याला कधी चुकत नाही. म्हणून म्हणतो मला आजच्या आज निरोप द्या.

सुधाकर
: नाही, म्हटलं राहिला असता, तर तेवढेच चार दिवस बोलण्या-चालण्यात गमतीनं गेले असते. भाई गेल्यापासून मोकळेपणानं चार शब्द बोलण्याचं समाधानच नाहीसं झालं आहे.

(राग: देस-खमाज; ताल: त्रिवट. चाल- हा समजपिया मान मोरे.)
हे हृदय सुख-विमुख होई। मन खिन्न सतत,
भ्रमणनिरत शांती नाही॥ ध्रु.॥
श्वसन मित्र जणु, दुरी तो होता।
देही कसे चैतन्य राही॥ 1॥

पुढे वाचा: एकच प्याला अंक पहिला (प्रवेश तिसरा)