गुरुवार, जानेवारी 18, 2018
   
Text Size

एकच प्याला अंक पहिला ( प्रवेश दुसरा )

प्रवेश दुसरा

(स्थळ : तळीरामाचे घर. पात्रें : तळीराम व भगीरथ)

तळीराम
: (दोन्ही पायात बाटली धरून ओणव्याने बूच काढीत आहे.) म्हणे दारू सुटत नाही! एकदा घेतली म्हणजे सुटत नाही म्हणे! अन् तेवढयानं दारू वाईट! सुटत नाही म्हणजे बिशाद काय? घ्या! (दोघे पितात.) भगीरथ, दारूबद्दल बडबडणारांपैकी पुष्कळांना दारू ही काय चीज आहे हेच मुळी माहीत नसतं! बरं, मी म्हणतो, सुटत नाही, असंच गृहीत धरून चाला की, खरंच दारू एकदा घेतली म्हणजे सुटत नाही! पण तेवढयानं दारू वाईट कशी ठरते? भगीरथ, तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात. चार दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळविता, आणि ती जन्माची चिकटते खरी! म्हणून कुणी पदव्या घ्यायचं टाकलं आहे का? तशीच बायको!  एकदा नुसती माळ घातल्यानं उभा जन्म बायकोचा लबेदा बिलगतो ना? म्हणून बायका करायचं टाकलं का आहे? पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, मग दारूच तेवढी वाईट का?

भगीरथ
: तळीराम, या तीन गोष्टींचं एवढं साम्य जमलं म्हणून सर्वांशी तुलना कशी होईल? पदवी आणखी बायको यांचे परिणाम असे वाईट होतात का?

तळीराम
: यांचे परिणाम दारूपेक्षाही वाईट आहेत. असे कैक पदवीधर हात धरून मी दाखवून देईन की, पदवीचा नावापुरता पोकळ आधार नसता, तर त्यांना आपला मूर्खपणा जगापुढं मांडण्याची छातीच झाली नसती. दारूबाजाचं बरळणं दुस-याला उमजत नाही हे खरं; पण पदवीधराची बाष्फळ बडबड तर त्याची त्यालासुध्दा कळत नाही! इंग्रजी अंमल सुरू झाल्यामुळं आमच्या हतभागी देशात ज्या अनेक आपत्ती आल्या, त्यात पदवी आणि प्रेम या अग्रगण्य आहेत. पाठशाळेत पाऊल टाकून पदवीचा वेळ लागण्याबरोबर मुलाला मतं आणि मिशा फुटू लागतात. मताच्या मंडपीवर मूर्खपणाला मनमोकळेपणानं मिरास मिळते आणखी मिशांचा मोर्चा आकडयांच्या वळणावळणानं पोरीबाळींच्या प्रेमाकडे वळतो.

भगीरथ
: उदात्त प्रेमाची तुम्ही विटंबनाच मांडली आहे म्हणायची!

तळीराम : भगीरथ, तुम्ही एक प्याला घ्या आणखी. म्हणजे तुमच्या जिभेवरून हे 'उदात्त' वगैरे शब्द धुवून जातील. प्रेम हे हास्यास्पद नाही वाटतं? अहो, काव्यात कमल, नाटकात सूड, कादंबरीत भुयार, मासिक पुस्तकांत खास अंक, वर्तमानपत्रांत खास बातमीदार, संसारात प्रेम, औद्योगिक चळवळीत सहकारिता, सुधारणेत देशभक्तीत स्वार्थत्याग आणि वेदान्तात परब्रह्म यांचा धुमाकूळ माजला नसता, तर त्या त्या गोष्टींची थट्टा करायला जागाच उरली नसती.

भगीरथ
: हे राहू द्या. प्रेमाचे परिणाम दारूपेक्षा वाईट कसे होतात ते सांगा पाहू! सुंदर स्त्रियांच्या प्रेमापुढं या मदिरेची काय किंमत आहे?

पुढे वाचा: एकच प्याला अंक पहिला (प्रवेश दुसरा)