गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

पुण्यप्रभाव अंक पहिला (प्रवेश पहिला)

प्रवेश पहिला

(स्थळ: अरुंधतीनगरातील शिवालय. ईश्वर प्रवेश करितो.)

ईश्वर : (स्वगत) माझ्या प्रेमसंन्यासाने मला हा पुण्यप्रभावाचा मार्ग अचूक दाखविला नसता, तर अजूनही मन त्या वेडयांच्या बाजारातच रमत राहिले असते. परमेश्वरा, या हाताने स्वीकारलेले हे सत्कृत्य नीटपणे घडवून आण. माझ्या क्षणोक्षणी बदलत्या बुध्दीला तुझ्या थोरथोर भक्तांच्या एकनिष्ठेचे, तन्मयतेचे आणि स्वयंपूर्णतेचे सामर्थ्य देऊ न आखलेल्या मार्गापासून तिला केसभरही चळू देऊ  नकोस. भाग्यशाली भूपाल, वसुंधरेच्या प्राप्तीमुळे तुला मिळणार्‍या तुझ्या संसारसुखाची हा संन्यासी ईश्वर स्वप्नातही अपेक्षा करणार नाही. पण या हृदयाची गडबड अजून शांत होत नाही. या शिवालयाच्या दरवाज्याबाहेर वसुंधरेच्या येण्याची वाट पाहत मी उभा राहिलो खरा, पण वार्‍याच्या नुसत्या झुळकीमुळे उद्भवलेल्या झाडपानांच्या तरळत्या हालचालीसरशी, वाटेल त्या बाजूने वसुंधरा आल्याचा भास होऊ न मी वेडयासारखा स्वत:भोवती गिरक्या खात आहे तो कशाने? माझे मन इतके चंचल झाले आहे ते आज इतक्या वर्षांनी वसुंधरा पुन: भेटणार म्हणून उत्सुकतेमुळे, की तिच्याविषयीच्या ज्या माझ्या मनोवृत्ति पार मावळून गेल्या म्हणून मी अभिमान वाहत आहे त्यांच्याच खळबळाटामुळे? अजून या बाबतीबद्दल माझ्या मनाने एक उत्तर मिळत नाही. दुसर्‍याला फसविताना मनुष्याचे मन जी सावधगिरी वापरीत असते तीपेक्षा स्वत:चीच फसवणूक करण्यासाठी केलेले मनाचे डावपेच कितीतरी खोल असतात! पण या विचारांना आता आवरून धरिले पाहिजे; ही पाहा वसुंधरा देवळातून बाहेर येत आहे. अहाहा, हिच्याकडे पाहताच सारी चेतनाशक्ति डोळयात एकवटून मनातले विचारसुध्दा जागच्या जागी थबकून राहतात.

(वसुंधरा व मागाहून मुलाला कडेवर घेऊ न दामिनी येतात.)

वसुंधरा : दामिनी, दीनाराला घेऊ न येताना त्या पायऱ्यांवरून अशी घाईने उतरत जाऊ नकोस म्हणून तुला हजारदा सांगितले असेल, पण तुला काही राहवत नाही. तुझ्या चंचलपणाबद्दल सुदाम इतकं बोलतात ते एका परीने खरेच म्हणायचे!

दामिनी : बाईसाहेब, तुमचा स्वभावच भारी भित्रा!  तुम्ही अगदी काळजी करीत जाऊ नका. तुमचा दीनार तुम्हाला नुसता दीनारच आहे, पण आम्हा सार्‍या चाकरमाणसांच्या हृदयाचा हा हिरा आहे, समजला!

पुढे वाचा: पुण्यप्रभाव अंक पहिला (प्रवेश पहिला)