गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

भावबंधन अंक चवथा (प्रवेश पहिला)

प्रवेश पहिला
(स्थळ : स्मशान.  पात्रे : मनोहर.)

मनोहर
:    (स्वगत) प्रभाकराचा स्वभाव जरासा तऱ्हेवाईक खराच ! काय कल्पनेच्या भरात त्याने मला घनश्यामावर पाळत ठेवायला सांगितले हेच कळत नाही ! बरे, त्याचे म्हणणे न ऐकले तर लागलीच माथ्यात राख घालून बसायचा ! एव्हापर्यंत नीट पाहिले, घनश्याम रोजचे व्यवहार रोजच्याप्रमाणेच करीत आला. नाही म्हणायला रोजच्या राबत्यातला रस्ता सोडून आता या स्मशानातल्या ओसाडीवरून गेला एवढेच ! पण इतक्यात घनश्याम नाहीसा झाला कसा? पुन्हा गांवात तर गेला नाही ? असेच असेल; कारण या उघडया जागेत कुठे दडून बसायला एखादा आडोसाही नाही. घनश्याम तातडीने गावात गेला; पण मला तितकी घाई करून गावात जाण्याचे काय कारण उरले आहे ? या शांत स्मशानात मनाला अंमळ विश्रांती मिळणार नाही का? अरेरे, मालती, तुझ्या अवकृपेमुळे विश्रांतीसाठी मला हे स्मशान प्रिय वाटण्याची वेळ यावी ना ? झाली त्या दु:खदायक विचाराची सुरुवात ! छे:, स्मशानात सुध्दा विसाव्याची आशा नाही.
(राग - बहार, ताल - त्रिवट.)
व्यग्र चित्त झाले जरि या स्थलीं पसरली शांति मूर्ता ॥धु्र.॥
चिरनिद्रेच्छा येथ धरुनि जन पहुडति हो ती पूर्ण पूर्ता ॥1॥
विस्मृति पडते अभंग येथे दु:खांधांची आर्तधूर्तां ॥2॥
देहसुध्दा मनाने जिवंत असताना जित्या जगाच्या जाचण्या चुकविण्याच्या हेतूने आयुष्याचे शेवटचे टोक गाठण्यासाठी जितेपणीच एकदम या स्मशानात येऊन बसणे म्हणजे लवकर कालक्षेप करण्यासाठी घडयाळाचे काटे पुढे सरकवण्याइतकेच हास्यास्पद आहे ! पण आता माझ्यात जिवंतपणा तरी काय राहिलेला आहे ? मालतीने त्याग केल्यामुळे हा मनोहर तिने फे कून दिलेल्या या त्याच्या चित्राइतकाच निर्जीव झाला नाही का ? (चित्र खिशातून बाहेर काढतो.) दुर्दैवी चित्रा, तुझी आणि माझी सजीवता सारखीच. पण हे चित्र तरी मी कशाला जवळ ठेवले आहे? एका निर्जीव चित्राने आठवणीसह दुसर्‍याचा भार कशाला बाळगावा? हे चालतेबोलते देहाचे चित्र मला आज टाकता आले नाही तरी हे चित्र या स्मशानात कुठे तरी पुरून टाकून जितेपणीच एक प्रकारे स्वत:ची स्मशानयात्रा उरकता येण्यासारखी आहे. देतो एखाद्या दगडाखाली ठेवून झाले ! (इकडे तिकडे पाहून) अरे, पण या काळया दगडाच्या माळरानांत तो हिरव्या जातीचा दगड कुठला? काय बरे या दगडाच्या जातीचे नाव ? (हसून) पण मला आता या शास्त्रीय ज्ञानाशी काय करायचे राहिले आहे ? प्रेमाचा संसार सजविण्यासाठी मनुष्याला ज्ञानाची आवश्यकता असते, माझी प्रेमाची सृष्टी जळून गेल्यामुळे या माझ्या ज्ञानाची तरी मला काय अपेक्षा आहे ? जाऊ देत !  हे चित्र या हिरव्या दगडाखालीच पुरून टाकून माझ्या प्रेमाच्या सृष्टीतील ही शेवटची साक्ष आणि ज्ञानाच्या संपर्काचा हा शेवटचा विषय या दोघांचा एकवाक्यतेने कायमचा निरोप घेतो. आता  प्रेमही नको आणि ज्ञानही नको ! (हिरव्या दगडाकडे जातो.) वा: ! माती काढायला हा मोडका लोखंडी तुकडा बरा मिळाला ! काय गंजलेला आहे !  (दगड उचलून जमीन उकरू लागतो.) किती भुसभुशीत जमीन आहे ही ! अरे बाप रे, हा कसला आवाज ? हे काय आहे ? (डबा काढून) हा जस्ताचा डबा आहे ! (उघडतो.) आणि यात काही कागद आहेत ! (कागद पाहून) प्रभाकराचा तर्क बरोबर आहे. घनश्यामचीच ही सारी कुलंगडी ! आणि हेच पाहून जाण्यासाठी घनश्याम स्मशानातून गेला ! किती चमत्कारिक कल्पना डोक्यात एकदम खेळू लागल्या! आधी हे सर्व घेऊ न प्रभाकराकडे जावे. (उठून) माझ्या आशेसाठी खड्डा म्हणून खणायला गेलो, तो सुदैवाने तिचा पाळणा मात्र ठरू पाहात आहे !  लोकांच्या संसारसुखाचा स्मशानात शेवट होतो; पण या मनोहराच्या संसारसुखाचा स्मशानात जन्म व्हावा अशी तर दैवी योजना नसेल ना ? चला. अरे, पण मी वेडा तर नाही? हा दगड पुन्हा जशाचा तसा ठेविला पाहिजे. नाही तर घनश्याम पुन्हा इकडे फिरताच सारा प्रकार त्याच्या लक्षात यायचा ? (खळगा पुन्हा भरू लागतो. पडदा पडतो.)