गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

भावबंधन अंक तिसरा (प्रवेश पहिला)

प्रवेश पहिला

(स्थळ : स्मशान.  पात्रे : घनश्याम खड्डा खणीत आहे.)

घनश्याम :    (स्वगत) कल्पनेने खेळ बसवला, आणि तसा होतही चालला आहे.  महेश्वराने काम मात्र चोख बजाविले खरे ! मला फार धास्ती होती की, या फटिंगाच्या हातून एवढे जबाबदारीचे काम कसे उरकेल म्हणून ! बस झाला हा खड्डा! या संध्याकाळच्या वेळी या स्मशानात अशा अवताराने वावरताना मला कोणी पाहिले तर छाती हबकून जाईल बघणाराची ! वस्तुत: हे कागद या स्मशानात आणून दडविण्याचे तितके कारण नव्हते; पण या कागदांचे रहस्य या महेश्वराला माहीत आहे; तो कदाचित् या बाबतीत दुखावला जाण्याचा संभव आहे; आणि असे झाले म्हणजे न जाणो तो हे कागद हुडकायच्या नादाला लागायचा.  आजच काही त्याला माझ्या घरी मज्जाव करता येत नाही. तेव्हा इथेच हे कागद पुरून ठेवले म्हणजे भीतीमुळे महेश्वर स्मशानात यायची भीती बाळगायला नको ! त्यातल्या त्यात मुले पुरण्याच्या बाजूच्या विरुध्दची ही स्मशानाची बाजू तर फारच भयाण आहे ! या बाजूची ही पडकी भिंताडे, हे भेसूर वृक्ष, सारे काही पिशाच्चांनी पछाडल्यासारखे दिसते आहे ! एखाद्या मत्सरी मनुष्याला सूडाच्या त्वेषाने भरलेल्या दुबळया देहाच्या राखेवर बसून सैतानी समाधानाने हसतानाच काय तो या वृक्षांनी पाहिलेला असेल! दु:खाचे मात्र यांना काहीच वाटत नसेल ! पाहा, किती संथपणाने हे वृक्ष त्या जळत्या चितेकडे पाहात आहेत ! तेच आम्हा जित्या जीवांना या चितेकडे पाहताच काय वाटते ? त्या प्रेतदेहापेक्षा आमच्या मनालाच या चिताग्नीचा जास्त चरका बसत असतो. केवढा का कर्तबगार प्राणी असेना, शेवटी सरणावर भाजून निघण्याचे मरण काही त्याला टळत नाही. लाकडांच्या शेजेवर गोवऱ्यांच्या गिरद्या रचून, थंडगार पडलेल्या अंगावर आगीची भरजरी शाल पांघरून मलाही कधी तरी या उघडया रंगमहालात काळझोप घ्यावी लागणारच ! वा: ! काय भलत्या कल्पनांचे काहूर उत्पन्न झाले ! हृदयाची क्रिया बंद पडल्यामुळे एका क्षणाची आगाऊ  सूचना दिल्यावाचून तडकाफडकी, जगाची भाडोत्री वस्ती सोडून जाणार्‍या जीवाच्या प्रेतासाठी रचलेले सरण ढासळताना नीट करीत करीत सुध्दा काही लोक चिरंजीवांच्या संघटित सामर्थ्याने इमलेइमारती बांधण्याचा बेत करतात, तर लतिकेच्या शृंगारमंदिराचा हा पाया खणीत असताना मी तितक्याच वेडेपणाने या उघडया रंगमहालातल्या अखेरच्या झोपेचे स्मशानवैराग्य मनात आणीत आहे! तूर्त या विचारावांचून काही अडलेले नाही. मघाचा तो हिरवा दगड कुठे पडला? ठीक, आता हा धुंडिराजाचा कबूली जबाब, धनेश्वराचे हे खोटे कागद आणि माझी ही रोजनिशी ठेवावी या डब्यात! हो, पण हे कागद माझ्या हाती आहेत याची धनेश्वराला साक्ष पटवून देण्यासाठी ही एखादी खोटी  हुंडी विसारादाखल जवळ ठेवलेली बरी ! (एक कागद खिशात ठेवतो व बाकीचे डब्यात ठेवतो.) वा:, या एवढयाशा जस्ती डब्यात दोन थेरडे, दोन तरुण आणि दोन पोरी इतक्या जणांची कमनशिबे कोंबून भरलेली आहेत !  आता याची समाधी बांधून मोकळे व्हावे. (खड्डयात डबा पुरतो.) आता हा हिरवा दगड अर्धवट पुरून ठेवावा यात; म्हणजे हजारो दगडांच्या या माळरानात या जागेची खूण पटायला केव्हाही हरकत नाही. बस, झाले हे काम व्यवस्थेशीर. आता धनेश्वराकडे जाऊन मोकळया मनाने लतिकेबद्दल मागणी घालावी. त्याचप्रमाणे लवकरच महेश्वराला त्या घरातून बाहेर काढला पाहिजे. नाही तर बेवकूफपणाने तो भलतेच करून बसायचा ! परमेश्वराने त्याला डोके दिलेले आहे ते उपयोगासाठी नसून केवळ मनुष्यदेहाची परंपरा सांभाळावी म्हणूनच ! चला, हिरव्या दगडाची ही ठळक खूण असल्यावर या जागेच्या जास्त खाणाखुणा बारकाईने पाहात बसण्याची काही जरूर नाही.      (जातो.)