गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

वेड्याचा बाजार अंक तिसरा (प्रवेश पहिला)

प्रवेश पहिला

(यमुना व रमा भीत भीत येतात. माधवरावांची खोली)

यमुना :    हं, या आता लौकर आणि घ्या पाहून सारी व्यवस्था !

रमाबाई :    यमुनाबाई, माझ्या किनई उरात धडकीच भरली आहे !

यमुना
:    जाऊ बाई, भारीच भित्रा स्वभाव बाई तुमचा ! माधव भावोजी आता इकडे मुळीच यायचे नाहीत.

रमा :    त्याचा कुणी नेम सांगावा ! जर येणे झाले तर आणखी संतापायचे होईल ! काही नाही तर आज सातआठ वर्षे नाव टाकिले आहे; मग संतापाला कारण मिळाल्यावर तर काय होईल नी काय नाही ? म्हणून म्हणते, अजून चला माघार्‍या !

यमुना :    काही होत नाही नी जात नाही ! मला इकडूनअगदी चांगले सांगणे झाले आहे की माधवदादाला बाबांच्या जवळ बसवून ठेवितो, घरातील सारी माणसे तिथेच बसली आहेत, तेव्हा आता रमावहिनीला नेऊ न सारी जागा दाखीव म्हणून ! आता तर झाले ना ? आणखी मी सुध्दा येताना पाहिले तर माधवभावोजी मामंजींच्या पायाला तेल चोळीत बसले आहेत ! ते काही इतक्यात इकडे येत नाहीत !

रमा :    खरेच, मामंजींची तब्बेत एकदोन दिवसात इतकी कशी बरे बिघडली ? पुण्यास बरे होते ना अगदी ?

यमुना
:    अहो, बिघडली कशाची ? वसंतदादाची आणि इकडची सारी खटपट! वसंतदादाने दिलेले कसलेसे औषध इकडून मामंजींच्या तळपायाला लावायचे झाले ! त्याचा मामंजींच्या पायात आला बळंघा ! झाले, पिलंभटाने मेलेला उंदीर घरात टाकलाच होता, मामंजींना आणखी ते काय हवे ! लागलीच ते घायकूत होऊन बसले! एकदां त्यांच्या मनात संशयाने घर घेतले की, झाले ! इकडचा सूर्य तिकडे होईल पण त्यांचा संशय काही दूर व्हावयाचा नाही !

रमा
:    पण इतके करून पुढे काय करायचे ते नाहीच सांगितले मुळी !

यमुना :    अहो, ते सारे सांगत बसले तर भारत होईल आणि इथे तर कुडालासुध्दा कान फुटायचे ! वेणू वन्संनासुध्दा यातले अगदी अवाक्षर माहीत नाही. त्या आहेत हळव्या मनाच्या ! फटदिशी बोलून जायच्या ! वसंतदादाच बैरागी होऊन येणार आहे हे सुध्दा त्यांना ठाऊ क नाही.

रमा :    वसंतरावांचे करणे तरी अघटितच ! बायकोसाठी बैरागी होणार?

यमुना :    आणि बैराग्यासाठी बायको आणणार हे नाही म्हटलेत कुठे ! बरे, ते राहू दे. सध्या आले पायापुढचे पाहिले म्हणजे पुरे झाले. ही पाहा दाराची कडी; बाहेरच्या बाजूने या बिजगर्‍या खिळखिळया केल्या आहेत. त्या फिरविल्या म्हणजे कोयंडा मोकळा होईल. तो तुटला की त्याला बांधलेला तो दोर सैल सोडा, म्हणजे कोयंडा हळूहळू खाली येईल; घाई केलीत तर आवाज होईल ! आले लक्षात ! वसंतदादाने टाळी वाजवून खूण दिली की हळूच या युक्तीनं दार उघडून आत शिरा. दार लावून घ्या आणि या पडद्यामागे उभ्या रहा. पुढे काय करायचे आणि कसे बोलायचे हे काही सांगायला नको. भिऊबिऊ नका म्हणजे झाले !

रमा :    काय होईल ते खरे ! माझे मन आपले सारखे मागते पाऊ ल घेते.

यमुना
:    अहो, होणे जाणे दैवाधीन ! प्रयत्न आपल्या हाती, तेवढा करून पाहावयाचा झाले. चला आता. सांगितलेले नीट लक्षात ठेवा.    (जातात.)