गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

वेड्याचा बाजार अंक दुसरा (प्रवेश पहिला)

प्रवेश पहिला

(भिंतीवरून उडी मारून बाळाभाऊ  येतात.)

बाळा :    काल मधुकराने वेणूला पाहायला येण्यासाठी मला बोलाविले; पण अशा राजरोस रीतीने येण्यात काय अर्थ ? कुठल्याही कादंबरीत, नाटकात नायक-नायिकेला त्यांच्या भावांचे किंवा बापाचे साह्य किंवा संमति मिळाली आहे का ? असे साह्य मिळते तर कित्येक कादंबऱ्यांचा पहिल्या प्रकरणातच शेवट झाला असता आणि बहुतेक नाटके नाटकातल्या पाच अंकांऐवजी उजळणीतल्या पाच अंकांतच आटोपली असती ! प्रेमाची खरी लज्जत चोरटेपणातच आहे; पण या अरसिकांना त्याची काय किंमत ? तिच्या-नाही, माझ्या प्रियेच्या बापाची, भावाची निदान आईची जरी आमच्या विवाहाला आडकाठी असती तर आमच्या या प्रीतिविवाहाला नाटकाचे किती सुरेख स्वरूप आले असते. तरी माझ्याकडून मी किती सावधगिरी ठेविली आहे. मोहनतारेतल्या मोहनाप्रमाणे, प्रियेची बागेत चोरून भेट घेण्यासाठी या भिंताडावरून उडी मारून मी आत आलो. किती त्रास पडला मला. माझा ढोपर फुटून पाय अगदी जायबंदी झाला. मोहनचा काही ढोपर फुटला नाही. नाटकातले नायक भाग्यवान् खरे ! उडया मारताना त्यांचे ढोपर फुटत नाहीत. कित्येक जखमा लागल्या तरी त्यांना दु:ख होत नाही. जेवणाखाण्याची त्यांना ददात नाही ! नाही तर हल्लीचे नीरस जीवित ! ढोपरं फुटतात. पण नाही, असे भिऊ न उपयोग नाही. प्रेमात संकटे तर यायचीच. (पाहून) अरे, पण माझ्या येण्याचे सार्थक झालेसे वाटते. कारण-

ही सुरसुंदरी जणुं खाली । उतरोनी भूवरि आली ॥
ती ही गगनिची रंभा उर्वशिकीं ।

पण, ही सुंदरी केर टाकण्याकरितां येत आहे, त्या अर्थी ही ती नसावी. कुठल्याही नाटकात, काव्यात, कादंबरीत, नायिका केर वगैरे टाकिताना दृष्टीस पडली नाही. ही तिची एखादी मोलकरीण. चुकलो, मोलकरणींना काव्यात जागाच नाही - तिची एखादी दासी किंवा निदान सखी असावी ! (निरखून पाहून)  पण, छे, माझी शंका निराधार आहे ! हीच ती माझी प्रिया. कारण-

सुवर्ण केतकी परि जो दिसतो वर्ण नव्हे तो दुसरीचा ॥
सडपातळ हा नाजुक बांधा खचित त्याच मृदुदेहाचा ॥ वगैरे

अरेरे, कोण भयंकर हाल हे ! कोणत्याही सुंदर स्त्रीवर असा दुर्धर प्रसंग आला नसेल. ही सुंदरी केर टाकणार ! परमेश्वरा, हे पाहण्यापेक्षा मी अंध का नाही झालो? हे काय पहायाचे नशिबी आले ! प्रभू विचित्र किती तव चरित्र तर्क न कोणाचा चाले ॥ कोमल शकुंतलेला झाडांना पाणी घालायला लावणार्‍या त्या थेरडया कण्वापेक्षा हिचा थेरडा फारच अविचारी असला पाहिजे. करू का सूड घ्यायची प्रतिज्ञा ? लाडके, सुकुमार वेणू, टाक, टाक तो केर खाली; पण हे काय? या केराकडेच माझी नजर इतकी का बरे लागत आहे? हं, मोहनतारेत तारेच्या हातांतल्या घागरीप्रमाणे आपणही फुंकलो गेलो असतो तर फार बरे झाले असते असे मोहनला वाटले तसेच मलाही वाटत असले पाहिजे. अहाहा, मी जर असा केर होऊन झाडलो गेलो असतो तर आणखी काय पाहिजे होते? बा केरा, धन्य आहेस तू. हा केर ज्या उकिरडयावर पडेल तो उकिरडा धन्य, त्याच्यावर लोळणारा गाढव सुध्दा धन्य धन्य! त्रिवार धन्य ! त्या केरांतला कागदाचा फाटका तुकडा मला प्रणयपत्रिकेसारखा वाटतो; त्यातली धूळ हीच अंगारा. (तिच्याकडे पाहात राहतो.)

वेणू :    (स्वगत) जरा कुणाचे पाऊ ल वाजले की कोणी मला पहायला येत आहे असे मला वाटते. वहिनीने मला इतका धीर दिला खरा, पण तिचे बापडीचे तरी काय चालणार ? असो, नशीब आपले, जे व्हायचे असेल ते होईल. आता देवासाठी चार कळया तरी काढून ठेवाव्या.
(राग-पिलु. ताल-त्रिवट.)
कलिका करिती केलि का गणिति न नाशास कां ? ॥धृ.॥
आत्मार्पण करुनी ईशा मजही सूचवीति कां ? ॥1॥
(फुले काढू लागते.)

पुढे वाचा: वेड्याचा बाजार अंक दुसरा (प्रवेश पहिला)