गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

पुण्यप्रभाव अंक चवथा (प्रवेश पहिला)

प्रवेश पहिला
(स्थळ : वृंदावनाचा महाल; वृंदावन निजला आहे. कालिंदी प्रवेश करिते.)

कालिंदी
: (स्वगत) नाथांनी शपथेवर सांगितले, पण माझ्या मनातली कसकस अजून हटत नाही! त्यांच्या मनाची आज दोन दिवस अशी दारुण दशा झालेली दिसते, की त्यांनी कुठल्या तरी घोर विचाराचा निश्चय केलेला असावेसे वाटते! माझ्याशी घाईत एखाददुसरा शब्द बोलून ते माझ्यापासून दूर होतात! किंकिणीने पुन्हा आताच सांगितले, की दीनाराचा घात करण्याची नाथांनी शपथ घेतली आहे म्हणून! असे अघटित पातक त्यांच्या हातून झाले तर कल्पान्तापर्यंत तरी त्यांच्यावर देवाची कृपा होईल का? मनाचा धडा करून, साता जन्माची पुण्याई एकवटून, मी त्यांना या पातकापासून परत फिरविण्याचा पुरता संकल्प केला आहे! (पाहून) नाथांना झोप लागल्यासारखी दिसते; अगंबाई, पण ही कसली झोप? तोंड किती भेसूर दिसते आहे! या पापविचारांनी मनात खळबळ उडविल्यामुळे झोपेतही यांच्या निर्मल मनाला अशा यातना भोगाव्या लागत आहेत! देवाधिदेवा, पाचा बोटांनी तुला कधी मनोभावे पुजले असेल तर आज मला प्रसाद दे! मला आज बोलण्याचे बळ दे !

वृंदावन : (झोपेत मोठयाने) वसुंधरे, अजून तरी हा हार माझ्या कंठात घाल; दीनाराचे प्राण आता कंठाशी आले आहेत! एकदा ही कटयार दीनाराच्या पोटात शिरली म्हणजे तिला सुखाने बाहेर काढणे काळाच्याही हाती राहणार नाही! नाही ऐकत तू? डोळे फाडून नीट पाहा, ही कटयार एकदम-(दचकून) कोण तू? कालिंदी? कालिंदी, दीनाराच्या आणि माझ्यामध्ये येऊ नकोस! दीनारला मारण्याबद्दल मी माझ्या मातेची शपथ घेतली आहे! दूर हो, दूर हो; काय म्हणतेस? हा दीनार नाही, आपला केतन आहे! या वेळी मला तुझ्या केतनची काय किंमत! लाथेने त्याला असा वाटेतून उडवून टाकीन. (कालिंदी त्याच्या जवळ येते.) आणि तुझा असा हात धरून (हात पुढे करितो व कालिंदीचा हात धरितो. एकदम दचकून जागा होतो.) काय? खरोखरीच कालिंदीचा हात माझ्या हातात?

पुढे वाचा: पुण्यप्रभाव अंक चवथा (प्रवेश पहिला)