गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

पुण्यप्रभाव अंक दुसरा (प्रवेश पहिला)

प्रवेश पहिला

(स्थळ : सुदामांचे घर. दामिनी प्रविष्ट.)

दामिनी : (स्वगत) या मेल्या जोगडयांना किमया करिता येत नाही, मग हे घरेदारे सोडतात तरी कशाच्या जिवावर? आजवर खंडीभर सोळभोक भेटले, पण सारे फुकट! कुणी देवाचे नाव आळवतो तर कुणी समाधीतच डोलत बसतो. उगीच मेल्यांच्या खस्ता खाल्ल्या, अंगारेधुतारे केले, आवशीपहाटे वडापिंपळाभोवती घिरटया घातल्या; तिकडच्या मनात वेडेवाकडे आले तरी तशीच आपली निगरगट्टपणाने नेमधर्म करीत राहिले; जवळचे किडूकमिडूकसुध्दा मेल्यांच्या भरीला घातले. सारे सारे व्यर्थ गेले! म्हटले एखाद्या तरी ठिकाणी मनमागते मिळाले तर अंगाखांद्यावर एकदा सगळा साज-अगदी बावनकशी सोन्याचा आणि करवंदांएवढाल्या मोत्यांचा सगळा साज घालून चारचौघींना दाखवून येईन! खोटे दागदागिने केले तर वेळेवर भलतेच हंसे व्हायचे! वसुंधराबाईंजवळ मागेन म्हटले तर पोरीबाळीसुध्दा हिणवून पुरेसे करतील, की या गावगौरीला हे भिकेचे वाण कुणी वाहिले म्हणून! बरे, तिकडून मिळविण्याचे तर नावच नको! चाकरीसाठी सुध्दा घराबाहेर पडायचे होत नाही संशयी स्वभावामुळे! कालचे ते ईश्वर मोठे साधू असावेत; नाही तर बाईसाहेब कुठल्या आल्यागेल्याशी बोलत बसायला? त्यांचे पाय धरावेत झाले! म्हणेन, सारी पुण्याई खर्च करा, पण मला एकदाचा सगळा साज मिळवून द्या! दार वाजले आणि कडीही वाजली. स्वारी आली वाटते? (नुपूर येतो.) आत जाऊन बसावे-नाहीतर आपले-अगंबाई, तुम्ही कोण?

पुढे वाचा: पुण्यप्रभाव अंक दुसरा (प्रवेश पहिला)