मंगळवार, डिसेंबर 12, 2017
   
Text Size

पुनर्जात प्रेमास


प्रेमा ! उठ - चल उघड, झाकली मूठ !
तुंबळ सागर तव खळबळला,
हृदयीं तटवूं त्यास कशाला ?
जगभर लाटा उधळायाला
दिली तुज सूट - चल उघड, झाकली मूठ !
कोंडुनि असला सागर धरिला,
माझा मूर्खपणा मज कळला,
मिळता स्थल तुज नाचायाला
करीं रे लूट - चल उघड, झाकली मूठ !
क्षणभर वाटत होतें मजला,
कीं तव ओघ आटुनी गेला,
परि जो अखंड भरला त्याला
कशाची तूट ? - चल उघड, झांकली मूठ !
उगवे सूर्य काल मावळतां,
फिरुनी फुलतें फूलहि मिटतां,
प्राणजीवना, तुजही शिवतां,
मरण हें झूट - चल उघड, झाकली मूठ !
द्वेषावरतीं, दु:खावरतीं,
फिरवी तुझ्या यशाची महती,
जा, जा, नाच सर्वहि जगतीं,
धांव बेछूट - चल उघड, झाकली मूठ !
विसरुनि जाऊं अनुभवजाला,
तुडवूं पायीं चल खेदाला !
टाकूं जाळुनि नैराश्याला !
दु:ख सब् झूट । - चल उघड, झाकली मूठ !
तुझिया श्वासाच्या उद्गारें
टाकूं भरुनी जग हें सारें,
एकच नादें करुं आतां रे,
सुखाची लूट-चल उघड, झाकली मूठ ।
मी तूं दूर न राहूं आतां,
दाखवुं शक्ती अपुली जगता,
आणूं परमेश्वरही हातां,
ऊठ रे ऊठ - चल उघड, झाकली मूठ !