गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

सुखदु:ख


''सुखदु:खांच्या द्वैतामधुनी दु:ख सदा वगळावें;
सुख सेवावें.'' हीच वासना सामान्यांची धांवे, 1

एक पायरी चढतां वरतीं मानवता मग बोले,
''सुखदु:खांची समता आहे; एकानें नच जग चाले,'' 2

सदा भरारी गगनीं ज्यांची ऐसे कविवरही वदती,
''संसाराच्या गाडयाची ही दोन्ही चाकें जणुं असती ।'' 3

परि सुखदु:खां पुढे टाकुनी वदतां ''घे जें रुचे तुला,''
अचुक सुखाला उचली मानव; दु:खा त्याची न ये तुला. 4

यापरि जगतीं सुखदु:खांचें खरे मर्म ना कळे कुणा,
रुचे मला तर दु:ख सुखाहुनि: वेडा वाटे तरी म्हणा ! 5

सुख निजभोगी नरा गुंगवी विसर पाडितें इतरांचा,
दु:ख बिलगतें थेट जिवाला; ध्वज फडकवितें समतेचा. 6

सुख उद्दाम करी आत्म्याला ओळख ज्याची त्या नसते,
कोण कुणाला पुसते जागिं या दु:ख जरि मुळीं ना वसतें ! 7

गर्भवासगत अंधपणानें दिशाभूल होवोनी,
परक्या ठायीं आत्मा आला स्वस्थानातें त्यजुनी. 8

परमात्म्यापर्यंत तयाला पुन्हा असे जें जाणें,
नांव तयाला दिलें गोडसें की 'जीवाचें जगणे.' 9

परि 'जगणें' ही मुदत ठरविली मूळपदा जायाची
सदा चालतां आत्मा तरिही मजल न संपायाची . 10

इष्ट पदा ने दु:खभोग हा प्रवास आहे आत्म्याचा
विश्रांतीचा मुकाम अगतिक काळ जात जो सौख्याचा  11

दु:ख असे कर्तव्य; तयाची जाणिव पटते जीवाला,
इंद्रियांस वरच्यावर शिवुनी सौख्य जातसे विलयाला. 12

मजल मारणें इष्ट जयाला ठरलेल्या मुदतीमाजीं
प्रवास दु:खांचा भोगाया त्यानें व्हावें राजी. 13