गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

स्मरणसृष्टि


प्रेमाचे ते जीव ॥ दयाळा ॥ आज कुठें दाखीव ॥
काय न ये तुज कींव ॥ धृ. ॥

प्रेमरसाचे हृदयभूवरीं वाहत होते पाट ॥
पाट कोरडे आज; खडकाची चिखलाचे घनदाट ॥ 1॥

प्रेमनदासह आज बाळपण वाहुनि गेलें दूर ।
जें सुखकारक तेंच दु:ख दे; स्मरण लावि हूरहूर ॥2॥

अश्रु वाहती, दु:खस्मृतिचें मूर्तरुप हें जाण ॥
शोधुनि बघतां त्यांत जीव ते, नलगे ठावठिकाण ॥3॥

नवतेचा बाहेर आड हा ! स्मृतिची हृदयिं विहीर ।
दीन मनानें कुठें लपावें? प्रभो, तुटे रे धीर ॥4॥

दु:खद जीवन आज कंठितो; पुढेंहि दिसतें तेंच ॥
अमृतसुखाचा बालकाल तो; प्रभु,ने मज मागेंच ॥5॥

प्रेमनदाचीं पात्रें हृदयी वाळुनि झालीं कोळ ॥
नातरि त्यांतचि जाउनि मरतों करुनि जिवाचा घोळ ॥6॥

तारुण्याचें सौख्य निराळें असेल बहु तें गोड ॥
बाळसुखाच्या स्मृतिचीही तरि अधिक जिवाला ओढ ॥7॥

या सौख्यातें सेवित असतां सेवनींहि ये वीट ॥
त्या सौख्याची दु:खस्मृति वरि; दगडाहुनि मउ वीट ॥8 ॥

हृदयस्मशानिं मृत लीलांना जाळुनि केल्या खाक ॥
दीप स्मृतिचा जळक्या जागी दावित आतां राख ॥ 9 ॥

प्रसंग नाना, सुगंधि सुमनें शिशुतालतिकेचीं ॥
दाव मनाचा फत्तर त्यांवर सुख हें अत्तरची ॥10॥

फार सुंगधी अल्पजीवि तरि क्षणांत उडुनी जात ॥
स्मृतिरुपानें दिगंत पसरे मिसळुनि या पवनांत ॥11॥


मायेची ही जादू जमवी त्या चंचल पवनास ॥
स्मरणसृष्टि ही दिसे एकमय चित्ताच्या नयनास ॥12 ॥

अहा! तेच हे जीव लाडके !जमुनी त्यांचा मेळ ।
अवकाशाच्या रंगावरि करि बाळपणाचा खेळ ॥13 ॥

स्मरणसृष्टिचा असा पसारा अद्भुत देवा फार ॥
जडसृष्टीचें जाळुनि गाळुनि काढियलें जणुं सार ॥14 ॥

अवकाशाचें राज्य तयांना; इच्छेचा अवतार ॥
जीव विदेही, खूण पटवि तरि वायूचा आकार ॥15॥


भूतकाळच्या रेषा गिरविति; एकच काळ तयांस ॥
एकच; तोही सान्त काळ; स्मृति अडवी त्याचे तास ॥16॥

उडविति घडलें जें जें, जोंवरि जीवाची हो सुटका
भविष्यकाळा वाव न; त्याचा कडा दिसतसे तुटका ॥17॥

जडसृष्टिचीं चित्रें वठली का ही आकाशांत ॥
कीं वायूवर ठसा उमटवी घडलेला वृत्तान्त ॥18॥

अथवा प्रसंग ते नयनांनी गिळिले जे घडतांच ॥
निजकिरणांनी तेच उगळिले बसतां हृदया आंच ॥19॥

भिन्न कालिंचे, भिन्न स्थलिंचे जीव दिसति हे सांग ॥
ओळख त्यांची परस्परांना पटते का रे सांग ॥20॥

अनुभविति का गतलीलांतें फिरुनी तेच हे जीव ॥
अवताराची अपुल्या त्यांना आहे का जाणीव? ॥21॥

स्मरणसृष्टिला पटे खूण जरि तरि मजही दीनास ॥
स्मृतिरुपानें तींत रमूं दे; विरुनि टाकि देहास ॥22 ॥


माझी सृष्टिच जातां झालों जिवंतपणिं मी भूत ॥
बांधितसे मज येथें नसत्या आशेचें हे सूत ॥23 ॥

तोडूनि त्यातें, ने मज देवा, त्या माझ्या मित्रांत ॥
नको जाळुं हा देह यावरी जगताच्या सत्रांत ॥ 24 ॥