गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

दैवाची निर्दयता


श्रीहरि मथुरानगरीं गेले, गोकुळ मागें तळमळतें।
प्राणिमात्र नच केवळ, परि तें यमुनेचें जळही जळतें ॥
कळे सकळ हें श्रीगोपाळा कळवळुनी मनि आणि दया ।
धाडुनि दिधला व्रजांत उध्दव प्रियजनसांत्वन करावया ॥
सत्वर हरिचा निरोप घेउनि उध्दव भेटे सकळांते ।
वृत्तश्रवणा क्षणांत जमलें गोकुळ सारे त्याभवतें ॥
हें नंदाला, यशोदेस हें, कोणाला कांही कांही ।
निरोप सांगे सांत्वनपर तो; सुनें कुणी उरलें नाही ॥
या गोपीला, त्या गोपीला, गोड शब्द दे वांटुनिया ।
राधेला तर बहाल केली हरिनें जीवाची दुनिया ॥
प्रेमकथांच्या संस्मरणानें जल सर्वांच्या ये नयनां ।
व्याकुळ विव्हळ झाली राधा, सांवरितां हो पुरे जनां॥
सुखदु:खांच्या मिश्र सागरीं निमग्न गोकुळ सर्व असे ।
परि दुर्दैवी एक जीव तो त्या काळीं त्या स्थळी नसे ॥
अष्टवक्रा, काळी, कुबडी, कुब्जा तेथे नच दिसली ।
दीन बिचारी एकटीच ती कुठें तरी जाऊनि बसली ॥
स्मरण कशाचे तिचें कुणाला जी बघवेना डोळयांनीं ।
गजबजतां जग आनंदाने दुर्दैवी पळती रानीं ॥
तोंड झांकुनी, ओंठ दाबुनी, रडे आंतल्या आंत मनी ।
पुसुनी टाकी झणि पदरानें अश्रू आले जरि नयनीं ॥
'' प्रेमळ देवा, जिवलग देवा, माझ्यी जीवाच्या देवा, ॥
कसे विसरलां दासीला? देवा हो, एकच देवा ! ॥
कशी विचारुं उध्दवजींना क्षेम तुझें या लोकांत ? ।
म्हणेल कोणी काय मला हें त्या न कळे भर आनंदांत?॥
सुंदर गोपी योग्य रडाया जगन्मोहना तुजसाठी ।
परी कुठे मी ? अणि कुठें तूं? लोकसुंदरा जगजेठी ॥
रडायासही मुक्तकंठ हा देवा रे जीवचि लाजे ।
श्रीहरिसाठी कुब्जा रडते हेंच हंसे होईल माझें  !'' ॥
अनुष्टुभ्
घडेना कार्य या लोकीं भाग्यावांचूनि कोणतें ।
हंसायातेंच न परी रडायाताह लागतें ॥
असावें लागतें भाग्य हंसायातें न काय तें ।
रडायातेंही जीवाचें या लोकीं भाग्य लागतें ॥
-    2.1.1918, मुंबई .