गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

तीन तरी


( जीवनाच्या काव्यांत जर, तर, पण, परंतु ही इच्छेला विरोध करणारी उभयान्वयी अव्ययें दुबळया मनुष्याला विश्वनियंत्या ईश्वराशीं जोडीत असतात.)

चल, सख्या जिवा रे, पुन्हां घरी। कां उगाच फिरसी पिशापरी ? ॥धृ.॥

पाय लागुनी कांच तडकली । पुन्हा जोडणें कुणी तरी,
ती कशी तरी कीं कधीं तरी ॥ चल. ॥1॥

कळस देवळावरला ढळला । पुन्हा बसविणें कुणी तरी,
तो कसा तरी कीं कधी तरी ॥ चल. ॥2॥

वेजीं उतरे मोतीदाणा । पुन्हा सांधणें कुणीं तरी,
तो कसा तर कीं कधीं तरी ॥ चल. ॥3॥

हार घेउनी घार पळाली । पुन्हां आणणें कुणीं तरी,
तो कसा तरी कीं कधीं तरी ॥ चल. ॥4॥

लवून गेली बहार बिजली । पुन्हा पाहणें कुणी तरी,
ती कशी तरी कीं कधीं तरी ॥ चल. ॥5॥

लाट जळांतरि पळांत जिरली । पुन्हा चढविणे कुणीं तरी,
ती कशी तरी कीं कधीं तरी ॥ चल. ॥6॥

सूर विराला वार्यावरतीं । पुन्हां छेडणें कुणी तरी,
तो कसा तरी कीं कधीं तरी ॥ चल. ॥ 7॥

पळे सपाटीवरती पाग । पुन्हां बांधणे कुणी तरी,
तो कसा तरी कीं कधीं तरी ॥ चल. ॥ 8॥

घडूं नये ते घडून गेले । पुहा घडविणें कुणी तरी,
तें कसें तरी कीं कधीं तरी ॥ चल. ॥9॥

'गोविंदाग्रज' बघे सदाही । या संसारी नवलपरी,
कीं तरीमागुनी तीन तरी ॥ चल. ॥10॥
19.4.1917, पुणे.