मंगळवार, नोव्हेंबर 21, 2017
   
Text Size

समाजात नटाची जागा

हवेत उष्णता किती आहे हे समजण्यासाठी जसे उष्णतामापकयंत्र (Barometer) असते त्याचप्रमाणे समाजात प्रत्येक मनुष्याची अगर त्याच्या व्यवसायाची योग्यता किती आहे हे समजण्याचेही एक यंत्र आहे. लोकशिक्षणाच्या पार्‍यावर या यंत्राची रचना झालेली आहे. मनुष्याच्या कृतीत अथवा व्यवसायात हेतूपूर्वक वा यदृच्छाया हा लोकशिक्षणाचा पारा ज्या प्रमाणात खाली-वर स्थित असेल त्या प्रमाणात समाजात त्याची कमी-अधिक योग्यता ठरत असते. लोकशिक्षणाचा पर्यायाने 'परहित' हा जरासा व्यापक परंतु सयुक्तिक असा अर्थ घेतल्यास वर सांगितलेल्या योग्यतामापक यंत्राचे सुंदर व मार्मिक शब्दचित्र भर्तृहरीच्या 'एते सत्पुरुषा: परार्थघटका:' एकदादि लोकविश्रुत श्लोकांत सापडते. या दृष्टीने पाहू गेले असता केवळ 'जगाच्या कल्याणा' उपकारे देह कष्टविणार्‍या 'संतांच्या विभूती' समाजातील अत्यंत उच्चतम स्थानी बसाव्या लागतात. निरपेक्ष लोकशिक्षण हाच असल्या विभूतींच्या आयुष्याचा प्रधान हेतू असतो. यांच्या प्रत्येक कृतीत लोकांस सज्ञान करण्याचा हेतूच प्रमुखत्वाने दिसून येतो. स्वहिताची यास तिलमात्र पर्वा नसते. स्वत:च्या अज्ञानाच्या सम्यग् ज्ञानातच यांच्या ज्ञानाची संपूर्ती होते आणि स्वार्थावर तिरस्काराने लाथ मारताक्षणीच यास अनपेक्षितरित्या खर्‍या स्वार्थाची प्राप्ती होते. तेव्हा जगत्सूत्रधरप्रयुक्त विश्वनाटकाच्या प्रेक्षक समुदायात साधुसंतांनाच 'रिझर्व्हड्'च्या जागा देणे रास्त आहे. यांच्यानंतर ज्यांचा व्यवसायच लोकशिक्षणात्मक असतो ते लोक येतात. हे लोक स्वत:च्या विशिष्ट कर्तृत्वाच्या जोरावर पुढे येऊन लोकशिक्षणाच्या निरनिराळया बाजू आपल्या अंगावर घेत असतात. परंतु यांची लोकसेवा पुष्कळशा अंशी सापेक्ष असते. हे आपण केलेल्या लोकसेवेबद्दल समाजाजवळ काहीतरी वेतन मागतात. यांची जीवनार्थवृत्ती व लोकशिक्षण ही अगदी 'वागर्थाविव' संपृक्त व अतएव परस्परांपासून अभेद्य अशी असतात. त्या दोहोंमध्ये कार्यकारणभाव असतो. त्यांच्या जीवनकलहार्थ प्रयत्नातच लोकसेवेचा संभव असतो. साधूसंतांच्या निरपेक्ष लोकसेवेपुढे यांची सापेक्ष लोकसेवा फिक्की पडते व म्हणूनच समाजात यांच्या वाटणीस दुसर्‍या प्रतीची जागा येते. कवी, ग्रंथकार, वर्तमानपत्रकर्ते, पुराणिक, शिक्षक हे या दुसर्‍या वर्गाचे घटक होत आणि याच माननीय वर्गात वास्तविक पाहू गेले असता प्रस्तुत लेखाच्या विषयाची ही जागा आहे.

'गण्या', 'बाळया', 'भावडया' याप्रमाणे एकेरी- नव्हे, नुसत्या अर्धवटच नावाने ओळखल्या जाणार्‍या व सर्व  समाजाने टाकाऊ मानलेल्या व्यक्तींना इतक्या उंच जागी बसविलेले पाहून पुष्कळ वाचक या लेखावर एकपक्षीयत्वाचा आरोप करतील. आमच्या नटांची आधुनिक स्थिती लक्षात घेतली असता वरील आरोप पुष्कळसा खरा वाटतो. वर सांगितलेल्या उंच वर्गात बसण्याची पात्रता आमच्या नटवर्गात खरोखरीच आहे काय? सत्याला सोडावयाचे नसल्यास या प्रश्नाला नकारात्मक उत्तर मिळाले पाहिजे. तर मग उपरिनिर्दिष्ट विधान चुकीचे असले पाहिजे असे कोणासही वाटेल. परंतु तसेही नाही. 'नट' या शब्दाच्या अर्थाकडे- खर्‍या अर्थाकडे- थोडीशी नजर फेकल्यास हा विरोधाभास नाहीसा होणार आहे. वर जे विधान केले आहे ते 'नट' या जोखमीच्या व माननीय पदवीला जे खरोखरीच पात्र असतील त्यांच्यासंबंधी होय. नटाचे मनोरंजनद्वारा लोकशिक्षण देण्याचे कार्य फार जोखमीचे आहे. खर्‍या 'नटां'पासून आमच्या सध्याच्या नटांना ओळखण्यासाठी हल्लीचे त्यांचे प्रचलित नाव चांगले उपयोगी पडेल. सध्याचे नट हे 'नट' नसून 'नाटकवाले' आहेत. 'नट' होणे हे आमच्या 'नाटकवाल्यांचे साध्य आहे' निदान असावे अशी समाजाची इच्छा आहे. आमच्यात सध्या नट मुळीच नाहीत असे म्हणण्याचा हेतू नाही. असतील; परंतु अगदी थोडे! त्यांची गणती करू गेल्यास अंगुष्ठाची व त्याच्या शेजार्‍याचीसुध्दा गाठ पडण्याची मारामार पडेल असे मोठया दु:खाने लिहावे लागत आहे. ही गोष्ट आमच्या नटवर्गाची उपमर्द करण्याच्या हेतूने मुद्दाम येथे  नमूद केली नाही. त्याला जर यामुळे वाईट वाटले तर तेथे लेखकाचा नाइलाज आहे. कारण सत्यापलाप करणे केव्हाही इष्ट नाही. असो.

मनोरंजनाद्वारा लोकशिक्षण देण्याचे 'नटा'चे  कार्य फार जोखमीचे, महत्त्वाचे व दुष्कर आहे यामुळे त्यास एवढया मानाच्या जागी बसविणे योग्य आहे असे वर म्हटले आहे. आता या म्हणण्यात कितपत तथ्य आहे हे पाहू. खरोखरीच नटाची कामगिरी इतकी जोखमीची आहे काय? त्याची कार्यसिध्दी इतकी आयाससाध्य आहे काय? 'नट' या पदवीला पात्र होण्यासाठी कवीप्रमाणे त्यालाही काही नैसर्गिक शक्ती आवश्यक असते काय? वर्तमानपत्रकर्त्याप्रमाणे त्यालाही काही ज्ञान संपादन करून घ्यावयाचे असते काय? शिक्षकाप्रमाणे त्यालाही काही विवक्षित 'ट्रेनिंग' मिळवावे लागते काय? किंवा पुराणिकाप्रमाणे त्यालाही काही शास्त्रे पढावी लागतात काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यासाठी नटाच्या वाटणीस आलेली कामगिरी, ती पार पाडण्यासाठी त्यास करावे लागणारे प्रयास व त्या कामगिरीचा समाजास होणारा उपयोग- या सर्वांचा विचार करावयास हवा. जर ही उत्तरे समाधानकारक मिळाली तर नटास वर सांगितलेल्या वर्गात जागा द्यावयास काही प्रत्यवाय नाही असे कोणीही कबूल करील; तर आता त्यासंबंधी स्थूलदृष्टया विचार करू.

पुढे वाचा: समाजात नटाची जागा