गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

मांजर व बगळी

कथा नववी

एका मांजरीची एका बगळीशी फार ओळख होती. बगळी फार चांगली होती; पण मांजर मोठी लबाड होती. तिने एकदा बगळीला आपल्या घरी जेवावयास बोलावले. बिचारी बगळी भोळी होती! तिला मांजरीची लबाडी काय ठाऊक? ती तशीच आनंदात मांजरीकडे गेली. मांजरीने एका ताटात खीर आणली आणि बगळीला बोलली, ''ताई, आपण दोघी बहिणी बहिणी आहो, यासाठी आज एका ताटातच जेवू.'' असे बोलून, मांजरी जिभेने चटचट खीर चाटू लागली. पण बगळीची चोच लांब होती! तिला ताटातून खीर मुळीच खाता येईना! लबाड मांजरी खीर खातच होती. आणि मधून मधून बगळीला विचारत होती की, ''ताई, सावकाश होऊ दे. खीर बरी झाली आहे ना?'' बगळीला राग आला पण ती मुळीच बोलली नाही. उलट काही झाले नाही असे तिने दाखविले आणि हसत हसत घरी निघून गेली. पुढे मांजरीची एकदा खोड मोडावी असा बगळीने विचार केला. काही दिवसांनी तिने मांजरीला आपले घरी जेवावयास बोलावले! मांजरी आशेने बगळीकडे गेली. पण बगळीकडे बारीक तोंडाची एक बरणी होती आणि तीत आंबरस घातला. नंतर तिने मांजरीला खावयास सांगितले व आपणही रस खाऊ लागली. बगळीची मान लांब आणि बारीक होती; यामुळे तिला सहज रस खाता येत होता. पण मांजरीचे डोके पडले मोठे! ते काही बरणीत शिरेना! मांजरीने बरीच धडपड केली पण तिचे मुळीच फावले नाही. अखेर बगळीने विचारले, ''बाई, आजचा बेत बरा आहे ना? तू रस का खात नाहीस? खिरीसारखा चांगला रस आहे.'' हे ऐकून मांजरी ओशाळून घरी निघून गेली. याचे नाव जशास तसे.