गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

देव आणि उंट


कथा चौथी


एकदा उंटाने देवाजवळ तक्रार केली की, ''देवा, तू बाकीची जनावरे किती चांगली केली आहेस; कोणाला नखे दिली आहेस, कोणाला सुळे दात दिले आहेस आणि कोणाला शिंगे दिली आहेस, यामुळे ती जनावरे आपापले रक्षण करितात; पण मला तेवढे काहीच दिले नाहीस; मग मी आपले रक्षण कशाने करावे? बरे तर देवा, मला निदान शिंगे तरी दे.''देवाने सांगितले की, ''बाबा रे, तू चांगला मोठा आहेस. तुला पाहूनच दुसरी जनावरे भिऊन पळून जातील; तुला शिंगे काय करावयाची आहेत?'' देवानी अशी समजूत घातली; पण उंट आपला हेका सोडीना. अखेर देवाला कंटाळा आला तरी उंटाची कुरकूर चाललीच होती, हे पाहून देवाने उंटाला शिंगे तर दिली नाहीतच; पण मूळचे उंटाचे मोठाले कान बरीक कापून टाकले. उंटाचे कान लहान असतात याचे कारण हेच. मुलांनो, हा अधाशीपणाचा परिणाम बरे! यासाठी नेहमी समाधानाने रहावे.