गुरुवार, जानेवारी 18, 2018
   
Text Size

राजसंन्यास अंक पाचवा

अंक पाचवा
प्रवेश पहिला


(सोन्याच्या साखळया हातात घेऊन उभी असलेली येसूबाई व लोखंडाची बेडी हातात घेऊन उभी असलेली तुळशी. दोघी एकमेकींकडे पाहत आहेत. आसपास नोकर वगैरे.)

(पडद्यात)

''मोऱ्यांनी मात केली! राजाला गिरफदार केले!
''मोऱ्यांनी शर्थ केली! संभाजीला कैद केले!''
(येसूबाई सोन्याच्या साखळया व तुळशी बेडी एकमेकींकडे टाकून देतात.)

येसूबाई : ऐकायचे नव्हते ते ऐकिले!

तुळशी
: ऐकायचे होते ते ऐकिले! (पदराचा दगड काढिते.) दर्यासागर दौलतराव, तुमच्या अर्धांगीने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली! केवळ कबजीसारख्यांच्या मसलतीने आणि मोऱ्यांसारख्यांच्या मदतीने सुताचा साप आणि सुईचा सूळ करून, या तुळशीने केला करार पुरा केला! त्या दिवशी तुमच्या बापाने तुमच्या देहाची दैना केली तेव्हा, तुमच्या जित्या रक्ताने रंगलेला हा दगड, तुमच्या जात्या जिवाच्या साक्षीने, या तुमच्या धर्मपत्नीने, तुमच्या क्रियाकर्मासाठी जीवखडा म्हणून उचलून घेतला. दर्यासागर? तुळशीभोवती घिरटया घालणार्‍या आपल्या जिवाचा कान करून ऐका! त्या वेळचे माझे बोल आज पुन्हा आठवा. या दगडाला उरापोटाशी धरून, याच्या संगतीने छातीचा दगड करीन; तुमच्या प्रेताच्या काळया भेसूरपणाच्या शपथेने जिवाचा वेतळा करीन; दख्खनी दुनियेचे दारूकाम बनवून त्याच्या आतषबाजीने तुमच्या सरणाचा भडाग्नी चेतवीन; भोसलेशाहीच्या मानकऱ्यांना या होळीचे होळकर करीन; मराठेशाहीची माती करून तिने तुमच्या जिवाला मूठमाती देईन; संभाजीच्या बायकोला- मराठयांच्या महाराणीला गाय करून, तुमच्या नावाने मोगलांच्या हातांवर तिचे गोप्रदान सोडीन! बोला, दौलतराव, दिल्या कोलातला बोलन् बोल खरा केला ना? कोण आहे तिकडे? धरा या राणीला आणि सव्वाशेर सोन्याच्या साखळयांच्या जागी तो सव्वा मणाचा लोखंडी लंगर तिच्या पायात अडकवा.
(दोघेतिघे नोकर पुढे येतात; एकदम दुसर्‍या बाजूने हिरोजी व शाहूमहाराज येतात.)

हिरोजी
: हा, खबरदार; पुढे पाऊल टाकाल तर पावलापावलासाठी प्राण गहाण ठेवावा लागेल! मांसाहेबांच्या अंगाला हात लागला तर त्या हाताचे कलम करून टाकीन; मांसाहेबांकडे वाकडया नजरेने पाहिले तर तापल्या सळईने डोळे काढून खेळायला देईन! (नोकर बिथरतात.)

तुळशी
: काय मर्दाची जात आहे पाहा! अरे, चांगले पुरुषासारखे पुरुष होऊन या एका थेरडयाच्या तोंडाकडे पाहून हाय खाता? त्या वेळी माझा घात केलास; आज बाजी बदलली आहे! आज तुझ्यासारख्या हलक्या हुजर्‍याची ही पोरगी राजावाचून राणी झाली आहे आणि ही तुझी राणी मोऱ्यांची बटीक झाली आहे! आता मान वर करून असा पाहू लागलास तर तुझ्या पांढर्‍या केसांचाच तिला गळफास बसेल!

शाहू
: (तलवार अर्धी उपसून) मांसाहेब, हिच्या बेफाम जिभेचे या तलवारीने तुकडे तुकडे करून-

येसूबाई : (त्याला थांबवून) भलतेच! वाटेल त्या बोलभांड बायकोच्या जिभेबरोबर तुमच्या तलवारीला नाचवायची आहे का? धाकटे महाराज, थोरल्या आबासाहेबांच्या श्रीभवानी तलवारीच्या नमुन्याची ही बाळभवानी मुहूर्तावर स्वत: खाशांनी तुमच्या कमरेला बांधिली ती एवढयासाठी वाटते? हिने मराठीशाहीची एकछत्री इभ्रत राखायची आहे; बायकांच्या जिभेसारखे वळवळायचे नाही. बायकांच्या बडबडण्याने उद्याच्या छत्रपतीचे मन ढळत नाही!

तुळसी
: येसूबाई, बायकांच्या बडबडण्याने पडलेला फासाही चळत नाही! तुझ्या चढेल मोठेपणाला पायमाल करायला आता कितीसा वेळ लागणार? (नोकरास) अरे, आणा त्या साखळया इकडे! पुन्हा त्या म्हातार्‍याकडे पाहता? मोऱ्यांनी ही नामर्दाची पैदास कोठून जमा केली? ही पाहा दर्यासागर दौलतरावाची मर्दानी विधवा मराठेशाहीचे हे अहेव लेणे आपल्या पायांनी तुडवून टाकीत आहे.
(साखळया पायात घालू लागते.)

हिरोजी
: तुळशी, कारटे, काय केलेस हे? पिंडीला पाय लागला तर पायबंदीच होईल अशी साधी सजा एकटया राजांनाच फर्माविली होती; पण दुसर्‍या देहाला मात्र या आई भवानीच्या भंडाराला असा पाय लागला तर जिवानिशी जायबंदी व्हावे लागेल. या फरजंदाच्या घराण्यात, रक्तमांसाच्या जिभेने जे बोलावे ते पोलादी जिभेने करावे असा कुळाचार आहे. (कमरेची तलवार काढतो.) (स्वगत) तुळशी, कमरेची मिठी सोड! राजांनी भवानी आईच्या साक्षीने श्रीभवानी तलवार उचलली. बेइमान दौलतरावाच्या गळयात पडताना साबाजीची बिजली इमानाला जागली! बेटा तुळशी, आजवर तुला कडेवर खेळविली, आज इमानाला जागी हो! तुझी नावरस सांगून तुझ्या नावाला बट्टा लावणार्‍या फरजंदांच्या या कमअस्सल अवलादीला, केवडयाच्या बनातल्या या सुंदर नागिणीला, एक-घाय उभी चिरून टाक! (उघड) मासाहेब, ती पाहा, दिवसाढवळया केवढी चांदणी तुटून पडली!
(तुळशीच्या विरुध्द दिशेकडे बोट दाखवितो. येसूबाई वगैरे तिकडे पाहतात. हिरोजी तुळशीला वार करतो. ती पडते.)

पुढे वाचा: राजसंन्यास अंक पाचवा