गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

माझ्या मालिकाचा खास अंक

मनसा चिंतितं कार्य दैवमन्यच्च चिंतयेत्।
- संस्कृत सुभाषित.

परमेश्वराच्या या विविधविषय विश्वविद्यालयात प्राणिमात्राला आजन्म अनुभवाच्या शिक्षणक्रमांतून पसार व्हावे लागत असते. आणि या आयर्ुव्यापी अभ्यासात प्रत्येकाला त्रिकालबाधित सत्यापैकी कोठल्या तरी प्रमेयाचा कृत्य सिध्दान्त स्वरूपाने यथाबुद्ध्या प्रत्यय येत असतो. कोणाला 'सत्यमेव जयते नानृतम्' या तत्त्वातल्या सत्याची समज पडते तर कोणाची 'नरो वा कुंजरो वा' यासारख्या दुटप्पी बोलण्यावाचून जगात निभावणी होत नाही, अशी खातरजमा होत जाते. एकाला या हातावरचे झाडे या हातावर देण्याचा खरेपणा हाती येतो तर, दुसरा चित्रगुप्ताच्या खातेवहीत पुष्कळदा चुकभूल होत असल्याबद्दल बिनचूक टाचण करून ठेवितो. याप्रमाणे प्रत्येकाला ह्या ना त्या तत्त्वाचे अनुभवजन्य ज्ञान मिळत असते. परंतु त्यातल्या त्यात काही सत्यतत्त्वे अशी व्यापक स्वरूपाची आहेत की, त्यांचा प्रत्यय प्रत्येकाला उभ्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो. चालू लेखाच्या मथळयावर दिलेल्या श्लोकांतील सूत्रात्मक सत्य हे असल्या सर्वव्यापक तत्त्वांचे उत्तम उदाहरण आहे. 'आपण चिंतितो एक आणि दैव करिते एक' हा अनुभव आपणापैकी सर्वांना लहानमोठया, बऱ्यावाईट रूपाने आल्यावाचून राहात नाही. आम्ही पौर्वात्यांचे आणि पाश्चिमात्यांचे बहुतेक बाबतीत हटकून पूर्व-पश्चिम असते, परंतु या तत्त्वाच्या स्वीकारात त्यांची आमची एकवाक्यता- बहुतेक एका शब्दातच- झाली आहे असे त्यांच्यातील 'Man Proposes God disposes' या सूत्रावरून दिसून येते. कधी कधी इच्छा आणि तिची तृप्ती यांच्या परिणामस्वरूपात इतका विपर्यास दिसून येतो की, चांगल्या लोकोत्तर बुध्दीच्या लोकांनासुध्दा त्यांचा कार्यकारणभाव जमविताना आपापल्या मतानुसारे, दैव, देव, यदृच्छा किंवा पूर्वसंचित यांपैकी कशाचा तरी हवाला देऊन मोकळीक करून घ्यावी लागते. मात्र हे इच्छेशी विसंगत असणारे परिणाम सदैव विघातक वळणाचेच असतात अशातला नियम नाही. वर सांगितलेल्या भिन्न नावांनी ओळखली जाणारी ही अनोळखी शक्ती इच्छेची प्रवर्तक होऊन गुणकाप्रमाणे  इष्टफलाची वृध्दी करिते आणि कधी इच्छेला विरोधी भावाने भागून फलच्छेदामुळे असमाधानतेला कारण होते. कधी कधी तर इच्छातृप्तीच्या प्रयत्नांना शून्यवृत्तीने गुणून परिणामाला अजिबात शून्याकार बनविते. इच्छेच्या प्रयत्नांशी एकरूप होऊन जितक्यास तितकीच फलप्राप्ती करून दिल्याची उदाहरणे मात्र विरळा पाहावयास सापडतात. तात्पर्य, इच्छा व पूर्ती यांच्यातील बेबनावाकडे शुभाशुभाच्या दृष्टीने पाहावयाचे नसून त्यांच्या विपर्यस्त स्वरूपापुरतेच बघावयाचे असते. टोपलीभर मासे धरण्यासाठी टाकिलेल्या जाळयात हमेषा काटेकुटे येऊन कोळयालाही पोटात काटे भरण्याची पाळी येत असते असे नाही; एखादे वेळी टोपलीच्या ऐवजी दोन टोपल्या भरूनही मासे सापडतील आणि एखादे वेळी आत कोंडलेल्या राक्षसासकट एखादा हंडाच पाण्यात सापडून कोळयाचे घरात पाण्याप्रमाणे पैसा खेळू लागेल. फक्त नेमके मागितले दान मात्र पडत नाही. 'केला संकल्प सिध्दीस' गेल्याची उदाहरणे इतकी तुरळक आढळून येतात की, तसला योगायोग संसारात अभिमाननीय गोष्टीत जमा करण्याची मनुष्यमात्राची प्रवृत्ती होऊन बसली आहे. इच्छेचा हेतू सत्स्वरूपाचा असला म्हणजे तरी नेमकी फलप्राप्ती होते अशातलाही प्रकार नाही. अगदी 'सत्यसंकल्प' असला तरीही दातृपदी साधुसंतांनी 'भगवान' योजून ठेविलेला आढळतो. या बहुतांशी निरपवाद नियमाची उदाहरणे पुराणांतून, इतिहासातून व वर्तमान परिस्थितीतून हवी तितकी आढळून येतील. स्ट्राटफर्डच्या खाटकाने आपल्या पोराला नाटकमंडळींतून लावून देतेवेळी मनातली पोराच्या उत्कट उत्कर्षाबद्दलची भावी कल्पना रंगभूमीवर तालात नाचण्यापलीकडे फारशी गेलेली नसेल; परंतु चिरंजीवांनी सदतीस नाटके लिहून जगातल्या उत्तमोत्तम नटांनाच नव्हे तर अगदी प्रौढतम विद्वानांनासुध्दा बेताल नाचायला लावून स्वत:ला अक्षरश: चिरंजीवपदी बसवून घेतले. स्वत: गोल्डस्मिथ कवीची मन:प्रवृत्ती एखाद्या पलटणीत जाण्याची किंवा वैद्य होण्याची असून त्याच्या आप्तांची इच्छा त्याने धर्मोपदेशक व्हावे अशी होती; परंतु विधिलेख असा होता की, त्याने लेखनकलेत जगमान्य व्हावे! एका सदऱ्यानिशी रोजगारावर धाडलेल्या बेनने मळकी लकतरे धुण्याच्या साबूचे एखादे लहानसे तरी स्वतंत्र दुकान काढले म्हणजे तृप्त होणारी त्याच्या बापाची इच्छा, साऱ्या अमेरिका खंडावर युरोपने उडविलेले शिंतोडे धुवून टाकण्यासाठी देशभूमीतर्फेने यशस्वी वकिलात करणाऱ्या बेंजामिन फ्रांकलिनने किती विपर्यासाने पुरे केली बरे! (इ.सन.) 1750 त, फोर्ट सेंट जॉर्जच्या कारकुनी कोठडीत कोंडून घेतलेल्या बॉबीला, भोवतालच्या कारकुनांना अडविणारी एखादी हिशेबी चूक स्वत:ला सोडविता येण्यात आपल्या भावी उत्कर्षाची परमसीमा दिसत होती आणि सन 1751त रॉबर्ट क्लाईव्ह कसलेल्या सेनानीची अडवणूक करणारा, त्रिचनापल्लीचा वेढा उठवून देऊन लॉर्ड क्लाईव्ह होण्याच्या पंथास लागला होता. आत्महत्या करण्याचे तीन प्रयत्न करूनही त्याला ज्या आपल्या डोक्यात नेमकी गोळी सोडता आली नाही त्याच डोक्यातून अल्पावकाशात शत्रूवर नेमकी गोलंदाजी करण्याचे बिनचूक हुकूम निघू लागले. हबसाणातून घर सोडून कुठे तरी पोट भरण्यासाठी निघालेल्या बाळाजी विश्वनाथांनी परक्या प्रांतात पेशवाईचे पद पटकावून सारा देश आपल्या कीर्तीने भरून काढिला आणि त्यांच्या तिसऱ्या पिढीत स्मशानासारख्या परखंडात भगवा झेंडा फडकविण्यासाठी निघालेले भाऊ घरच्या घरीच पानपताच्या गर्दीत मातीत मिळाले. इंग्लंडवर राज्य करण्यासाठी आपल्या नावाची नाणी पाहून मोकळा झालेला नेपोलियन इंग्लंडचा कैदी या नात्याने मरण पावला. आदले दिवशी संसारसुखाच्या भावी कल्पनांत गुंतलेल्या नारायणाने 'सावधान' शब्द ऐकल्याबरोबर उत्सुकतेने अक्षता हातात घेऊन उभे असलेल्या आप्तेष्टांच्या हातावर तुरी देऊन संसाराला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. पुढील आयुष्यक्रमच नव्हे; पण नावसुध्दा बदलून रामदासरूपाने ब्रह्मचारी मंडळात अग्रेसरत्व मिळविले. खानदेशातल्या काशीरावदादांना आपल्या गोपाळाला नावाप्रमाणे घरची चार गुरेद्वारे कशीबशी वळता आली म्हणजे मिळविली असे वाटत होते; परंतु वरच्या उदाहरणाप्रमाणेच गोपाळाचा पूर्वाश्रम नावाप्रमाणेच नापत्ता होऊन, बडोद्याचे तख्तनशीन प्रभू, श्रीमंत सरकार सेनाखासखेल समशेरबहाद्दर श्रीसयाजीराव महाराज लक्षावधी लोकांचे पोशिंदे होऊन व असंख्य निरक्षर नरांचे नारायण करून आपल्या अंगच्या अलौकिक गुणांमुळे अखिल भारतवर्षाच्या मोठमोठया नामधारकांनाही आज आदर्शभूत होऊन केलेले आपण डोळयांनी पाहात आहोत. धाकटया रघूला कोकणातून नेऊन चार अक्षरे शिकविल्यावर स्कूल फायनलच्या परीक्षेस बसविणारी त्यांच्या कर्वेप्रभृति हितचिंतकांची इच्छा, फायनलच्या परीक्षेस बसविणारी त्यांच्या कर्वेप्रभृति हितचिंतकांची इच्छा, फार झाले तर, रघुनाथाला तो परीक्षा पसार होऊन, एखाद्या हपिसात 'अंब्ली ऐण्ड रिस्पेक्टफुली' उभे राहण्यात वीसतीस रुपये किमतीचे यश मिळविताना पाहून तृप्त झाली असती! दैवयोग निराळा होता. तत्कालीन राणीसाहेबांच्या राजमुकुटात इंग्रजी अलंकारामध्ये अग्रस्थानी चमकणाऱ्या हिंदुस्थानी हिऱ्याप्रमाणेच, केंब्रिजच्या शारदादेवीच्या यशोमुकुटात खचिलेल्या विद्वद्रत्नात अग्रेसरत्वाने लकाकून, मेकॉलेसारख्या अहंमन्यांनी आमच्या मातृभूमीच्या नावावर आणिलेली निर्बुध्दपणाची नसती काळोखी आपल्या तेजाने पार घालविणारा हिंदुस्थानच्या बुध्दिवैभवाचा कौहिनूर, सिनियर रँग्लर, विद्यामृताचे अन्नसत्र होऊन बसलेल्या व महाराष्ट्रीय कर्तबगारीचे कौतुक म्हणून गाजलेल्या फरग्यूसन कॉलेजात अगदी अल्पवयात प्रमुखपदी बसणारे प्रिन्सिपॉल परांजपे, नेक नामदार गव्हर्नरसाहेबांच्या खुर्चीला खुर्ची भिडवून बसलेले नामदार परांजपे.*

या सिध्दान्ताची भूमितीच्या एखाद्या सिध्दान्तासारखी सत्यता पटवून देत आहेत! महिना एकदोन रुपयांसाठी पुणे जिमखान्याच्या पटांगणावर इकडचे चेंडू कसे तरी तिकडे टाकण्यासाठी साहेबांसमोर सारखे नाचणाऱ्या चांभाराच्या पोराने तिथल्या मुकादमात भावी आशादृष्टीने काय पाहिले असेल! आणि परबांच्या विलायती पटांगावर आपले चेंडू टाकण्याचे कौशल्य पाहून नाचणाऱ्या साहेबांत श्रीयुत पी. बालू यांनी काय पाहिले असेल! माझ्या सिध्दान्ताची सत्यता! अगदी परवाचीच गोष्ट घ्या! मरहूम शेठ चुनीलाल सरैय्या यांची धंदा करण्याची सुरुवात व शेवट ही दोन्ही अकल्पित विधिघटनेचीच साक्ष देतील. एल.एम.एस.च्या परीक्षेस ते बसले असतील त्या वेळी उघड उघड डॉक्टरी करण्याची त्यांची इच्छा असली पाहिजे;  परंतु त्यांनी धंदा केला पतपेढीचा! अखेरीस स्पीसी बँकेची इभ्रत न्यायाच्या अदालतीत शहाजोग दाखवून बाहेर पडल्यावर त्या दिवशी भागीवाल्या लोकांनी त्यांच्या गळयात हार घातला त्या वेळी त्यांना भविष्यकाळाची काय कल्पना झाली असेल बरे! दुसऱ्याच दिवशी काळाने त्यांच्या गळयात इतका जोराचा फासा घातला की, त्याच्या आवळीने त्यांच्या भागीवाल्या दोस्तांनाही गळफास बसल्यासारखे झाले! यजमानाचे पाय धुण्यासाठी मान वाकवून पाणी ओतताना रामा शागीर्द धन्याच्या कानातल्या चौकडयांसारखा दिसणारा खोटया मोत्यांचा चौकडा मिळाल्यानेही खूष झाला असता; आणि त्या यजमानाच्याही यजमानाला पापक्षालनाचे डोके मारण्याची शिक्षा फर्माविणाऱ्या रामशास्त्र्यांनी, लाचलुचपतीखातर पायांपुढे लोटांगण घालणाऱ्या कुबेरभांडारावरही लाथ मारिली!-

पुढे वाचा: माझ्या मालिकाचा खास अंक