गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

दीडपानी नाटक

(स्थळ: घरासमोरील अंगण. वेळ- चांदण्या रात्रीचा पहिला प्रहर. पात्रे: भोकाड पसरून रडणारा आठ-दहा महिन्यांचा बाबू. बाबूची समजूत घालीत असलेले त्याचे वडील- तर्कालंकारचूडामणी प्रोफेसर कोटिबुध्दे.)

प्रा. कोटिबुध्दे : (गंभीर वाणीने) बाबू, रडू नकोस! रडण्याने स्वत: रडणाराला काहीच फलप्राप्ती होत नसून, आसमंतात्भागी वास्तव्य करणाराला- म्हणजे निकटतरवर्ती जनसमुदायाला मात्र कर्णकर्कश रुदनध्वनीपासून महत्तम त्रास होण्याचा संभव असतो. किंबहुना खात्री असते, असेही म्हटले असता अतिशयोक्ती होणार नाही.

बाबू
: (जोराने) ह्या- आ- ह्या- आ- ऑं- ऑं

प्रो. कोटिबुध्दे : (विशेष गांभीर्याने) अरे रडू नकोस! बाबू, आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनेसुध्दा, दीर्घक्रंदन प्रकृतीला अत्यंत अपायकारक आहे, हे भूमितीच्या प्रत्यक्ष प्रमाणासारखे स्वयंसिध्द आहे! आक्रोशामुळे अंत:स्नायूंच्या ज्ञानमज्जा विस्तृत होऊन त्यामुळे बाह्यस्नायूंची रेषावलयेही अत्यंत वेगाने इतस्तत: आकर्षिली जातात! श्वासनिरोधामुळे रुधिराभिसरणक्रिया जिला इंग्रजीत (Blood circulation) असे म्हणतात- मंदतम होत्साती, रुधिरलोहपिंडाच्या स्वैरगतीला प्रतिबंध झाल्यामुळे अंतर्गत चलनवलन-व्यापाराची अप्रत्यक्षरीत्या नियंत्रणा होते. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनेही रुदनाची व्यंगे दिसून येतात, श्रीमद्भगवद्गीतेत प्रत्यक्ष भगवंतांनी असे सांगितलेच आहे की, ''अस्तत्वं च महाबाहो नैनं शोचितुमर्हसि''! पाश्चिमात्य तत्त्ववेत्त्यांचा मुकुटमणी सुप्रसिध्द हर्बट स्पेन्सरसुध्दा कंठरवाने हेच प्रतिपादन करीत आहे, की-

बाबू : (दुसर्या सप्तकाचे सूर काढीत) हां- हां- एं- एं

प्रो. कोटिबुध्दे : (चढत्या गांभीर्याने) रडू नये, बाबू रडू नये! तो बघ सिंहराशीतला जोडतारा! त्यातल्या दोन ताऱ्यांच्या परस्परांभोवती पूर्ण प्रदक्षिणा व्हावयास छत्तीसशे बेचाळीस वर्षे, सात महिने, तीन दिवस, चार प्रहर, छप्पन्न मिनिटे व अठरा पूर्णांक सात दशलक्षांश पळे लागतात. दशांशाची शेवटली पाच स्थळे आवर्त दशांशात आहेत, असे सुप्रसिध्द आर्यज्योतिषी भास्कराचार्यांचा सूर्यकिरणांच्या परावर्तनाने त्याला प्रकाशप्राप्ती होऊन पृथ्वीच्या कक्षेत सूर्यास्तानंतरही पर्यायाने सूर्यप्रकाशाचा संचार होतो. या प्रकाशप्रत्यक्षाला चंद्र हे निमित्तकारण आहे. याला वेदांतून 'सोम' या नावाने संबोधिले असून त्याचे वनस्पतीचा पती असेही नामकरण केले आहे. त्यावरून वनस्पतिशास्त्राची एके काळी आपल्या देशात किती प्रगती झाली होती, याचे स्वयंप्रकाश प्रत्यंतर मिळते! या दृष्टीने चंद्राकडे पाहिले म्हणजे जणू काय तो आपल्या प्रकाशाने अज्ञानयुगावरची कालपटले भेदून आमच्या पूर्वजांच्या अगाध ज्ञानावरच प्रकाश पाडीत आहे असे वाटते! पाहा, त्याच्याकडे विचारपूर्ण दृष्टीने पाहा. असा रडू नकोस-

पुढे वाचा: दीडपानी नाटक