गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

संगीत मूकनायक

अंक पहिला

प्रवेश पहिला

(स्थळ : विक्रांताच्या घरातील माजघर. पात्रे: ठमाबाई, उमाबाई, भामाबाई, चिमाबाई वगैरे बायका व आवडी, बगडी वगैरे परकर्‍या पोरी, बाळंतपदर घेतलेली व पिवळीफिक्कट अशी विक्रांताची आई, मध्यंतरी टांगलेला पाळणा*; पाळण्यात बारा दिवसांचा विक्रांत.)

सर्व बायका : पद - (चाल- हजारो वर्षे चालत आलेलीच.)
गोविंद घ्या कुणी। गोपाळ घ्या कुणी।
गोविंद घ्या कुणी। गोपाळ घ्या कुणी।
('नाही मी बोलत नाथा' हा चरण जितके वेळा म्हणण्याचा साधारणपणे प्रघात आहे तितके वेळा हेच एकसारखे, प्रेक्षकांस कंटाळा येईपर्यंत घोळून म्हणतात.)

ठमाबाई : (उमाबाईच्या कानाशी कुजबुजतात.) उमाबाई, बख्खळ पोरे बघितली, पण असले चिन्ह नव्हते बघितले बाई कधी! चांगले बारा दिवसांचे पोर- पण रडतसुध्दा नाही अजून! आज बारसे ना?

उमाबाई : (तसेच करून) नसेल रडत मेले. रडेल उद्या चार दिवसांनी! जिवासारखा जीव काय रडल्यावाचून राहील?

चिमाबाई : (की ज्यांना हा संवाद आगंतुकपणाने ऐकिलेला आहे, त्याही तसेच करून) अहो, कुठले रडते आहे ते? उमाबाईंना आपले काहीतरी संपादून घ्यायला हवे! म्हणे रडेल! रडायला जीव आहे कुठे त्या पोरात? अन् म्हणे रडेल. बरे रडेल ते? रडेल म्हणे रडेल!

भीमाबाई : (विक्रांताचे आईस) नाव काय ठेवायचे म्हणालात?

विक्रांतची आई
: विक्रांत!

ठमाबाई
: हे असले कसले बाई नाव?

विक्रांतची आई : तिकडून सांगायचे झाले आहे ना!
( ते नाव ठेवतात. पडदा पडतो.)
* टीप: हे पात्राचे नाव नाही.
- नाटककर्ता

पुढे वाचा: संगीत मूळनायक