गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

प्रस्तावनेच्या इतर बाजू

जिल्हानिहाय गौरकाय अधिकारी, जिल्ह्यांच्या विस्तृत पटांगणात कलेक्टर, मॅजिस्ट्रेट व प्रसंगी पोलिटिकल एजंट या तीन निरनिराळया रूपांनी वावरत असतो; त्याचप्रमाणे बार्शी लाइट रेल्वेचा अर्धगौर गार्ड, गाडी चालत असेपर्यंत गार्ड, स्टेशनवर उभी राहावयाचे बेतात असताना उतारूंजवळ तिकिटे घेणारा तिकिट कलेक्टर, गाडी उभी असेपर्यंत स्टेशनावर झपाटयाने येरझारा घालणारा स्टेशनमास्तर व शेवटी गाडी सुटावयाचे वेळी बावटा दाखविणारा पोर्टर, हे चार निरनिराळे हुद्दे सांभाळून असतो. सकृद्दर्शनी यांची कर्तबगारी मोठीशी वाटते खरी; परंतु नाटयसृष्टीमधील गौरमुख सूत्रधार त्याच्या उज्ज्वलतेस काळिमा लविल्याखेरीज राहणार नाही. हा प्राणी प्रस्तावनेच्या आकुंचित जागेतच पाच निरनिराळया नात्यांनी वावरत असतो. बोलण्याच्या भरात कोणतीही गोष्ट सहज विसरणारा अजागळ, घरांतील सर्व भानगडींबद्दल बेदरकार राहून हमेशा नाटकांच्या जाहिराती ठोकणारा लोकरंजनाचा मक्तेदार, ग्रंथकार व नट यांच्याबद्दल देवाजवळ व प्रेक्षकांजवळ वकिली करणारा स्वयंसेवक, एका सदैव उपवर पोरीचा दैववादी बाप व नाटकांचा तिटकारा करणार्या एका हट्टवादी बायकोचा निश्चयी नवरा, ही सूत्रधाराची पाच अंगे आहेत. यथाछंद यांचा थोडथोडा विचार करू.

ईशस्तुती संपून दोन्ही पारिपार्श्वक दोन बाजूंनी (हे दोघे निरनिराळया बाजूंनी कोठे जातात?) निघून जाताच सूत्रधार कायदेशीर 'सूत्रधार' होतो असा नाटयशास्त्राचा नियम आहे. 'गावातला एक सभ्य ब्राह्मण' या नात्यानेच त्याने ईशस्तुती करावयाची असते. यावरून पाहता मनुष्यस्वभावाच्या उद्दामपणाची चांगलीच प्रचिती दिसून येते. जो मनुष्य एका क्षणापूर्वी प्रेमळ शब्दांनी परमेश्वराला आळवीत असतो तोच सूत्रधाराचा अधिकार हाती येताच आपले ताकापुरते रामायण आटोपतो, व लागलाच बेमुवर्तपणाने म्हणावयास लागतो की, ''पुरे पुरे, हा सभाजनांचा रसभंग करणारा खटाटोप कशाला पाहिजे?'' मागील कृत्यांबद्दल मनुष्य किती बेदरकार असतो? जमलेल्या लोकांची हांजीहांजी करण्यासाठी हा गृहस्थ खरोखरीच मोठया खटाटोपाने केलेल्या ईशस्तुतीला बिनदिक्कत 'खटाटोप' म्हणून मोकळा होता! माझी खात्री आहे की, प्रत्येक प्रयोगाच्या पूर्वी इतक्या प्रेमळपणाने ईशस्तुती केली तर वाटेल तो देव मूर्तिमंत रंगभूमीवर येऊन उभा राहील; निदान भोळा शंकर तरी खास येईल! पण मध्यंतरीच हा प्रकार होत असल्यामुळे असे झालेले कधी दिसून येत नाही. शंकराच्याही भोळेपणाला काही मर्यादा आहेच. तोंडावर केलेली ही अमर्याद न समजण्याइतका काही तो भोळा नाही. स्तुतीचा प्रेमळपणा ऐकताच गजचर्म पांघरून यायला निघावे आणि पुढली भानगड ऐकताच पुहा मागे फिरावे याप्रमाणे दर शनिवारी-बुधवारी त्याची धांदल होत असावी असा माझा अंदाज आहे. * आता व्यवहारज्ञानदृष्टया पाहिले तर मात्र सूत्रधाराचेच करणे वाजवी दिसते. कारण ज्याच्या अस्तित्वाबद्दलसुध्दा वाद चालू आहेत त्या ईश्वराच्या येण्यासाठी इतका सायास करण्याच्या भानगडीत प्रत्यक्ष चार आणे खर्चून आलेल्या प्रेक्षकास कंटाळून परत घालविण्यात काय शहाणपणा आहे?

पुढे वाचा: प्रस्तावनेच्या इतर बाजू