गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

स्वयंपाक घरातील गोष्टी


''राष्ट्राचे खरे जीवन स्वयंपाकघरावरच अवलंबून आहे.''

- स्वामी विवेकानंद


''फ्रान्सच्या सिंहासनावरून पदच्युत झाल्याबरोबर माझ्या मुलाने भटारखाना उघडावा; म्हणजे त्याला अन्नाचा तुटवडा पडणार नाही.''

- नेपोलियन बोनापार्टचा आपल्या मुलाला उपदेश

''प्रत्येक पुरुषाने जेवणाच्या गोष्टीकडे प्रथमच लक्ष पुरविले पाहिजे. मला जर कधीच पोटभर जेवावयास मिळाले नसते, तर माझ्या हातून इतकी पुस्तके लिहून होण्याचा सुतराम् संभव नव्हता.''

- हर्बर्ट स्पेन्सर

''अन्नाद्भवन्ति भूतानि। (असतील शिते तर जमतील भुते.)''

- श्रीमद्भगवद्गीता

प्रस्तुत लेखाचा मथळा वाचून लगेच लेखकाच्या नावावर नजर टाकताच माझ्या सार्‍या वाचकभगिनी एकदम थबकतील, आणि मला स्वयंपाकघरातून हाकलून लावण्याचा ठराव करू लागतील! माझ्या भगिनीवर्गाने आपल्या या गरीब भावंडावर अशी आग पाखडण्यापूर्वी पुढील चार शब्द वाचून पाहण्याची कृपा करावी. माझ्या सुशिक्षित भगिनीजनांच्या विचारशीलतेची मला खात्री असल्यामुळे, या शब्दाकडे त्यांचे रागावलोकन होणार नाही, अशी मला पूर्ण उमेद आहे. बाकी एखाद्या निरक्षर बाईने मात्र हे चार शब्द वाचण्याची तसदी घेतली असती किंवा नाही, याची शंकाच आहे! बहुधा पहिल्या दोन ओळींवरच नजर फेकून तिने माझा लेख चुलीत टाकला असता, आणि तापलेल्या कालथ्याच्या किंवा जळत्या कोलिताच्या साहाय्याने मला स्वयंपाकघरातून पिटाळून लावले असते. यद्यपि प्रत्येक समाजाने आपापल्या परीने स्त्री-पुरुषांसाठी भिन्नभिन्न कामे नेमून दिली आहेत; तथापि प्रसंगविशेषी एका मनुष्यभेदाच्या प्राण्याला दुसर्‍याचे हक्क घेण्यापुरती सवलत देण्यात येते. स्त्री-पुरुषांमध्ये खरोखर म्हटले असता 'जो भेद विधीने केला' आहे, त्याचे वाजवीपेक्षा फाजील स्पष्टीकरण एका सुप्रसिध्द मराठी नाटककाराने एकाच पद्यात केलेले वाचकांच्या माहितीत असेलच. त्याव्यतिरिक्त स्त्री-पुरुषांच्या हक्कांचे वर्गीकरण निव्वळ मनुष्यनिर्मित असून पुष्कळ वेळा त्यात अतिव्याप्ती झालेली दिसून येते. सर्कशीच्या रिंगणात वाघाच्या तोंडात मर्दानी हिंमतीने मान देऊन बायका धीट पुरुषांनाही थक्क करून सोडतात, तर नाटकगृहातल्या रंगस्थलावरचे स्त्री नट आपल्या हावभावयुक्त मुरक्यांनी वारांगनांनाही लज्जेने पहावयास लावतात. एकीकडे विश्वविद्यालयीन उच्चतम परीक्षांतल्या यशस्वी उमेदवारांच्या नाममालिकेला आपल्या नावांनी नटविणारी अभिमाननीय रमणीरत्ने आहेत, तर दुसरीकडे आपल्या नावाच्या चार अक्षरांसाठीसुध्दा दुसर्‍याचा दस्तुर ठोकून, आर्यसंस्कृतीने स्त्रियांसाठीच आखलेल्या अज्ञानवर्तुलाच्या अगदी मध्यस्थानी चमकण्याजोगी उच्च जातीची नररत्नेही आहेत! लग्नप्रसंगी, अक्षतीसारख्या मिरवणुकीत, पुरुषांचा नेहमीचा पुढारीपणाचा मान आपल्याकडे घेऊन महिलासमाज घराबाहेर पडत असतो, त्या वेळी रिकाम्या झालेल्या स्वयंपाकघरात पुरुषवर्गातल्या स्वयंसेवकांचे पथक काम उरकीत असते. कधी कधी तर निसर्गाच्या कृतीतसुध्दा स्त्री-पुरुषभेदाबद्दल ढिलाई दिसून येते! दाढीमिशीला मुकलेले आजन्म संन्यासी कितीतरी वेळा दृष्टीला पडतात; आणि शारीरशास्त्रविषयक पुस्तकांतून दाढीमिशीच्या झुपक्यांनी कलंकित झालेल्या स्त्री-मुखचंद्रांची चित्रेही बहुश्रुत वाचकांनी पाहिली असतील. याप्रमाणे स्त्री-पुरुषांनी परस्परांना आपापल्या कार्यक्षेत्राचे एखाद्या वेळी सीमोल्लंघन करताना पाहिले, तर उगाच हाकाटी करीत बसण्याचे कारण नाही.

पुढे वाचा: स्वयंपाक घरातील गोष्टी