गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

प्रवेश पहिला

(स्थळ : रस्ता. धुंडिराज व घनश्याम.)
घनश्याम :      माझे नाव घनश्याम.

धुंडिराज :    अस्से ! आता  आले सगळे  लक्ष्यात. घनश्याम, तुम्ही आपले नाव सांगितल्याबरोबर सर्व हकीकत आठवली. अहो, तुमच्याआमच्या कैक वेळा गाठी पडल्या आहेत ना चांगल्या ! तुमचे नाव घनश्याम एवढे कळले मात्र, प्रत्येक भेटीचा प्रसंग डोळयासमोर मूर्तिमंत उभा राहू लागला आहे. कुठे बरे आपली भेट झाली होती ?

घनश्याम
:      धुंडिराजपंत, तुमची माझी एखाद्याच वेळी भेट थोडीच झाली आहे, की म्हणून मला अमुकच ठिकाणी आपली भेट झाली होती असे अचूक सांगता येईल ? पुष्कळ वेळा आणि पुष्कळ ठिकाणी घडलेल्या गोष्टींबद्दल निश्चितपणे सांगणे कठीणच नाही का? धुंडिराजपंत, आपले स्नेही धनेश्वरपंत पेढीवाले आहेत ना? त्यांचा मी मुनीम; तेव्हा धनेश्वरपंतांच्याच घरी आपल्या भेटी होण्याचा विशेष संभव.

धुंडिराज :    अगदी बरोबर !  आता ठीक बोलला. घनश्याम, धनेश्वरपंत पेढीवाल्याचे तुम्ही मुनीम. तुमचे नाव घनश्याम. धनेश्वरपंताच्या घरी तुमच्या आमच्या भेटी झाल्या. आता बोला. उगीच तसे नका बोलू ! आपले विचारीत चला. धनेश्वरपंताचे तुम्ही मुनीम. तुमचे नाव घनश्याम. धनेश्वरपंताच्या घरी तुमच्या आमच्या भेटी झाल्या.

घनश्याम :  (स्वगत) मी सांगितलेल्याच गोष्टी मला ठासून बजावून पढवीत सुटला आहे ! माथ्यात ढिलाईचा भाग बराच आहे.

धुंडिराज :    तुम्ही बोलत नाही? हं ! आता पहिल्याने अंमळ विलंब लागला ओळखायला ! ते नाही घ्यायचे मनावर.

घनश्याम :      छे: छे:; वृध्दापकाळाचे विस्मरण अगदी साहजिक आहे.

धुंडिराज :    नाही हं; वृध्दापकाळाचे विस्मरण नाही हे.  तसे शाबूत आहे काम. होते काय बघा,  वृध्दापकाळ तर आहेच, पण हा आमचा धंदा विजातीय पडला.  विमा कंपनीचा एजंट म्हटला म्हणजे सगळया जगाचा नातेवाईक !  मिळवित्या माणसांच्या वारसांची त्याला उपजत काळजी ! त्याला रोज तेहतीस कोटी देवांची दर्शने घडायची !  आणि प्रत्येकाजवळ ही रडकथा सांगायची की तुम्ही मेल्यावर मागे तुमच्या मुलाबाळांचे काय होईल, हातपाय चालता आहे तोवरच सारी मौज, उद्याचे कुणी काय बघितले आहे, मरणाचा काय नेम घ्या. सांगतो काय, घनश्याम, विमा कंपनीचा एजंट भेटला की तुमचे पुरे मरणच ओढवले म्हणून समजा! अन् संसाराची तोंडमिळवणी करण्यासाठी आम्हाला रोज उठून नवे चेहरे गाठावे लागतात. म्हणजे बघा आता ! आधीच आम्ही डोक्याने जरा पंगू, त्यात वाढत्या वयाचे कमिशन कापायचे, अन् अकलेला नव्या चेहऱ्यांचा रोजमुरा!  असे काही होऊ न गेले म्हणता, एकाचा चेहरा दिसला, की तिसर्‍याचा इतिहास आठवतो ! एकाचे नाव अन् दुसर्‍याचे गांव मिळून एकंदर मेळ असा तयार होतो !  बस्स ! अमुक एक इसम ओळखीचा आहे की नाही हे छातीठोक सांगण्याची सोयच नाही ना मुळी! हे तुम्ही आता बोलता आहां ना ? आता चेहरेपट्टी हीच, अन् नुसता अंगरखाच या बदलून; प्रकरण आलेच आमच्या अंगाशी !  त्या अंगरख्याचा एखादा जोडीदार कुणाच्या अंगावर पाहिला असेल, त्याचा इतिहास तुमच्या तोडाच्या अंगलट यायचा ! मग मी करतो काय, माणसांची ओळख जरी पटली नाही तर ओळख पटल्यासारखेच दाखवितो. हो, म्हणजे न ओळखण्याबद्दल त्याला तरी वाईट वाटत नाही !

घनश्याम :      इतका घोटाळा कसा होईल असा ?

धुंडिराज :    काय सांगावे तुम्हाला आता ? अहो, होतो म्हणतो ना ! होतो म्हणजे काय, खरोखरीच होतो. अगदी अंगरखा बदलला तरी फरक होतो. एक नूर आदमी आणि दस नूर कपडा म्हणून कशाला म्हटले आहे मग ? आताच अडचण पडली आहे बघा. धनेश्वरपंताचा भागीदार तुमचा तो कोण ? त्याचा मुलगा मोरेश्वर धनेश्वराकडे आज आला आहे-आला आहे ना ? त्याला भेटावे लागणार आहे आता ! त्याला पाहून इतकी वर्षे लोटली आहेत, की तसे म्हटले तर परातीत तेल घालून देवळात त्याला भेटायला हवे. लहानपणी पाहिलेला एकदा !  आणि इथे तर कालची जमा कालच खर्ची. आजला म्हणाल तर शिल्लक बाकी पूज्य. त्याला आता ओळखावा कसा, बोला !

घनश्याम :      जराशी अडचण आहे खरी.

धुंडिराज :    नाही, नाही, नाही; तशी तितकी अडचण नाही बरे का ? कुणी नेम सांगावा ? ओळखीनही एखादे वेळी चटकन्. परवाच बघा. झाली काय गंमत; एक आपला गृहस्थ भेटला. पाहताक्षणी आम्ही टाकला मनाशी कयास बांधून की, एक फलाण्याचा फलाणा तो हाच म्हणून ! झाले !  त्याला बघितले विचारून नुसते अनमानधपक्याने-मनात म्हटले,  बघू तर खरे ! हो गंमतच करावयाची  घटकाभर-म्हटले का हो बुवा,  अमुक अमुक ते आपणच का ?  झाले बुवा ! विचारून तर गेलो !  त्याने म्हटले होय. म्हणजे काय ? सर्दच झालो ना एकदम!  खरोखरीच तो म्हणजे तोच ! झटक्यास ओळख पटली ना ! मग हडसून खडसून सांगितले - हो त्यानेच कबूल केले, मग काय हो ?-म्हटले, गोमाजी तिमाजी ते आपण; अमक्याचे तुम्ही अमुक. त्याला मुळी होयच म्हणणे आले ना ! बरे, गंमत ही त्यात-तुम्ही म्हणाल नाव नेमके सांगितले म्हणून आमचे त्याचे संघष्टण विशेष असेल-नाही; तसे म्हटले तर परिचय नाही, ओळख नाही, जानपछान नाही, न लेवा न देवा ! नुसता दहा-वीस वेळा बघितलेला-कुठे घडी दोन घडी बोलणे-चालणे. बस्स. उपरात नाही. अगदी हराशिवा ! पण ओळखले एकदम न् काय ? बोला, गंमत आहे की नाही ? नाही नका म्हणू.

घनश्याम :  (स्वगत) जबर गोष्टीवेल्हाळ गृहस्थ आहे हा ! आणखी अशी पल्लेदार विषयांतरे करितो आहे, की संस्कृत श्लोकांवर प्रवचने करणार्‍या वक्त्यांनीसुध्दा तोंडात बोटे घालावीत. याला मूळ पदावर आणणे मोठे कठीण आहे. (उघड) धुंडिराजपंत, असे असेल तर मोरेश्वराला ओळखणे काही कठीण नाही तुम्हाला.

धुंडिराज :    सांगितले ना तुम्हाला आधीच, की कठीण नाही न् आहे - ही ! बाकी मोरेश्वर तरी मला ओळखील की नाही हे सुध्दा जरा तेढेच आहे !  स्वारी अगदी गयाळ आहे. अगदी सुमार बुध्दीचा. अगदी म्हणजे - अगदीच. मला पहिल्यापासून माहीत आहे ना ! तुम्ही नाही म्हणून मी कुठला ऐकायला ! सांगतो बघा तुम्हाला !

घनश्याम :  (स्वगत) झाली विषयांतराला सुरुवात !

धुंडिराज :    बरे का, घनश्याम, एकदा काय झाले, की या मोरेश्वराची आजी--आजी म्हणजे आईची आई नव्हे, बापाची आई. आईची आई बिचारी आहे अजून. आमच्या मेव्हण्याच्या कुणाचीशी ती मावशी लागते, म्हणून मला तरी माहीत एवढे ! ती बापडी आजतागाईत सहीसलामत आहे. आपण कशाला उगीच कुणाबद्दल वाईट बोला ? आणि बोलून तरी कसे चालेल ? कालपरवाकडे कोणसे-कोण पाहा-

घनश्याम :  (स्वगत) विषयात आतून पुन्हा पोटविषयांतर !! छे: छे: छे: ! अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टींचा एकमेकीशी जन्यजनकसंबंध रद्द आहे या प्रकारापुढे! हा मालतीचा बापच आहे, आणि तिच्याबद्दल मला मागणी करायची आहे याच आशाळभूत धीरावर, मी अजून टिकाव धरला आहे ! (उघड) मोरेश्वराच्या आजीबद्दल-म्हणजे बापाच्या आईबद्दल-सांगत होता ना कायसे ?

धुंडिराज :    हो; झाली काय गंमत, की याची आजी एकदा वारली-अगदी लहानपणी बरे का?

घनश्याम :      कुणाच्या ? तिच्या लहानपणी की याच्या ?

धुंडिराज :    ठीक, ठीक, ठीक ! घनश्याम, बोलण्यात सफाई पकडले खरे ! कबूल आहे. असा कोटिक्रम हवा बोलण्यात ! हे आमच्यात नाही. आमचे बोलणे सर्रास अघळपघळ! म्हणजे काय, पांचपेच नाही ! आपला ऐसपैस कारखाना !   तुमचे बोलणे म्हणजे खुबीदार, प्रासयुक्त ! असेच पाहिजे बोलणे माणसाचे ! उगीच गबाळग्रंथी फापटपसारा नाही कामाचा ! या बोलण्यात म्हणजे गंमत आहे, मौज आहे अन् मजाही आहे. आपल्याला आवडले तुमचे बोलणे. आवडले म्हणजे अगदी मनापासून! आमच्या हेडहपिसांत एक क्लार्क आहे. असा तुमच्यासारखाच! अगदी आंखबंद डोक्याचा मनुष्य ! त्याचे बोलणे असेच प्रासादिक असते. सगळया हेडहपिसांत त्याची--

घनश्याम :    आपण हेडहपिसांत शिरला खरे, पण बोलण्याच्या नादात मोरेश्वराची आजी बिचारी एकदा लहानपणी तशीच मरून पडलेली आहे. शिवाय आजी म्हणजे ती सुध्दा बापाची आई. आईची आई नव्हे- बापडी आजतागाईत सहीसलामत आहे.

धुंडिराज :      छान ! सुरेख ! पसंत ! चांगला टोमणा दिलात. गंमत वाटली ! बरे; इकडे आजी वारली, हा मोरेश्वर लागला रडायला, घरातली माणसे गडबडीत.-अन् गडबडीत असायचीच ! हो, माणसासारखे माणूस घराला मुकले, त्यांना तरी आपण कोणत्या तोंडाने दोष द्यावा ? हा मोरेश्वर सारखा रडतो आहे, तेव्हा मी घेतला त्याला चट्दिशी जवळ; जरा खेळवला झाले. त्याला वाटले,  मी घरातलाच कुणी आहे म्हणून ! फसलान् काय ! अशी गंमत झाली.  आजी वारली त्या वेळची गोष्ट.

घनश्याम :      (स्वगत) इतक्या लांबणीनंतर चांगली गंमतच आहे म्हणायची ही ! बोलण्याच्या ऐन गर्दीत कुणी कितीही भानगडी सांगितल्या तरी शब्द न् शब्द विचारपूर्वक लक्ष्यात ठेवण्याचा माझा आजपर्यंतचा अभिमान आज याच्या मार्‍याने उतरणार असे वाटते. आता एकदम विषय काढावा. नाहीतर लग्नाची ही गोष्ट माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत याच्याजवळ काढण्याची मला संधी मिळावयाची नाही. आता जरा वाहवताना थांबला आहे, तेवढयात वाहत्या गंगेत हात धुऊ न घ्यावा एकदम.

धुंडिराज :    हे पहा घनश्याम; एकदा काय झाले-

घनश्याम :  (एकदम स्वगत) अरे बाप रे ! (उघड) धुंडिराजपंत, मध्येच बोलल्याबद्दल मला क्षमा करा. काही जरुरीच्या कामासाठी आपल्याशी निकडीने बोलण्यासाठी आलो आहे; आणि काम फारच महत्त्वाचे असले तरी या वेळी मला वेळ फारच थोडा आहे आणि म्हणूनच जराशा उतावळया उध्दटपणाने आपल्या बोलण्यात व्यत्यय आणला.

धुंडिराज :    छे: छे: छे: !  भलतेच ! घनश्याम, उतावळेपणा कसला न् उध्दटपणा कसला ! तुम्ही ताजी माणसे म्हणजे काय गोष्ट आहे ! हे बघा, तुम्ही मुलेमंडळी अशी आगळीक करू लागला म्हणजे आम्हाला बघा काय समाधान वाटते !  खरे सांगूच का आता ? बघा, बाळगोपाळांच्या बोलण्याचा ज्याला राग आला तो थेरडा म्हणजे चळलाच म्हणून समजा बेलाशक.  म्हातारपणी मन म्हणजे काय पाहिजे ! बोलण्याचा राग म्हणजे काय बोलणे आहे ! अहो, गंमत सांगू का तुम्हाला ? तुमचे बोलणे म्हणजे बोलणे नव्हेच ते ! आमचा प्रभाकर तुम्हाला माहीत असेलच ! आमचा म्हणजे तसा जवळचा नव्हे, बरे का ? पाहा, प्रभाकर म्हणजे खरे म्हटले तर - कोण बरे ? (आठवतो.)

घनश्याम :    (स्वगत) झाले ! आता ''प्रभाकर'' घराण्याचा इतिहास !  देवा, या घनश्यामाला जन्माला घातलास तो अखेर या सैल जिभेने ठार मारण्याकरिताच का ? काय शब्दांचा वर्षाव करितो आहे ! एखाद्या नाटककाराने असे शब्दशूर पात्र जर नाटकात पाचही अंकांतून नाचविले तर दीडाच्या आत नाटक आटोपण्याची पंचाईतच. रावणाच्या दहा तोंडावर रामबाण औषध मिळाले; पण हे तोंड असाध्य आहे.

धुंडिराज :    हे बघा, याचा मामा आमच्या दशातला. लहानपणी आईबापे वारली तशी माया पण जोडून ठेविलेली नव्हती त्यांनी. मामा पडले उदासीनवृत्ति. आम्ही आमच्या हिला टाकले विचारून. होता होईतो घरात विचारूनच सगळे केलेले बरे, असा आमचा आपला पहिल्यापासून शिरस्ता. म्हटले बुवा, आपल्या घरात नाही मूलबाळ;  रिखाटयासारखे दोन जीव;  आयता घराला अलंकार लाभतो आहे तेवढेच भूषण ! झाले; तिलाही रुचले ते; आणि आम्ही या प्रभाकराला घरी आणला तो रुळला झाले ! अगदी घरच्यासारखा झाला ! घटकाभर असेच म्हणा ना, तुमच्या धनेश्वरपंताच्या घरी जसा मनोहर आहे ना, तसा हा ! आम्हाला प्रभाकर जसा जवळचा नाही- म्हणजे नात्याने-तसा धनेश्वराला मनोहर पण जवळचा नाही. प्रभाकर आणि मनोहर म्हणजे अगदी एकरंगी, एकशिंगी ! आता हे कबूलच केले पाहिजे, की आमचा म्हणजे काही धनेश्वरपंतासारख्या बडया बारदानाचा कारखाना नव्हे. ते म्हणजे जगड्व्याळ काम ! तुम्हाला ठाऊ क नाही धनेश्वर म्हणजे किती भारीपैकी असामी आहे ते. घरी हत्तीघोडे झुलवील ना मनात आणील तर तो! अहो, पेढीवर एक मुनीमसुध्दा ठेवला आहे ना त्याने !

घनश्याम :      तो मुनीम सध्या आपल्यापुढे उभा आहे ! त्याचे नाव घनश्याम हे सुध्दा मला माहीत आहे. त्याला आपल्याजवळ काही सांगावयाचे आहे. आणखी खरे सांगू आपल्याला! आपण त्याला काही सांगू देत नाही.

धुंडिराज :    जरासा विषयाला सोडून बोललो खरा ! सांगत होतो हेच, की मी धनेश्वरासारखा श्रीमंत नाही. कबूल आहे, मी पुष्कळ म्हटले की मी बुवा मोठा लाखोपति आहे. घनश्याम, सारी सोंगे आणता येतील; पण पैशाचे सोंग आणणे मोठे कठीण आहे ! आता तुम्ही म्हणाल, की बाबा रे, तू जर असा कफल्लक, तर मग या लष्कराच्या भाकरी भाजायला तुला कुणी सांगितले होते ? प्रभाकरला तूच कशाला शिकवायला ठेवून घेतलास ? हा, हे बोलणे रास्त आहे, हिशेबी आहे अन् मुद्देसूद आहे !  आमचे काय उत्तर असेल सांगा बघू ? एक आपली गंमत म्हणून; चला, काय असेल उत्तर ?

घनश्याम :  (स्वगत) निरुत्तर केले आहे अगदी या गृहस्थाने ! एकच चरण तीनतीनदा घोळवून एखाद्या चिजेला रंग येत असेल कदाचित्; पण एकच गोष्ट तीन तीन शब्दांनी सांगणारी ही चीज मात्र अजब आहे खरी. नाही म्हणायला एका दृष्टीने नाटककाराला असले रत्न उपयोगी आहे खरे. नाटकाच्या पहिल्या प्रवेशात या स्वारीची योजना केली एकदा, म्हणजे त्याच्या सहज बोलण्याच्या ओघातच सार्‍या पात्रांशी प्रेक्षकाची सुरेख ओळख होऊ न जायची.  शब्दांच्या या खैरातीमुळे मला आता अशी भीती वाटायला लागली आहे, की शेवटी माझ्या मागणीच्या उत्तरादाखल बोलायला याजवळ एखादा तरी शब्द शिल्लक राहील की नाही ! आला चेहेरा खुलून ! पुन्हा बोलणार वाटते ! म्हातारपणामुळे याच्या जिभेला बांधलेल्या नाडयाशिरा पार तुटल्या आहेत की काय ?  बोल, शब्दसृष्टीच्या परमेश्वरा, अगदी मोकळया जिभेने बोल ! शब्दांनी शरपंजरी पडून मरणारा पहिला वीर म्हणून तरी माझा लौकिक होईल.

धुंडिराज :    जुन्या काळची गोष्ट आहे फार; तुमच्या लक्षातच यायची नाही कधी. मूळ म्हटले म्हणजे असे आहे, की आमच्या लहानपणी घरची फार गरिबी, अन् चार अक्षरे शिकायची तर मोठी हौस मनाला ! काय सांगावे, महाराजा ! घटका  घटका आम्ही आशाळभूतपणाने नव्या शाळेच्या दाराशी जाऊ न बसावे, अन् आतल्या आत तळमळावे, की देवराया, काय रे बाबा तुझ्या घरी असे पाप केले होते, म्हणून या तुझ्या देवळात आम्हाला यायची अशी चोरी व्हावी ? ते दिवस डोळयांपुढे उभे राहिले म्हणजे टपाटपा टिपे येतात बरे अजून डोळयांतून ! मनातली इच्छा मनात गिळून टाकिली बरे त्या वेळी ! तेव्हापासून मनाचा आपला कृतसंकल्पच की, हाती पैसा खेळू लागला रे लागला की कुणा तरी गरीब मुलाला विद्या ही शिकवायची म्हणून ! म्हणून या प्रभाकराला पोटच्या पोरासारखा घरी वागविला आहे. आमचे स्नेहीसोबती हसले आम्हाला तेव्हा, की घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे म्हणून. बाबा रे, विद्यादान केल्याचा आनंद काही निराळा आहे म्हणावे. प्रभाला इंग्रजीत बोलता-वाचताना पाहिले म्हणजे असे वाटते की बस्स. बरे, तसा मोठा पायगुणाचा आहे. हा घरात आल्यावर चार-दोन वर्षांनी आमची मालती झाली, पुढे तिच्या पाठीवर कुसुम, कुसुमच्या पाठीवर कुमुद. तिच्या पाठीवर-

घनश्याम :  (स्वगत) यांच्या पाठीवर मात्र कोरडेच ओढले पाहिजेत आता. इतक्या वेळा सूचना देऊ न व्यर्थ. शहाण्याला शब्दांचा मार ही म्हण मला निराळया अर्थाने पटू लागली आहे.

धुंडिराज :    हो, कुमुदच्या पाठची दोन भावंडे गेली; अन् पुढे तीन मुलगे ! बरे, तात्पर्य काय, प्रभाकराने पाऊ ल टाकल्यापासून घर आपले नांदतेगाजते झाले ! आज होय नव्हे किमानपक्ष वीस वर्षे झाली- हो, आला होता तेव्हा किती वर्षांचा होता हा? हे साल कोणते बरे ?  थांबा, रोजनिशीच बघू या अं ! (रोजनिशी पाहू लागतो)

घनश्याम :  (स्वगत) मला हे चऱ्हाट ऐकत पुढची वीस वर्षे घालवावी लागणार असे दिसते !

धुंडिराज :    रोजनिशी राहिली घरी ! तूर्तास ठोकळ मानानेच घ्या ना. आला तेव्हा सुमार चार-पाच वर्षाचा; पाच-सहा म्हणजे डोक्यावरून पाणी अगदी. पुढे तीनचार वर्षांनी आमची मालती झाली, आणि आज मालती म्हणजे शके अठराशे- तसे कशाला? उघड हिशेब अगदी - आमची मालती म्हणजे तुमच्या धनेश्वराच्या लतिकेच्या बरोबरीची. वयात तफावत नाही; स्वभावात म्हणाल तर आहे. आमची मालण मोठी सात्त्वि; तुमच्या धनेश्वराच्या मनोहराचा मासला ! मनोहर तरी मुलगा मोठा गुणाचा ! हो, पण तुम्हाला ठाऊ क असेल, शिकतो काय हो मनोहर ते दगडधोंडे गोळा करून ?

घनश्याम :      शास्त्रीय विषयांच्या विद्यार्थ्यांना भूगर्भशास्त्र शिकण्यासाठी दगडधोंडयांची चांगली माहिती मिळवावी लागते.

धुंडिराज :    काय काय नवीन निघेल काही सांगता यायचे नाही. घ्यायचे काय त्यातले - की मनोहराच्या मनाची जी ठेवण आहे, बस, तीच आमच्या मालणची. आता लतिका आहे. लक्षाधीशाची मुलगी, त्यातून एकटी, अन् बाळपणापासून आईविरहित.  त्यामुळे तिचा स्वभाव थोडा तापट आहे. बाकी मुलगी मनाने फारच सरळ बरे ! अगदी आमच्या प्रभाचा नमुना ! तुम्ही एक बोला - त्याचे एकोदरशे झालेच ! हो, तुमच्या बोलण्यावरून निघाले बोलणे, नाही का ? आमच्या प्रभाचे बोलणे तुमच्यासारखेच; पण जरा उतावळे अन् तापट.  मनात काही नसायचे, पण फटकळ म्हणजे काय म्हणता ! पण आम्ही काय म्हणतो- मनात हो मात्र - तसा दर्शनी राग दाखवितोच कधी मधी - मनात म्हणतो, पोराला कोण कोडकौतुक करायला? आपणच त्याची आईबापं. तडकन तोडून बोलले आणि त्याला लागले ते, तर बघायचे कुणाच्या तोंडाकडे त्याने बरे ? आपले उपकार का जाणवायचे आहेत त्याला? आमची ही तर फारच मायाळू ! काय सांगावे तुम्हाला, घनश्याम ! मरावे न् त्या माउलीच्या पोटी यावे बरे ! आले लक्षात आले ! हसलात का ते आले लक्षात ! बस्स ! हेच आवडते आम्हाला ! अन् तुम्ही म्हणता तुमच्या बोलण्याचा राग येईल आम्हाला म्हणून ! अहो, आहेत कुठे अशी गुणाची बाळे? तुम्ही सुध्दा छान केलेत मोठे ! आईबाप लहानपणीच अंतरले - देवाची योजना मोठी कठीण आहे - हं - तरी तुम्ही आपले स्वत:च्या करामतीने या पदवीला येऊ न पोहोचला. बेश झाले !  आशीर्वाद आहे आमचा आपला तुम्हाला ! आपला असाच सुखाचा संसार करा, चार पोराबाळांचे धनी व्हा, आनंद करा ! तुमच्या आईबापांना जे वाटले असते तेच आम्हाला वाटेल. आमची ही काय, मी काय, आमचे आपले एक म्हणणे आहे - काय ? की, तुम्हा पोराबाळांचे संसार थाटलेले पाहावेत, एखादे दिवशी आपले बसल्या जागी आनंदाने गपकन् डोळे मिटावेत अन् आपले देवाजीच्या कारणी पडावे ! घनश्याम, तुम्ही मंडळींनी आता संसार मांडायला हवेत, बरे का ?  आम्ही म्हातारपणी करायचे काय आता ?

घनश्याम :      आपण वृध्दापकाळी काय करावे म्हणून विचारता, आणि आम्हा तरुणांना संसार थाटण्यासाठी आग्रह करिता? धुंडिराजपंत; आपला स्वभाव इतका प्रेमळ आहे म्हणूनच मी स्पष्टपणे बोलण्याचे धाडस करतो. आम्ही तरुणांनी संसार थाटावा हे उचित आहे खरे; पण त्या कामी आपणासारख्या प्रेमळ वृध्दांनी आम्हाला आशीर्वादापेक्षा अधिक साह्य करायला नको का ? धुंडिराजपंत, माझ्या भावी संसाराची घटना करण्याचे महत्त्वाचे काम केवळ आपल्या हाती आहे. आपल्या सुशील कन्येची मागणी करण्याकरिता मी आलो आहे. हा प्रकार अंमळ अपूर्व आहे. मुलीच्या बापाने वरसंशोधन करण्यासाठी हिंडावे; आणि केवळ वडील माणसांनीच या प्रश्नाची वाटाघाट करावी, हा आपल्या समाजातला रूढ मार्ग आहे. पण माझ्या आणि मालतीच्या विवाहाच्या एकंदर विषयात दोन्ही पक्षी वडीलपणा केवळ आपल्याकडेच आहे. धुंडिराजपंत, अनुरूप वधूच्या प्राप्तीबरोबर मला प्रेमळ मातापितरांचाही लाभ व्हावा असाच सुंदर योगायोग दिसतो. हे सारे आपल्या संमतीवर अवलंबून आहे. माझ्या भाग्यशाली आशेला आपल्या आशीर्वादाचे बळ मिळेल का ?

धुंडिराज :    घनश्याम, काय, म्हणता काय तुम्ही हे ? वा:, असे स्थळ म्हणजे-

घनश्याम :      हा, अशा महत्त्वाच्या गोष्टीबद्दल स्थळकाळाचा मी विचार केला नाही ही गोष्ट मला कबूल आहे. आपल्यासारख्या प्रेमळ पित्याला असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे, की अशी रस्त्यावर सहज बोलता बोलता मागणी करायला माझी मुलगी काय वाटेवर पडली आहे म्हणून ! पण धुंडिराजपंत, आपण सहृदय आहात. तरुण मनाची उतावळी उत्सुकता लक्षात घ्या. प्रभाकरांना विद्यादान देताना आपण आपल्या बाळपणीच्या सुध्दा भावनांची आठवण ताजी ठेविलीत. मग मला कन्यादान करताना आपल्या तारुण्याच्या आठवणींची पुन्हा आठवण करणे आपल्याला खात्रीने सोपे जाणार आहे. वस्तुत: आपल्या सुंदर आणि सद्गुणी कन्येची योग्यता इतकी मोठी आहे, की तिच्यासाठी मागणी घालायला येताना जगद्विजयी सार्वभौमाने आपली जयवाद्ये शिवेबाहेरच बंद ठेवावी किंवा जगद्गुरूने आपल्या मशाली विझवून टाकाव्या.

धुंडिराज :    जगद्गुरूने लग्नासाठी यायचे हा दृष्टांत चुकला, बरे का ? का, घनश्याम, आमच्यातही डोक्याचे काम आहे की नाही बोला. बरे ते जाऊ द्या ! घनश्याम, तुम्ही म्हणता ते काही खोटे नाही. माझ्या मालतीचे गुण मी काय सांगू तुम्हाला? तुम्ही तिची निवड केली म्हणून तिच्याच ऐवजी मी तुम्हालाच धन्यवाद देईन. काय सांगावे तुम्हाला ? ती जितकी बुध्दिमान आहे तितकीच सरळ आहे. सुंदर आहे तशी साधी आहे. साध्या बोलण्याचालण्यात बालकापेक्षा अल्लड आणि जबाबदारीच्या वेळी वृध्दापेक्षाही पोक्त. आनंदवृत्ती आणि गंभीर. फुलासारखी नाजूक आणि ताऱ्यांसारखी तेजस्वी ! जिभेची जरा जड, पण डोळयाने बोलणारी! शुध्द, विशाळ आणि सोज्वळ दृष्टि ! माझी मालती डोळे भरून माझ्याकडे पाहू लागली म्हणजे माझ्या आईच्या डोळयांतली निर्मळ माया, माझ्या बायकोच्या डोळयांच्या ठेवणीत दिसायला लागते ! मालतीचं काय, आमची सगळीच मुले मोठी गुणी. तेवढयासाठी एक म्हणून निश्चय केला आहे, की पैसा खर्च होवो; कष्ट पडोत, मुलांना म्हणून गरिबी जाणवूं द्यायची नाही ! अहो, हीच आपली धनदौलत! एरवी म्हणाल तर असा पैसा आला अन् असा गेला.  घनश्याम, थकून भागून संध्याकाळी असे घरी येऊ न पडावे, अन् भोवताली या आनंदी पाखरांची एकदा गोड गजबज सुरू झाली, म्हणजे सारा शीणभाग हरून जातो अगदी ! जीव की प्राण आहेत माझी मुले म्हणजे मला ! अवतीभोवती अशी किलबिल करू लागली म्हणजे जिवाला गार वार्‍यावर चांदण्यात पडल्यासारखे वाटते. त्यातल्या त्यात आमची मालती म्हणजे केवळ कलिजा आहे सगळयांच्या जिवाचा. काय एकेक गुण सांगू तिचा !

घनश्याम :      धुंडिराजपंत, आपल्या आणि माझ्याही अत्यंत आवडत्या विषयावर आपण बोलता आहां तरी सुध्दा मी आपणाला अडथळा करीत आहे, यावरून माझ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी किती अधीर झालो आहे याची कल्पना करा आणि मला माझ्या भावी भाग्याची कल्पना द्या ! माझ्या विनंतीला आपली संमती आहे का ?

धुंडिराज :    हा, ते कठीण काम आहे ! खरे सांगू आता ? या बाबतीत तुम्ही मालतीचीच आधी संमती घ्या. तिचा रूकार पडला म्हणजे आमचे काम एवढेच उरले, की पोरगी पिवळी करून तुमच्या पदरात टाकायची, आणखी दोन हस्तक अन् तिसरे मस्तक तुमच्या चरणी ठेवून मोकळे व्हायचे ! हुंडापांडा, पोषाखकरणी मी गरीब बाप काय देणार ? पण आपल्या छंदाने वागवून मुलीला तिच्या मर्जीविरुध्द कुणाच्या गळयात बांधायची हे मात्र आपल्याकडून कदापि होणे नाही. जन्मसंबंधांच्या या गोष्टी ! बाप म्हणजे मग बापच तो ! त्यात लटपट नाही उपयोगी ! बापाने मुलीचे मन मोडणे म्हणजे ते उक्त नव्हे, रास्त नव्हे अन् बरे नव्हे; शिवाय ते ठीकही नाही. तेव्हा म्हणतो की तुम्ही तिलाच समक्षासमक्ष विचारून टाका. आमच्या मुलीवर आमचा आहे भरवसा. तिची एकटीची भेट घ्यायला आम्हीच तुम्हाला घरी नेतो ! चला याच पावली घरी. मालतीने हो म्हटले की झाले ! आमच्या हिची संमती सुध्दा नको. ती आहे जरा छांदिष्ट. जरा म्हणजे तशी छांदिष्ट नाही-साधारण छांदिष्ट नाही, पण छांदिष्टच आहे- अन् फारच छांदिष्ट आहे. पण भ्यायला नको. मालतीच्या मनाने घेतले हे, म्हणजे आमच्या हिचा बंदोबस्त मी करतो. असे काही असले म्हणजे मी करतो काय ? दोनचार दिवस वरपांगी सोंग आणतो रागाचे; जसा काही जमदग्नी ! चारचार दिवस एक अवतार ठेवतो असा की काम फत्ते ! तसा गबाळा नाही बरे का मी ? ते सोंग करितो वाटेल तेव्हा ! चला तुम्ही आधी. आता उगीच बोलण्याने बोलणे वाढवू नका. फार बोलणे अन् तेही म्हटले म्हणजे उगाच वाढवून बोलणे हे उचित नाही, रास्त नाही अन् योग्य नाही; शिवाय ते ठीकही नाही. चला घनश्याम. चला म्हटले म्हणजे मग एकदम चलाच. (दोघे जातात.)