गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

अंक पहिला

प्रवेश पहिला

(बाबासाहेब, तात्यासाहेब व कमलाकर आगगाडीची वाट पहात आहेत.)
बाबा : तीन घंटा तर झाल्या ! ही तिसरीच घंटा ना? पण गाडीचा अजून पत्ता नाही.
तात्या, गाडीची वेळ तर बदलली नाही ना?

तात्या : छे, छे, वेळ बदलली असेल तर घंटा कशाला होतील? हिंदू लोकांच्या
गचाळपणाला हसता हसता साहेब लोकांनीही अखेर तोच मार्ग पत्करला
आहेसे दिसते. कमलाकर, तपास करा बरे काय झाले आहे त्याचा.

कमलाकर : इथून विचारून जमायचे नाही. तात्यासाहेब, आपण आणि बाबासाहेब इथेच
थांबा काही काळ. मी त्या बाजूला जाऊन तपास करतो.
(जातो.)

बाबा : तात्या, तुझ्याशी मघापासून बोलेन बोलेन म्हणतो, पण अजून धीर होत
नाही; माझे बोलणे ऐकून तुला कदाचित विषाद वाटेल.

तात्या : विषाद! मला आपल्या बोलण्याचा विषाद कधीच वाटत नाही. बाबासाहेब,
आपल्यातल्या सामाजिक मतभेदामुळे आपल्या दोघांच्या विचारात इतके
अंतर पडत गेले, पण म्हणून आपल्या बालपणाच्या बंधुभावात अंतर पडले
आहे का? काय सांगावयाचे असेल ते मोकळ्या मनाने सांगा. बाबा : त्या मतेभेदाबद्दलच मी बोलणार आहे. सुशीला आणि लीला यांच्यावर-
निदान लीलेवर-सुशीलेबद्दल मला फारसे भय वाटत नाही; पण लीला मात्र,
तुला ठाऊकच आहे- जरा अल्लड आहे; म्हणून तिच्यावर नीट लक्ष ठेवून-

तात्या
: म्हणजे माझ्या वीणेचा पिता या नात्याने माझी जबाबदारी तरी मला कळत
नाही किंवा वीणा आणि लीला-सुशीला ह्यांच्यात मी अंतर तरी करितो
असेच तुमचे म्हणणे दिसते!

बाबा : पहा! माझा हेतू न समजता रागावलास खरा! अविवाहित वीणेपेक्षा
वैधव्यदशेत पडलेल्या लीला आणि सुशीला ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला
पाहिजे. ह्यात अंतराचा प्रश्न मुळीच नाही. पाश्र्चिमात्य सुधारणेच्या गोष्टी
ऐकून अविवाहित मुलगी फार झाले तर प्रीतिविवाहाचे चार करील- ते सुद्धा
वाईटच म्हणा! पण अल्लड बालविधवा मात्र पुनर्विवाहाबद्दलची सारखी बडबड
ऐकून-

तात्या : काय? बडबड म्हणता? 

बाबा : नाही; केवळ बडबड नाही. पण तो प्रश्र्न पुढच्या पिढीने सोडवावयाचा आहे.
पण आज, दोन विधवा मुली म्हणजे उरावर दोन जळत्या शेगड्या समजणारी जी
माणसे आहेत त्यांपैकीच मी आहे; तशातून आजच जयंत आणि त्याचा मित्र
विद्याधर दोघेही यावयाचे आहेत.

तात्या : म्हणजे? मी नाही समजलो आपले म्हणणे! जयंत आपला सख्खा भाचा,
आणि त्याच्या येण्याने आपले मन साशंक व्हावे, हे अगदी चमत्कारिक
आहे! आणि त्याचा मित्र विद्याधर- केवळ जयंताचा तो मित्र आहे हीच
गोष्ट त्याच्या चांगुलपणाची पुरेशी साक्ष आहे.

बाबा : तात्या, किती भलता विपर्यास केलास माझ्या बोल याचा! जयंत आणि
विद्याधर यांच्याबद्दल सुद्धा माझ्या मनात आदरच आहे; मी सुद्धा
त्यांच्यासाठी आजचा दिवस इथे राहणार होतो; पण दवाखान्यात बरेच नवीन
रोगी आले आहेत असे माझ्या हाताखालच्या मनुष्याचे निकडीचे पत्र
आल्यामुळे मला राहता येत नाही. शिवाय तेही वकिलीची सनद काढून
आता नेहमीच इथे राहणार आहेत. माझ्या बोल याचा उद्देश अगदी निराळा
होता.

तात्या : कोणता तो? मा्झ्या अजून लक्षात येत नाही!

बाबा : पहिल्याने भलताच तर्क केल्यामुळे तु्झ्या विचाराची नसती दिशाभूल झाली.
मी एवढेच म्हणत होतो की, तुमच्या घरी सदैव सुधारणेबद्दल वादविवाद
चालतात, तो वसंतराव, त्याची बहीण ती  द्रुमन, तुझी वीणा, हा कमलाकर,
सारेच सुधारक; त्यात आणखी जयंत आणि विद्याधर ह्यांची भर पडली म्हणजे
सुधारणा, पुनर्विवाह यांखेरीज विषय निघणार नाही बोलण्यात! जयंत शहाणा,
समजूतदार असला तरी मोठा उतावळा, सह्वदय आणि थोडासा अविचारी
आहे. तो केव्हा काय बोलेल ह्याचा नेम नाही. आणि तशातून स्त्री-पुरुषांच्या
अशा स्वैर संभाषणाला तुझे पूर्ण अनुमोदन! तेव्हा लीला-सुशीला ह्यांच्यावर
अशा बोल याचा अनिष्ट परिणाम व्हायचा!

तात्या : अनिष्ट परिणाम तो कोणता? पुनर्विवाह हाच ना? मग आपल्याला जे अनिष्ट
तेच मला इष्ट वाटते! त्यांच्यावर पुनर्विवाहाला अनुकूल परिणाम झाला, तर
मी उलट त्यात आनंद मानीन!

बाबा : पण तशा प्रकाराला माझी मुळीच संमती नाही! पुनर्विवाहाचा प्रघात
नसल्यामुळे
समाजाची मोठी हानी होते आहे असे मला मुळीच वाटत नाही! मी पुनर्विवाहाला
अजून पहिल्या इतकाच विरूद्ध आहे. तू जरी माझा सख्खा भाऊ असलास
तरी आपल्या वयांमध्ये निदान पंधरा वर्षांचे चे म्हणजे जवळ-जवळ एका पिढीचे
अंतर आहे, तेच आपल्या विचारांतही आहे.

तात्या : जरा स्पष्ट बोलतो, रागावू नका! इंग्रजी ज्ञानाच्या अंजनाने आमच्या पिढीचे जसे
डोळे उघडले तसे तुमच्या जुन्या पिढीचे उघडले नाहीत याचे राहून राहून मोठे
नवल वाटते.

बाबा : यात मुळीच नवल वाटायला नको. नव्या मंडळीचे डोळे उघडले खरे; पण ते
इतके एकदम उघडले की, ते अगदी बटारल्यासारखे दिसू लागले; आणि
त्या भयाने जुन्या पक्षाने आपले डोळे एकदम मिटून घेतले. नव्या पक्षाने
अगदी विलक्षण आचारभ्रष्टता करून आपल्या सुधारणेचा केवळ अनिष्ट
परिणामच दाखविला नसता तर जुन्या पिढीनेही सुधारणेकडे अशी डोळेझाक
केली नसती. पण नव्या लोकांनी सरसकट 'नवे ते हवे' असा हेका धरिला
तेव्हा अर्थातच आघाताइतक्याच नेटाच्या प्रत्याघातामुळे 'जुने ते सोने' असा
जुन्या लोकांनी आग्रह धरिला. तीव्र मतभेदामुळे जोडीत गोडी असते ह्याचे
कोणालाच भान राहिले नाही. आणि शेवटी पहिल्या पिढीतल्या सुधारकांच्या
स्वैर वर्तनामुळे सुधारणेला अनिष्ट स्वरूप मिळत गेले.

तात्या : हे मात्र खरे. पहिल्या पिढीच्या पुढा-यांनी सुधारणेची वेळ रूढीच्या काटेरी
कुंपणावरूनच जपून समाजवृक्षावर चढविली असती, तर आज तिला
आचाराची सुंदर फुले खास आली असती. पण अनुकरणाच्या आंधळेपणाने
त्यांनी तिला वरचेवर टाकून समाजवृक्षावर चढविताना घाईने खाली पाडून
मातीला मात्र मिळविली. पण बाबासाहेब, आता त्या गोष्टीचा आपणावर
परिणाम व्हावयाला नको आहे. पुनर्विवाहासारख्या इष्ट सुधारणेला आपण
आड येणे फारच अनिष्ट आहे.

बाबा : माझा स्वभाव तुला ठाऊकच आहे. प्रत्यक्ष प्रमाणाच्या पुराव्याखेरीज माझ्या
मतात बदल होणे शक्य नाही. पुनर्विवाहाचे माझे आक्षेप इतक्या घाईने
सांगता येण्याजोगे नाहीत; पण मी पुनर्विवाहाच्या विरूद्ध आहे, इतकेच नाही
तर तु्झ्या घरातल्या ह्या स्त्री-पुरूषांच्या स्वैर संमीलनाच्याही मी विरूद्ध आहे.
आणि त्याला काही आळा घालावा एवढ्यासाठीच मी हा विषय मुद्दाम
काढला.

तात्या : क्षमा करा, स्त्री-पुरूषांच्या निर्दोष संमीलनात जो दोष दिसतो तो आनुवंशिक
दृष्टीचा दोष आहे.

बाबा : हे म्हणताना तू आमच्या समाजावर दृष्टी टाकली नाहीस. स्त्री-पुरुषांच्या अशा
अनियंत्र सहवासाने समाजात अतिरेकाचे परिणाम झालेले दिसून येत नाहीत
का?

तात्या
: कुठे कुठे असे होणारच! कोणताही निर्बंध एकदम मोडायचा म्हटले म्हणजे
थोडासा अतिरेक हा ठरलेलाच! कोंडलेला नदीचा प्रवाह एकदम सुटताच
प्रथम जोराच्या वेगाने वहायचा! त्याला आपली तयारी पाहिजे!

बाबा : मग ह्या प्रकाराला आळा घालण्याची तुझी तयारी नाही म्हणतोस?

तात्या : नाही, मुळीच नाही; तुमच्याच शब्दांची पुनरुक्ती होईल, पण प्रत्यक्ष
प्रमाणाच्या पुराव्यावाचून माझे मत मुळीच बदलावयाचे नाही. इतकेच नाही
तर इष्ट सुधारणेला संशयाचा सुद्धा मी फायदा देईन. आपल्या मंडळीच्या
शुद्धाचरणाबद्दल माझी खात्री आहे, तो पर्यंत मी त्यांच्या एकजागी उठण्या-
बसण्याविरुद्ध एक अक्षरही बोलणार नाही. उलट उत्तेजन देईन. पण त्यापैकी
एखाद्याचे वर्तन जरी काडीइतके निराळे दिसले तर मात्र त्यांना एकमेकांशी
एक अक्षरही बोलू देणार नाही.

बाबा : बरे, ते काही असो; सध्या लीला आणि सुशीला यांच्यावर मा्झ्या दृष्टीने
लक्ष ठेव म्हणजे झाले.

तात्या : त्याबद्दल तुम्ही निर्धास्त रहा!
(कमलाकर हमालासह घाईघाईने प्रवेश करतो.)

कमलाकर : बाबासाहेब, जरा घोटाळा झाला! गाडी आज त्या बाजूला येणार. आपण
दोघे या हमालाबरोबर पुढे व्हा! तो पर्यंत मी सामानाजवळ उभा राहतो.
(हमालास) हं, उचल ते सामान आणि पुन्हा लवकर ये.
(हमाल, बाबासाहेब व तात्यासाहेब जातात.)

कमलाकर : (स्वगत) काय दैवयोग पहा! या बाबासाहेबांची त्या पोरीवरची देखरेख कमी
होऊन माझ्या कर्तबगारीला थोडी सवड मिळणार तोच माझा लहानपणापासूनच
प्रच्येक बाबतीत प्रतिस्पर्धी तो जयंत आताच येणार! आणि तात्यासाहेबांच्या
सुधारणेचा फायदा त्याला मिळणार. या सा-या छबेल्या त्याच्यावर कशा
आजन्म फिदा झालेल्या दिसतात. त्यामुळे शेवटी हा जयंत या गोपींनी भरलेल्या
गोकुळात कृष्णाचे खेळ करणार आणि कृष्णविरहित गोपी आपल्यासाठी
धुंडाळण्याचा निष्फळ प्रयत्न करून थकलेल्या नारदाप्रमाणे मला कलागतीवर
भिस्त ठेवावी लागणार!
(हमाल येतो.)

हमाल : चला रावसाहेब लौकर; गाडी आली.
(दुस-या बाजूस गाडी येताना दिसते. कमलाकर व हमाल घाईघाईने जातात.
पडदा पडतो.)