गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

वेड्याचा बाजार अंक पहिला (प्रवेश पहिला)

प्रवेश पहिला

नमन
अतुल तव कृति अति भ्रमवि मति ईश्वरा !  ॥ध्रु.॥
वर्षती मेघजल, शांतविति भूमितल, सलिल मग त्यजुनि मल जात सुरमंदिरा ॥
गोविंद पूर्व-पद-अग्रज स्मरुनि पद, उधळि निज हृत्सुखद शब्द रत्नाकरा !  
(गोविंदाग्रज)
(मधुकर व वसंत)
(स्थळ : रस्ता)

मधुकर :    वेडयांचा बाजार आहे आमचे घर म्हणजे ! वसंतराव, एकेकाचा प्रकार ऐकलात तर अक्कल गुंग होऊन जाईल तुमची ! नाहीतर उगीच वेणूताईचे लग्न इतके लांबणीवर पडले असते का ! आज काही नाही तरी सोळावे वर्ष असेल तिला ! पण आमचे तात्या पडले ज्येतिष्याच्या नादात ! आण्णासाहेबांना सगळा वैद्यकाचा व्यापार आणि आईला देवधर्म पुरतात ! बरे दादाविषयी म्हणाल तर त्याने संन्यासदीक्षा घ्यावयाची फक्त बाकी ठेविली आहे !

वसंत :    खरेच, माधवरावांच्या डोक्यात हे वेड कसे काय आले ?

मधुकर :    लग्न झाले तोपर्यंत सर्व ठीक होते; पुढे त्यांना कळले की, वहिनीला लिहिता वाचता येत नाही म्हणून; आणि हे म्हणजे पक्के सुधारणावादी ! केला निश्चय की, पुन्हा म्हणून बायकोचे तोंड पहावयाचे नाही, आणि त्या सुमारास विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, हंसस्वरूप या मंडळींच्या व्याख्यानांचा प्रसार सुरू झाला होता. त्या वैतागात आमच्या दादासाहेबांनीही परमार्थाची कास धरिली !  इकडे बिचारी रमावहिनी माहेरी चांगले लिहायला वाचायला शिकली, पण उपयोग काय ?  इतक्या  अवकाशात  दादासाहेब  पूर्ण विरक्त बनले !  वहिनींना घरी आणावयाचे नाव काढले की हे घर सोडण्याच्या प्रतिज्ञा करायला लागतात !

वसंत :    पण मधुकर, मला वाटते की माधवरावांचे हे वैराग्य फार दिवस टिकणार नाही !  हे दोन दिवासांचे वारे दिसते सगळे ! काही प्रयत्न केला तर माधवराव अजून ठिकाणावर येतील !

मधुकर :    येतील तेव्हा खरे ! पण आज तर घरात ऐका वेडयाची भर पडली आणि बाकीच्यांच्या वेडांना उठावणी मिळाली ! तात्या म्हणतात त्याला साडेसाती आहे सध्या; अण्णा म्हणतात, अभ्यासाने आणि जाग्रणाने त्याचे डोके फिरले आहे आणि आई म्हणते कुणी तरी जादूटोणा केला आहे !

पुढे वाचा: वेड्याचा बाजार अंक पहिला (प्रवेश पहिला)