गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

मृत्यूनंतर गुरूची प्रस्तावना

गडक-यांच्या मृत्यूनंतर त्यांचे
गुरू गोविंद चिमणाजी भाटे यांनी
एका पुस्तकाच्या आवृत्तीस लिहिलेली प्रस्तावना


माझे मित्र कै. राम गणेश गडकरी यांच्या 'प्रेमसंन्यास' या पहिल्या नाटयकृतीला मी त्यांच्या विनंतीवरून पहिली प्रस्तावना लिहिली होती. त्या गोष्टीला आता दहावर वर्षे झाली. त्यानंतर गडक-यांच्या दुस-या नाटयकृती समाजापुढे येऊन गडक-यांचे नाव सर्वतोमुखी झाले व त्यांच्या नाटयसंसाराच्या अद्वितीय कारभाराने सर्वांचे डोळे दीपून जाऊ लागले. तोच अकाली, अल्पवयात व आपल्या एका नाटकरूपी अपत्याला जन्म दिल्याबरोबर त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नाटकृतींची वाङ्मयावृत्ती काढण्याचे सरस्वती मंडळाने ठरविले व पहिल्या नाटकाचा धर्मपिता या नात्याने या नाटकाच्या दुस-या आवृत्तीची प्रस्तावना मीच लिहावी अशी त्या मंडळाने विनंती केल्यावरून कै. गडक-यांच्या मृत्यूने हळहळणा-या मनाने मी आज ही प्रस्तावना लिहावयास लेखणी हाती धरली आहे.

कै. गडक-यांच्या प्रतिभाशक्तीने एकंदर पाच नाटके निर्माण केली. त्यांची प्रतिभाशक्ति शुक्लपक्षातील चंद्राप्रमाणे सारखी वाढत होती व म्हणून त्यांच्या या पाच कृती म्हणजे चंद्राच्या पाच अवस्थांप्रमाणे जास्त जास्त आनंददायक होत गेल्या आहेत. 'प्रेमसंन्यास' हे नाटक प्रतिपच्चंद्राप्रमाणे आहे. या नाटकात गडक-यांच्या प्रतिभेचा उदय होऊन तिच्या सुखद प्रकाशाच्या छटा व  भावी वैभवाची साक्ष वाचकांच्या व प्रेक्षकांच्या नजरेस येते. त्यांचे दुसरे नाटक 'पुण्यप्रभाव' हे चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे आहे. यात गडक-यांच्या प्रतिभेचा शीतल व मनाला चकित करणारा प्रकाश दृष्टीस पडून वाचकांचे मन थक्क होते. त्यांचे तिसरे नाटक 'एकच प्याला' हे अष्टमीच्या चंद्राप्रमाणे आहे. यात गडक-यांच्या प्रतिभेचा प्रकाश सर्वत्र पसरून दीर्घकाळ टिकणारा आहे असे नजरेस येते. त्यांचे चौथे नाटक 'भावबंधन' हे द्वादशीच्या चंद्राप्रमाणे आहे. यात त्यांच्या प्रतिभेच्या प्रकाशाचे पटल सर्व दशदिशांभर पसरले आहे व जिकडे नजर फेकावी तिकडे प्रकाशच प्रकाश वाचकांस दिसू लागतो. रा. गडक-यांचे पाचवे नाटक 'राजसंन्यास' हे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आहे. यात गडक-यांच्या प्रतिभेच्या देदीप्यमान प्रकाशाने मनुष्याचे मन आनंदसागरात पोहू लागते; पण पौर्णिमेचा चंद्र आकाशात मध्यावर येण्याचे सुमारास जसे त्यास राहूने ग्रासून खग्रास ग्रहण पाडावे त्याप्रमाणे 'राजसंन्यास' हे नाटक अर्धेमुर्धे तयार झाले नाही तोच क्रूर मृत्यूने गडक-यांस ग्रासून त्यांच्या 'राजसंन्यासा'स कायमचे खग्रास ग्रहण लावले हे मराठी भाषेचे व महाराष्ट्राचे केवढे दुर्भाग्य! पण ज्याप्रमाणे खग्रास सूर्यग्रहण किंवा खग्रास चंद्रग्रहण यांचे वेळी ज्योतिषी आपल्या दुर्बिणीच्या साहाय्याने सूर्याचे किंवा चंद्राचे सावकाश व सूक्ष्म निरीक्षण करून त्या त्या गोलाचे विशेष ज्ञान मिळविण्यात उपयोग करतात, त्याप्रमाणे कै. गडक-यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नाटकांचा विशेष कोणकोणत्या बाबतीत आहे हे येथे सांगणे अप्रासंगिक होणार नाही. नाटकपंचकाचे सविस्तर परीक्षण करण्यास नाटकांइतकाच मोठा ग्रंथ लिहावा लागेल व तसे करण्यास सध्या मला सवड नाही. या गेल्या पाच-पंचवीस वर्षांत महाराष्ट्रात किती तरी नाटकार झाले आहेत व होत आहेत; कारण आमच्या महाराष्ट्रात हल्ली नाटकांचा फार नाद लागलेला आहे. नाटकावर नाटककार व नाटक मंडळी यांना खूप पैसा मिळतो. यामुळे हा धंदा हल्ली डोळयावर येण्यासारखा झाला आहे. यामुळे किती तरी माणसे या नाटक लिहिण्याच्या नादी लागलेली आहेत. तेव्हा नाटककारांच्या वाढत्या मालिकेत कै. गडक-यांना अल्पावकाशातच अग्रपूजेचा मान का मिळाला व गडक-यांच्या निधनानंतर निरनिराळया ठिकाणी त्यांचे स्मृतिदिन का पाळण्यात येतात, अर्थात् गडक-यांच्या नाटकात इतके अद्वितीयत्व काय आहे हे प्रस्तावनेत सांगणे क्रमप्राप्त आहे; म्हणून थोडक्यात तसा प्रयत्न येथे केला आहे.

पुढे वाचा: मृत्यूनंतर गुरूची प्रस्तावना