गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

चिमुकली इसापनीती

प्रस्तावना

मुलांसाठी काहीतरी लिहावे हा फार दिवसांचा हेतू. चार-सहा महिन्यांखाली अगदी लहान मुलांसाठी एकाक्षर शब्दात लिहिलेली रॉबिन्सन क्रूसो, इसापनीती वगैरे इंग्रजी पुस्तके पाहण्यात येऊन मूळच्या विचाराला प्रस्तुत पुस्तकात दिसणारे स्वरूप आले. बाराखडया येऊ लागल्यापासून जोडाक्षरे येऊ लागेपर्यंत मुलांचा बराच काळ जातो. व साध्या अक्षरांची ओळख चांगली घटविण्यासाठी असा काळ जावा हे इष्टही आहे. पण ही साधी अक्षर-ओळख घटविण्यासाठी मुलाला काही काळ तरी 'कुशा, काशी, गाय, पाटी' यांसारख्या चार खंडांतल्या चार असंबध्द सवंगडयांशी बागडावे लागते किंवा 'वारा आला पाऊस गेला' यासारख्या सृष्टचमत्कारातल्या नीरस कार्यकारणसंबंधावर करमणूक करून घ्यावी लागते. एकंदरीनेच आमच्या हल्लीच्या शिक्षणक्रमात चटकदारपणा कमी. पण ही अडचण सर्वांशी दूर करणे हे जितके इष्ट आहे तितकेच- किंबहुना अधिक- दुष्कर आहे. त्यातल्या त्यात विद्यामृताच्या अगदी पहिल्याच घुटक्यास हा नीरसतेचा मक्षिकापात चुकविता आल्यास पाहावा म्हणून सदर प्रयत्न केला आहे. साधी अक्षर ओळख घटविण्यासाठी वर सांगितलेल्या असंबध्द शब्दसंघांपेक्षा व बोजड सिध्दांतांपेक्षा या पुस्तकाच्या वाचनाचा जास्त उपयोग होईल असे वाटते. मुलांना मनोरंजन पाहिजे. सुरुवातीलाच विद्यावनातले अवघडपणाचे कंटक रूपू लागले तर ती अगतिक होतील- निदान त्यांना विद्याप्राप्ती त्रासदायक तरी वाटेल. हे लक्षात घेऊन सदर पुस्तकात लहान लहान पण चटकदार गोष्टी अगदी साध्या भाषेत, सोप्या शब्दांनी व एकही जोडाक्षर न येऊ देता सांगितल्या आहेत. कोणाच्याही मदतीवाचून मुलांस हे पुस्तक वाचता येईल असा तर्क आहे. साध्या अक्षर ओळखीचा काळ तुलनात्मक दृष्टया थोडाच असल्यामुळे फक्त दहाच गोष्टी घेतल्या आहेत. वाचन सुलभ होण्यासाठी मुद्दाम मोठया टाईपाचा उपयोग केला आहे. चित्रेसुध्दा हवी होती; पण ते पडले जरा खर्चाचे काम. सुदैवाने पुढे मागे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघण्याचा सुयोग आलाच तर पाहता येईल. बालशिक्षणात मनोरंजनाची भर टाकण्याची जंगी कामगिरी या चिमुकल्या व एकाकी पुस्तकाने पार पडेल किंवा नाही याबद्दल शंकाच आहे; पण त्याचा उद्देश मात्र तसा आहे खास. जोडाक्षरे मुळीच येऊ द्यावयाची नाहीत असा त्रिविध संकल्प असल्यामुळे भाषा क्वचित वडील झाली आहे हे माझे मलाच दिसते आहे. पण त्याला उपाय नाही. केवळ दोषैकदृष्टया या भाषादूषणाबद्दल मजवर आक्षेप घेणारांना आधीच उत्तर देऊन ठेवितो की- स्वत: लिहून पाहा.

रा. ग. गडकरी
पुणे, न्यू इंग्लिश स्कूल,
ता. 29/12/1910